सत्याचे यशस्वी प्रयोग करणार्या गांधीचे सत्य -
गांधी जाती निर्मूलनाचे काम करतच होते म्हणे ,बरं! आणि म्हणूनच त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नाकारला , अस्पृश्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख ठेवू नये , त्यांनी तथाकथित सवर्णांच्या छत्राखालीच राहावे , असे कायम आग्रहाने सांगितले. जर गांधींना अस्पृश्यांचा खरा कळवळा असता ,
तर त्यांनी बाबासाहेबांच्या मागण्यांना विरोध केला नसता. पण गांधींच्या सुधारणा नेहमीच उच्चवर्णीयांच्या चौकटीत बसणाऱ्या आणि त्यांचे वर्चस्व टिकवणाऱ्या होत्या.
ब्राह्मण सुधारणा चळवळ राबवली म्हणे , यापेक्षा मोठा जोक असू शकत नाही. मंदिरे , शिक्षणसंस्था आणि समाजव्यवस्थेतील ब्राह्मणी वर्चस्व संपवण्यासाठी त्यांनी कोणते ठोस पाऊल उचलले? अस्पृश्यांना जातीय गुलामीतून मुक्त करण्याचा खरा मार्ग सत्तेच्या समीकरणात त्यांना स्थान देण्यात होता , पण गांधींनी ते स्पष्टपणे नाकारले. गांधींच्या सुधारणा म्हणजे -
अत्याचार सहन करा , पण प्रेमाने. अस्पृश्यांनी कोणताही लढा देऊ नये , स्वतंत्र राजकीय सत्ताकेंद्र उभारू नये , यासाठीच त्यांनी अस्पृश्यांसाठी ‘हरिजन’ हा अपमानास्पद शब्द वापरला.
याला कोणत्या अर्थाने सुधारणा म्हणता येईल ? अस्पृश्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करू नये , फक्त सुधारले जावे , हे गांधींच्या मूळ धोरणाचा गाभा होता.
गांधींच्या विचारांनी अस्पृश्यांना जागरूक करणे आवश्यक होते म्हणे , पण कशासाठी आणि का? अस्पृश्यांनी संघर्ष करू नये म्हणून? सत्तेसाठी लढू नये म्हणून?की त्यांनी कायम दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून वागावे म्हणून? अस्पृश्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली नव्हती , मग त्यांनीच सुधारित का व्हावे ? गांधींनी सुधारायला पाहिजे होते ते सवर्ण , पण सुधारणा मात्र अस्पृश्यांनी स्विकारायच्या ?
वारे वाह...! गांधींचे आंधळे समर्थक त्यांच्या भूमिकेचे समर्थन करताना विसरतात की त्यांनी अस्पृश्यतेच्या मुळावर घाव घालण्याऐवजी , तिचे सौंदर्यीकरणच केले. ‘अस्पृश्यांची सेवा करा’ हे सांगणे म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे नाही , तर ती टिकवण्याचा मार्ग आहे. जात निर्मूलन म्हणजे नुसते संडास साफ करणे , अस्पृश्यांसोबत जेवण करणे नव्हे. जात निर्मूलन म्हणजे जातीच्या सत्ताकेंद्रांचा नायनाट. पण गांधींच्या सुधारणा अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नव्हत्या , तर त्यांना कायम दुय्यम ठेवण्यासाठी होत्या. म्हणूनच त्यांनी अस्पृश्यांसाठी वेगळे राजकीय सत्ताकेंद्र निर्माण होऊ नये , यासाठी हट्टाला पेटून विरोध केला.
जात निर्मूलनाच्या नावाखाली गांधींनी फक्त जात पक्की केली. ही सुधारणा नव्हे , तर त्यांची जाणिव नेणिवेच्या आतील चातुर्वणीय एक सवर्ण खेळी होती.
Comments
Post a Comment