बुद्ध : आमच्या उन्मुक्त माणूसपणाचा आरंभ

माणूस होणं म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षे कुणालाही मिळाले नाही. पण 1956 मध्ये एका ऐतिहासिक निर्णयाने लाखोंनी तो मार्ग निवडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 आपल्याला बुद्ध दिला. इथल्या शोषित, वंचित, पीडित मनुष्याला माणूस म्हणून मान मिळवून द्यायचा असेल, तर बुद्धाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. इथल्या विषमतावादी व्यवस्थेला हादरा देणारा 'आद्य क्रांतिकारक' जर कोणी असेल, तर तो बुद्धच.

विषमतावादी हिंदू धर्माने माणूसपण नाकारलेल्या लाखो शोषितांना बुद्धाने स्वीकारले, न्यायाच्या कुशीत घेतले. कधी कधी मनात विचार येतो, की 1956 साली अशिक्षित असलेल्या पिढीने एका झटक्यात 33 कोटी देव घराबाहेर कसे फेकले? कोणताही प्रश्न न विचारता लाखोंच्या संख्येने नागपूरला एकत्र जमले आणि बाबासाहेबांच्या मागे चालत बुद्ध धम्म स्वीकारला. हे कोणत्या प्रचाराने नाही, तर लोकांचा बाबासाहेबांवर असलेल्या निर्विवाद विश्वासामुळे शक्य झाले.

त्या काळच्या पिढीकडे शिक्षण, माहिती, साधने, इंटरनेट काहीच नव्हते, पण त्यांच्याकडे होती ती बाबासाहेबांवर निष्ठा. त्यांनी बाबासाहेबांवर ठाम विश्वास ठेवून देव-धर्माचा गोंगाट, मानसिक गुलामीचा मागे टाकत एक नवा मार्ग स्वीकारला. कारण, त्यांना माहीत होते की हा मार्ग त्यांना माणूस म्हणून उभं करणार आहे. त्यांनी लाखोंच्या संख्येने नागपूरला येऊन बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली धम्म स्वीकारला, आणि ज्यांना येता आले नाही त्यांनी गावोगावी, वाड्यावस्त्यांवर, पडक्या शाळांमध्ये, झाडाखाली उभं राहून बुद्धाला वंदन केले, पंचशील स्वीकारले, अष्टांगिक मार्ग अंगीकारला. हा इतिहास वाचताना, बोलताना, लिहिताना डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
 
हे सगळे केवळ एक श्रद्धा किंवा आंधळेपण नव्हते, हे होते - इतिहासात प्रथमच एका वंचित समाजाने स्व-इच्छेने, विवेकाच्या आधारावर केलेले संघटित वैचारिक बंड! बाबासाहेबांच्या नेतृत्वात बुद्धाकडे जाणे म्हणजे निव्वळ धर्मांतर नव्हते - ते होते मनुष्य-मुक्तीचा कार्यक्रम.

बुद्ध हा फक्त एक धार्मिक व्यक्ती नव्हता, तो होता आद्य समाजक्रांतिकारक. त्याने ईश्वर, आत्मा, कर्मकांड, जात, वर्ण यांना नाकारून माणसाच्या दुःखाचे मूळ अज्ञानात आहे हे दाखवून दिले. ‘प्रतित्यसमुत्पाद’, ‘अनात्मवाद’, ‘अनित्यता’ ही केवळ तत्त्वज्ञानाची परिभाषा नाहीत - ती एका नव्या समाजव्यवस्थेची बीजे आहेत. आजच्या काळातही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता लोकशाही पुरस्कृत तत्त्वांचा आशय महत्वपूर्ण आहे. कारण, आजही भारतीय लोकशाहीचे मूल्य जर कुणी प्रत्यक्ष कृतीत उतरवले असेल, तर ते बुद्धधम्माने.

