प्रेमाची सांस्कृतिक प्रोग्रामिंग
❛❛प्रेम एकदाच होते म्हणणार्यांसाठी... ❜❜
प्रेम एकदाच होते, म्हणणाऱ्या तेरे नाम मधील सलमान खानच्या भक्तानों आणि त्याच्याच भक्तीला भुलून आत्महत्या करणार्या निर्जलाच्या भक्तिंनींनो, तुमच्या डोक्यातील विचारसरणीतच त्रुटी आहे. तुम्हाला वाटते, प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होते. परंतु, वास्तवाकडे दुर्लक्ष करून तुम्हाला केवळ Bollywood सिनेमाच्या कल्पनांना हवा देण्याची वाईट सवय असावी. सिनेमा आणि साहित्यिकांनी प्रेमासारख्या साधारण घटनेला अवास्तव महत्व देऊन प्रेमाबद्दल खुळचट कल्पना तयार केल्या आणि तुम्ही त्याच अंगीकारल्या. प्रेम एकदाच होतेच्या नावाखाली लोक आत्महत्या करतात, विष घेतात, नैराश्यात जातात, का जातात कधी विचार केला आहे का? तुमच्या अशा मनोरंजनात्मक कल्पनांमुळे, सोडून गेलेल्या एकाच प्रेमासाठी झुरल्यामुळे, एकाच प्रेमाच्या चौकटीत अडकल्यामुळे. खरंतर प्रेम ही माणसाच्या आयुष्यात सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. परंतु, तुमचे डोके कवी-साहित्यिकांच्या भावनिक कल्पनांनी प्रोग्राम झाले आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रेमाला अवास्तव महत्त्व देता. कवी किंवा साहित्यिकांनी प्रेमाचे एक आकर्षक रूप मांडले आणि ते कायम मांडतात, पण त्याच्या पलीकडे देखील वास्तविक, प्रेम हे फक्त मानवी जीवनाच्या इतर बाबी सारखाच एक अंग आहे.
✶ शास्त्रीयदृष्ट्या प्रेम म्हणजे काय पाहूया -
प्रेम एकदाच होते, या संकल्पनेला विज्ञान देखील मान्यता देत नाही, त्यात तुमची भावनिक, काल्पनिक, रडकी अगरबत्ती कुठे लावता? पहिले तर प्रेमाला भावना म्हणणे सोडून दिले पाहिजे. प्रेम ही कोणत्याही स्वरूपाची भावना नसून ते डोक्यातील हार्मोन्स आणि न्यूरोकेमिकल्सचा परिणाम आहे. डोपामाइन, ऑक्सिटोसिन, आणि सेरोटोनिनसारखे हार्मोन्स मुळे प्रेम आपल्याला अनुभवता येते. हे हार्मोन्स आपल्यात आयुष्यभर सक्रिय राहतात, ज्यामुळे माणसाला प्रेम करणे पुन्हा-पुन्हा शक्य होते. त्यामुळे "प्रेम एकदाच होते." ही संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या देखील चुकीची आहे. जे कोणी म्हणते, प्रेम एकदाच होते, असे म्हणणारे लोक स्वतःला फसवत असतात आणि स्वतःच्या तथाकथित चुकीच्या विचारांनी इतरांनाही फसवत असतात. त्यामुळे, केवळ एकाच प्रेमाच्या दुःखात रडण्याचा कार्यक्रम करण्यापेक्षा विज्ञानाचे तरी ऐका!
जीवनात काहीही स्थिर नसते, Nothing Is Permanent. माणूस सतत बदलत असणारा प्राणी आहे. त्याच्या भावना, गरजा, विचार देखील सतत बदलत जातात. या प्रवासात वेगवेगळया टप्प्यावर वेगवेगळया व्यक्तींसोबत आपली नाती जुळतात. मनुष्याचा जन्म कधीच एका माणसासाठी नसतो. आपण आयुष्यात अनेक लोकांना भेटतो आणि त्यांच्याशी असलेले नाते, वेळ, स्थान, आणि परिस्थितीच्या आधारावर विकसित होत जातात. Bollywood ने घातलेला धिंगाणा आपण आपल्या वास्तविक आयुष्यात स्वीकारल्यामुळे त्यापलीकडे पाहण्याची आपली कुवत संपली आहे. बॉलिवूड किंवा प्रेमाच्या कविता, नेहमीच प्रेमाला एका अवास्तव वादळासारखे दाखवतात, पण वास्तविक आयुष्यात प्रेम ही एक नैसर्गिक, साधी आणि पुनरावृत्तीक्षम घटना आहे. ज्याप्रमाणे एका झाडाला फुलं एकदा नव्हे, तर हंगामानुसार वारंवार येतात, तसेच माणसाच्या जीवनातही प्रेम अनेकदा होऊ शकते.
'प्रेम ही माणसाची मूलभूत गरज आहे' आणि ती शाश्वत आहे. माणूस कोणत्याही काळात, कुणावरही, कधीही प्रेम करू शकतो. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मास्लो यांच्या 'Hierarchy of Needs' मध्येही प्रेम आणि नात्याला एक मूलभूत गरज म्हणून स्थान दिले आहे. माणूस जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत त्याला प्रेम आणि आत्मीयतेची गरज भासते. 'We Meet Accidentally!' आणि हीच गोष्ट प्रेमाचे खरे सौंदर्य आहे, ज्याकडे आपण डोळेझाक करतो. कोणीही आपल्याला आयुष्यात ठरवून भेटत नाही, आपण अनपेक्षितपणे लोकांच्या प्रेमात पडतो आणि हा Accident देखील आपल्या भावनांच्या आणि जाणीवांच्या बदलत्या प्रवाहाचा एक भाग आहे.
✶ या सर्व मानसशास्त्रीय प्रतिपादनाचा सारांश असा निघतो की -
"प्रेम एकदाच होतं... " हा विचार केवळ एक भावनिक अतिरंजित कल्पना आहे. प्रेम हे एक साधारण, नैसर्गिक आणि सतत बदलत राहणारी बाब आहे. ते कधीही, कुणावरही आणि कितीही वेळा होऊ शकते. प्रेमाचा विचार करताना आपण त्याला एकाच चौकटीत बांधण्याऐवजी त्याच्या व्यापक स्वरूपाला समजून घेणे गरजेचे आहे. माणूस म्हणून आपल्याला प्रेमाची गरज आहे, आणि ती गरज आयुष्यभर पुन्हा-पुन्हा निर्माण होऊ शकते.
Comments
Post a Comment