बुद्ध : आमच्या उन्मुक्त माणूसपणाचा आरंभ
माणूस होणं म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षे कुणालाही मिळाले नाही. पण 1956 मध्ये एका ऐतिहासिक निर्णयाने लाखोंनी तो मार्ग निवडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 आपल्याला बुद्ध दिला. इथल्या शोषित, वंचित, पीडित मनुष्याला माणूस म्हणून मान मिळवून द्यायचा असेल, तर बुद्धाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. इथल्या विषमतावादी व्यवस्थेला हादरा देणारा 'आद्य क्रांतिकारक' जर कोणी असेल, तर तो बुद्धच. विषमतावादी हिंदू धर्माने माणूसपण नाकारलेल्या लाखो शोषितांना बुद्धाने स्वीकारले, न्यायाच्या कुशीत घेतले. कधी कधी मनात विचार येतो, की 1956 साली अशिक्षित असलेल्या पिढीने एका झटक्यात 33 कोटी देव घराबाहेर कसे फेकले? कोणताही प्रश्न न विचारता लाखोंच्या संख्येने नागपूरला एकत्र जमले आणि बाबासाहेबांच्या मागे चालत बुद्ध धम्म स्वीकारला. हे कोणत्या प्रचाराने नाही, तर लोकांचा बाबासाहेबांवर असलेल्या निर्विवाद विश्वासामुळे शक्य झाले. त्या काळच्या पिढीकडे शिक्षण, माहिती, साधने, इंटरनेट काहीच नव्हते, पण त्यांच्याकडे होती ती बाबासाहेबांवर निष्ठा. त्यांनी बाबासाहेबांवर ठाम विश्वास ठेवून देव-धर्माचा गोंग...