सम्राट अशोक : धम्माने घडवलेला सम्राट

सम्राट अशोकाच्या बाबतीत एक बाब नेहमीच ठळकपणे लक्षात येते. ती म्हणजे, बुद्धाच्या मार्गावर जाताना त्याने केवळ वैयक्तिक परिवर्तनच केले नाही, तर एक व्यापक आणि करुणामय साम्राज्य उभं केलं. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबाबत इतिहासकारांनी भरपूर प्रमाणात चर्चा केली, त्याच्या पतनावरच प्रकाश टाकला. पण कलिंग युद्धानंतर निर्माण झालेले साम्राज्य किती करुणेचा आणि कल्याणाचा मार्ग इतरांसाठी मोकळा करणारे होते, याकडे दुर्लक्ष केले. सम्राट अशोकाने आपल्या जीवनाचा प्रवास शिलालेखांमधून कोरून ठेवला. जर हे शिलालेख आणि शिल्प नसते, तर अशोकाचा आणि बौद्ध इतिहासाचा मोठा भाग अंधारात राहिला असता. विशेषतः बौद्ध धम्माच्या दृष्टीने, अशोकाच्या काळातील ही ऐतिहासिक साक्ष अनमोल आहे. अशोकाच्या बाबतीत काही दंतकथा पसरवून त्याचे क्रूर चित्र रंगवले गेले. पण त्या कथा जितक्या टोकाच्या होत्या, तितका तो क्रूर सम्राट नव्हता. कलिंग युद्धानंतर त्याच्या मनात झालेले परिवर्तन त्याला इतिहासात अजरामर करून गेले. अशोक ‘सम्राट’ बनला यामागे सर्वात मोठे योगदान बुद्धाच्या धम्माचे होते. नीतिमत्ता, तार्किक विचार, प्रज्ञा, प्रेम, करुणा आणि अहिंसेच्या मार्गाने चालताना तो लोकप्रिय झाला. युद्धातून मिळवलेली सत्ता त्याच्या मनाला समाधान देऊ शकली नाही. उलट, धम्माच्या शिकवणुकीत त्याला जीवनाचा खरा अर्थ सापडला, हीच त्याची वेगळेपणाची खूण आहे. बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर, शांतीच्या मार्गावरून जात असताना, साम्राज्य कसे विस्तारावे याचे उत्तम उदाहरण त्याने घालून दिले. राजकीय वृत्तीला धर्माचे अधिष्ठान नसावे, असे म्हटले जाते; परंतु, जर ते अधिष्ठान बुद्धाच्या शांतीमार्गाचे आणि सामाजिक संघर्षाचे असेल, तर ते साम्राज्य कल्याणकारी ठरतेअशोक हेच दाखवून गेला. अशोकाचा धम्म वैयक्तिक न राहता, सामाजिक आणि राजकीय स्तरावर पोहोचवला गेला. करुणा, अहिंसा, समता आणि लोककल्याण या मूल्यांची शिकवण त्याने संपूर्ण साम्राज्यात पसरवली. त्याचे राज्य केवळ प्रशासनावर आधारित नव्हते, तर ते नैतिकतेवर आधारलेले होते. त्याने सर्वसामान्य जनतेसाठी पाणवठे, रस्ते, झाडे, वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या. धर्म, जात, वर्ग यांत कोणताही भेद न करता लोकहित साधले. हीच त्याची धम्मनीती होती. त्याने बुद्ध धम्माची तिसरी संगीती आयोजित केली आणि भ्रष्ट भिक्खूंपासून धम्माला शुद्ध ठेवले. आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना लंकेत धम्मप्रसारासाठी पाठवले. त्याचे धम्मदूत ग्रीसपासून श्रीलंकेपर्यंत गेले, हीच खरी सांस्कृतिक क्रांती होती. आज बौद्ध धम्मामुळे भारताला जगात एक विशेष ओळख प्राप्त आहे, आणि त्याचा पाया अशोकानेच घातला. विविध स्तंभ, शिल्प, आणि स्तूप हे आज भारताची राष्ट्रीय ओळख बनले आहेत. ते आजही अशोककालीन भारताची साक्ष देतात. सम्राट अशोकाने हजारो लोकांचे विचार बदलले, बुद्ध धम्माला मोठे केले. पण आज दुर्दैवाने, तोच धम्म ब्राह्मणवादी अजेंड्यावर चालतोय. आजही अशोकाच्या काळातील बुद्ध मूर्त्या वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात, दोन दिवस बातम्या येतात... मग त्या मूर्त्यांचं पुढे काय होते, हे कोणालाही माहिती नसते. पण स्वप्नात आलेल्या रामासाठी मात्र भव्य मंदिर उभे करता येते. आज सापडणाऱ्या बुद्ध मूर्त्या अशोकाच्या धम्मविस्ताराची जिवंत साक्ष आहेत. त्यामुळे, कितीही बुद्धकाल झाकण्याचा प्रयत्न केला, तरी अशोकाने घातलेली धम्माची भक्कम पायाभरणी नष्ट होणे अशक्य आहे.

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली