मनोज कुमार: देशप्रेमाच्या कथेतील अस्पष्ट जातीयता
मनोज कुमारचं निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीला देशप्रेमाच्या माध्यमातुन त्याने एक विशिष्ट दृष्टिकोन दिला. ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’, ‘शोर’, ‘रोटी, कपडा और मकान’ हे सर्व चित्रपट त्यांच्या देशभक्तिपर कलाकृतीचे उत्तम प्रतीक बनले. पण त्याचबरोबर, त्यांचे चित्रपट पाहतांना एका बाबीची कायम खंत वाटत राहिली, या साऱ्या चित्रपटांमध्ये देशाभिमानाचे गोड गाणे होते, पण देशातल्या जातिव्यवस्थेच्या कुरूपतेवर कधीही हात घालायची त्याची हिंमत झाली नाही. आजच त्याचा एक छोटासा Interview ऐकला, त्यात तो 'उपकार' चित्रपटाची कथा कशी सुचली याबाबत भाष्य होते. तो म्हटला, "मी गोस्वामी आहे आणि गोस्वामी म्हणजे जमिनीचे मालक, ब्रिटीशांच्या "The Land Acquisition Act, 1894" च्या कायद्याने आमची जमीन गेली, आणि त्याकाळी नेत्यांना नेमके कोणते कायदे घ्यायचे तेही कळले नाही आणि आमची जमीन गेली. मी कोणत्याच नेत्याला मानत नाही. मी रिक्षावाल्याला सलाम करेल, शेतकर्याला सलाम करेल, पण कोणत्याही नेत्या समोर झुकणार नाही." एकंदरीतच मनोज कुमारने फार मोठा कार्यकाळ पाहिला. नेमके कोणत्या नेत्याला मानत नाही, हे वेगळे सांगायला नको. काही दिवसांपूर्वीच त्याचे 'मेरे देश की धरती' गाणे ऐकताना असे वाटले होते, मनोज कुमारने आपल्या भारताचे फारच चांगले वर्णन केले आहे, पण मूळ मुद्दा जातीचा कधी त्याच्या गाण्यात दिसला नाही. मनोज कुमारचे देशप्रेम हे मुख्यतः 'हिंदू राष्ट्रवाद' आणि एका आदर्शित, परंपरावादी भारताचे चित्र रंगवणारे होते असे वाटते. 'पूरब' आणि 'पश्चिम' मध्ये कल्चरल द्वंद्व दाखवले, पण त्यात ते भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू मूल्यव्यवस्था असेच त्याने गृहीत धरले. 'रोटी-कपडा-और-मकान'मध्ये वर्गीय संघर्ष दाखवला. पण जातीय अन्याय, बहिष्कार, अस्पृश्यता यावर एकही शब्द नाही. मनोज कुमारने चित्रपटातून देशासाठी आवाज उठवला, पण त्या राष्ट्रातल्या खऱ्या माणसांसाठी - विशेषतः दलित, आदिवासी, लोकांचा आवाज मात्र नाहीच. त्यांनी केवळ एका Mainstream मधील गरीब श्रीमंत वर्गाचे 'राष्ट्रप्रेम' मांडले. मनोज कुमारचे हिट चित्रपट जवळपास सर्वच पाहिलेत. 'शोर', 'वह कौन थी' आणि 'रोटी कपडा-मकान' तीन चित्रपट मला विशेष आवडले. शोर मधील एक प्यार का नगमा गाण्यांचे वेड अजूनही संपत नाही, 'वह कौन मधील' त्याला लग जा गले म्हणून साद घालणारी साधना आणि त्यांच्या जोडीचे गाणे आजही अजरामर आहे. 'रोटी कपडा-और-मकान' मधील एका बेरोजगार विद्यार्थ्यांची गोष्ट आणि त्यातील मै ना भुलुंगा गाणे, आजही तितकेच ताजेतवाने आहे. कोणत्याही नेत्याला न मानणारा मनोज कुमारचे फोटो मात्र मोदी सोबत दिसले आणि अचानकच एक ‘प्रसिद्ध चेहरा’ म्हणून त्यांचे दुःखही एक फॉर्मॅलिटी बनून गेले. खरंतर मनोज कुमार या साऱ्या सिस्टिमेटिक सायलेन्सिंगचा एक भाग होते. कलावंत म्हणून जातधर्माच्या पलीकडे विचार करता आला नाही, किंवा त्यांनी ते मुद्दाम टाळले असावे. अशीच एक संधी गीतकार शैलेंद्र यांना होती, त्यांच्यावरील देखील एक लेख वाचताना, आढळले की त्यांनी तर त्याची दलित ओळख लपवूनच इंडस्ट्रीत काम केले होते. चित्रपट ‘देशासाठी’ असतो, पण 'देशातल्या सर्वांचा' विचार करत नसेल, तर तो फक्त एका वर्गाचा सेलिब्रेशन बनतो. मनोज कुमारने चित्रपटातून देशप्रेम शिकवले, वर्गसंघर्षाला महत्व दिले पण खऱ्या परिवर्तनाचा विचार मात्र कधी केला नाही, हेही तितकेच सत्य आहे. मनोज कुमारच्या निधनाने सिनेसृष्टीतील एक महत्वपूर्ण अध्याय संपला. त्यांच्या काही कलाकृती नेहमीच आठवणीत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🏻
Comments
Post a Comment