इ. स. पूर्व सहाव्या शतकात बुद्धाने स्वतःला कधी देव म्हणवले नाही, तो म्हणतो – “अत्त दीप भव”, स्वतःचा दीप बना. तो म्हणतो, “माझा शब्द पाषाणात कोरून ठेवू नका, विचार करा, अनुभव घेऊन मग स्वीकारा.” या विचारांनीच बाबासाहेब बुद्धकडे वळाले. बुद्धाने ईश्वर नाकारला, माणूस स्वीकारला. येशू, पैगंबर यांनी स्वतःला ईश्वराचे दूत म्हटले, कृष्णाने स्वतःलाच ईश्वर घोषित केले. पण बुद्ध? बुद्धाने स्वतःला मार्गदर्शक मानले - देव नाही. यामुळेच तो महान वाटतो. त्यामुळेच बाबासाहेबांनी त्याची तुलना मार्क्सशी केली आणि त्याही पुढे जाऊन, बुद्धाचे माणूसपण अधिक ठळकपणे अधोरेखित केलं. 

बुद्ध हा ब्राह्मणवादी व्यवस्थेला थेट विरोध करणारा धर्म आहे. तो धर्म नव्हेच - ते एक तत्वज्ञान आहे, एक संघर्ष आहे, एक माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे जेव्हा बुद्धस्विकार करणाऱ्यांवर “बौद्ध म्हणजे महारांचाच धर्म” अशी टीका होते, तेव्हा ती फक्त जातीय अहंकारातून येते. कारण बुद्ध धम्माने आजवर ज्या माणसांना उभे केले, त्यांनी धर्माच्या नावाने चालणाऱ्या गुलामीला छेद दिला. आज ज्या समाजघटकांनी शिक्षण, विचार, आणि संविधानिक सन्मान मिळवला आहे, त्याचे मूळ याच बुद्धधम्मात आहे. 

बुद्धाने आपल्याला विचार दिला. तर्कशक्ती दिली. दुःखाचे कारण समजावले आणि त्यावरचा मार्गही दाखवला. केवळ एकच नव्हे - जगण्याची दिशा दिली. हिंदू धर्मात जातपात, ब्राह्मण-अब्राह्मण हे द्वंद्व चालत राहिले. ब्राम्हणी हिंदू धर्माने दिलेले जात-धर्माचे बंधन बुद्धधम्माने मोडले. इथे प्रत्येकाला बुद्ध होण्याची संधी आहे, केवळ ब्राह्मण होण्याची नाही. पण बुद्ध म्हणतो - 'तुम्ही सर्व बुद्ध होऊ शकता.' ही समता केवळ बुद्धाकडे होती.

बाबासाहेबांनी बुद्धाचा स्वीकार करून भारतीय समाजाला नवी दिशा दिली. पण दुर्दैवाने आजही बुद्धाला भारतात डावलले जाते. जागतिक पातळीवर जिथे बुद्धाची मूर्ती भारताचं प्रतिनिधित्व करते, तिथे भारतातच त्याचे विचार गिळंकृत केले जातात आणि जेव्हा महारांनी बुद्ध स्वीकारला, तेव्हा ‘बुद्धालाच महार बनवला’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला गेला. यामागे द्वेष आहे, कारण ह्या विषमतेच्या व्यवस्थेतून हे लोक बाहेर पडू शकत नाहीत. बुद्ध विचार मान्य करतात, पण आचरणात उतरवायला घाबरतात. म्हणूनच प्रतिगामी आणि पुरोगामी यांच्यात काहीही फरक राहिलेला नाही. 

बुद्ध जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर आपल्याला ‘बुद्ध’ होण्याचे स्मरण करून देणारा दिवस आहे. ही आपली जबाबदारी आहे बुद्ध होण्यासाठी, आणि इतरांनाही बुद्ध बनवण्यासाठी. बुद्धाची गरज कालही होती, आजही आहे, आणि उद्याही राहील. इ. स. पूर्व 563 बुद्धाने सुरू केलेला प्रवास, 1956 मधील बाबासाहेबांनी पुनर्स्थापित बुद्धाचा प्रवास आजच्या पिढी पर्यंत पोहोचला आहे. हा धम्म पिढ्यानपिढ्या चालत राहावा, टिकून राहावा ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच त्या मागील पिढीपुढे, आणि त्या पिढीला बुद्ध देणार्‍या बाबासाहेबांपुढे आपली मान अभिमानाने झुकते.

बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा!!! 🩶🙏🏻

Comments

  1. बुद्ध स्वीकारणारे,बहुतांश लोकं आजकाल कर्मकांड करतात त्याला सुशिक्षित पण अपवाद नाहीत,वैचारिक तटस्थपणा अथवा तो बुद्धाचा दीपच पेटला नाही आणखी,अपवाद वगळता....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली