जातीय अहंकार आणि फॅंड्री
काल रात्री फॅंन्ड्री मुव्हीवर Twitter स्पेस आयोजित केली होती. नागराज मंजुळेच्या या चित्रपटात भारताची मूळ समस्या 'जात' व्यवस्थेवर भाष्य आहे, त्यावर मूळ चर्चा करायची सोडून स्पेस मधील मंडळीनी, भरलेल्या पोटाने पारावर चहा प्यायला बसलेल्या लोकांसारख्या केवळ गप्पा हाणल्यात. (चर्चा देखील नाही बरं का).
या लोकांच्या फॅंन्ड्री वरील गप्पांवरून लक्षात आले, फॅन्ड्री ची कथा ह्या लोकांसाठी केवळ 'फँटसी' आहे, त्यांनी त्या वास्तवाला केवळ 'कथा' म्हणूनच स्वीकारले, त्यातल्या मूळ समस्येकडे पाहण्याचे टाळले आणि वरवरच्या बाबींवर गप्पा मारत राहिले. हीच ह्यांची खरी मानसिकता नागराज मंजुळेच्या चित्रपटांच्या मुळाशी आहे. विशेषतः ज्या लोकांना त्यांच्या जातीचा विशेषाधिकार आहे, असेही लोक फॅंन्ड्रीवर बोलत होती, आणि जातीय विशेषाधिकार प्राप्त ही लोक, जी लोक जातीवर खऱ्या अर्थाने भाष्य करत होती त्यांना बोलू नका म्हणत होते, जात व्यवस्थेवर आपण वेगळी स्पेस आयोजित करू बोलत होती. इथेच स्पेसवरच लोकांचा जातीय अहंकार दिसून आला.
काहींचे म्हणणे असे होते की, "दलितांनी दलितांसाठी केलेली मुव्ही आहे." हे विधानच इतके खुळचट आणि निरर्थक आहे. कारण, जात हा 'फक्त' दलितांचा प्रश्न नाही. जात ही संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेची शोकांतिका आहे, ज्याचे ओझे दलितांनी वाहिले आणि विशेषाधिकार उच्चवर्णीयांनी उपभोगले. त्यामुळे फॅंन्ड्री केवळ दलितांसाठी नव्हे, तर उच्चवर्णीयांनी त्यांच्या विशेषाधिकारांची चिकित्सा करण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.
दुसरे महाशय तर म्हणत होते, "समाजात दरी निर्माण करणारा चित्रपट आहे. केवळ जात-जात दाखवले." तिसरे महाशय म्हटले, "पाटलाची इमेज खराब केली मंजुळेनी." पण हे आक्षेप घेणारे मुळातच आपल्या जातीय विशेषाधिकारांच्या भिंतीमागे सुरक्षित लपलेल्या मानसिकतेतून आलेले आहे. ह्यांना पाटलांच्या इमेजचे पडले, पण तोच पाटील जब्याला डुक्कर पकडायला सांगतो ते नाही दिसले. उचलायला लावायचे ना मग आपल्या गाडीवर शाळेत जाणार्या पोराला. खरेतर, जेव्हा पाटलाची इमेज 'खराब' होते, तेव्हा मुळात त्या 'इमेज'च्या मागे लपलेल्या व्यवस्थेचे उघडे नागडे वास्तव रूप समोर समाजासमोर येते.
ही इमेज केवळ पाटलाची नाही, तर ती एका उपभोग घेत असलेल्या संपूर्ण जात व्यवस्थेची इमेज आहे, ज्यांच्यामुळे समाजात दरी निर्माण होते. फॅंन्ड्री इथल्या या व्यवस्थेच्या अस्तित्वालाच हादरून सोडतो. त्यामुळेच त्या व्यवस्थेचे लाभार्थीच कालच्या स्पेसवर खरंतर अस्वस्थ झालेले दिसले. पाटलाची इमेज 'खराब' झाली यापेक्षा, 'पाटील' नावाचे प्रतीकच जातीच्या शोषणाचे केंद्र आहे, हे मान्य करणे ह्यांना अवघड गेले आणि म्हणूनच Twitter, Facebook वरील देखील काही लोक आपला विशेषाधिकार दाखवण्यासाठी 'पाटील' आडनाव शेपटी सारखे घेऊन मिरवतात.
एका काकूने तर विषय भलतीकडेच नेला, जब्बार पटेल आणि नागराज मंजुळेची तुलना. जब्बार पटेलच्या 'जैत रे जैत' ची तुलना 'फॅंन्ड्री'शी. भाई माझे तर डोकेच फिरले. ह्या लोकांना खरंच काहीतरी सिनेमा कळला असेल का? हे इथेच दिसून येते. काही लोकांना तर काळ्या चिमणीच्या पुढे काही दिसलेच नाही आणि बस मुलीला पटवायला तिची राख हवी इतकाच आशय त्यांनी घेतला. परंतु, फॅंन्ड्री मधील काळी चिमणी ही केवळ एका एका काळ्या चिमणीची गोष्ट नाही, ती जातिव्यवस्थेच्या काळ्या सावल्यांची एक प्रतीक आहे. जेव्हा जब्या काळ्या चिमणीचा पाठलाग करतो, तेव्हा तो आपल्या अस्तित्वाची कबुली मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रेमाच्या एका निरागस आशेच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा ती चिमणी त्याच्या हातून निसटते, तेव्हा फक्त एक चिमणी उडत नाही, तर त्याची 'माणूस' म्हणून जगण्याची संधी निसटते. ज्या लोकांना जातिव्यवस्थेची काडीचीही झळ लागलीच नाही, त्यांच्यासाठी काळी चिमणी केवळ एक काळी चिमणी आहे. त्यांच्यासाठी ती जब्याच्या 'क्रश'ची उपमा आहे. पण ती चिमणी जब्यासाठी 'मानवतेचा' शोध आहे. ती त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या माणूस म्हणून स्विकारल्या जाण्याचा हक्क आहे.
अति शहाणे लोक तर म्हणत होते, ''चित्रपटात मध्ये नवीनच काहीच नव्हते." हे विधानच मुळात त्यांच्या जातीय विशेषाधिकारातून आणि त्यांच्या अज्ञानातून आलेले आहे. ज्यांनी कधी जातिव्यवस्थेचा अनुभव घेतलाच नाही, ज्यांनी कधी दलितांचा आवाज ऐकलाच नाही, त्यांना फॅंन्ड्री 'नवीन' कसा वाटणार? कारण, त्यांच्या जगण्यात कधीच असमानता नव्हती, त्यांना कधी डुक्कर उचलावे लागले नाही, जातीवरून शिव्या पडल्या नाहीत, जातीवरून कधी कोणी यांचे माणूसपण नाकारले नाही. चित्रपटातील 'तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला' गाण्यावर तुम्ही लोक खदखदा हसता, तेंव्हा आमच्यासारख्या लोकांना तिथे रडू कोसळते. तुमच्यासारखे प्रस्थापित लोक जेंव्हा अशा महत्वपूर्ण चित्रपटावर गप्पा मारतात, तेंव्हा त्या विषयाची तुम्ही माती करता...
तुम्ही दोन मिनिट जातिव्यवस्थेवर स्पष्टपणे बोलू शकत नसाल, तिच्या कार्यपद्धतीचा वेध घेऊ शकत नसाल, तर हाच नागराज मंजुळेच्या चित्रपटाचा उद्देश इथे सफल झालाय. कारण डायरेक्टरने तुमची बोलती बंद केली आहे. कारण फॅंन्ड्री फक्त जब्या किंवा शालूची गोष्ट नाही, ती एकूणच 'समाजाची' गोष्ट आहे. ती अशी गोष्ट आहे, जी पाहताना तुमच्या साचेबद्ध विचारांच्या काचेला तडा जाते आणि ती काच तडा गेल्यानंतर त्याकडे पाहण्याची हिंमत झाली, तरच 'फॅंन्ड्री' समजतो.
चित्रपटाच्या शेवटी जब्या शेवटी जो दगड मारतो ना, तेव्हा तो फक्त 'फेकलेला दगड' नसतो, तर तो असतो त्याच्यावर लादलेल्या संकुचित व्यवस्थेचा प्रतिकार करण्याची बंडखोरी असते. तो असतो त्याच्या अस्तित्वाला नाकारणाऱ्या समाजव्यवस्थेच्या तुमच्यासारख्या लोकांच्या तोंडावर मारलेला जोरदार तमाचा. जातिव्यवस्थेचा फटका आणि प्रस्थापितांचे मुखवटे उतरून ठेवणारी 'फॅंन्ड्री' ही केवळ एका दलित मुलाची गोष्ट नाही. ती एका अखंड जात व्यवस्थेचे वास्तव आहे. 'फॅंन्ड्री' व्यवस्थेच्या भेसूर चेहऱ्याला आरसा दाखवते आणि ज्यांना या व्यवस्थेचा लाभ मिळाला, त्यांनी त्या जाती व्यवस्थेच्या आरशाकडे कधीच डोळे उघडून पाहण्याची हिम्मत केली नाही.
Comments
Post a Comment