मी बुद्ध आहे...

माझा लहान भाऊ प्रवासात होता आणि रस्त्यात पोलीस Alcohol Test घेत होते. एकदा टेस्ट घेतली तरीही पोलिसांना खरे वाटेना. पोलिसांना वाटले कदाचित ह्याने दारू पिली, एकदा टेस्ट घेतली, काही आढळले नाही, तो पोलीस परत टेस्ट घेत होता. शेवटी माझा भाऊ म्हणाला, "अहो सर, मी 'बुद्ध' आहे." त्या एका वाक्याने पोलीसाने त्याला विश्वासाने, 'बरं, बरं" म्हटले, आणि पुढे जाऊ दिले.

सांगण्याचे तात्पर्य -

आजच्या भांडवली चंगळवादी जीवनात, आपल्या धम्माने दिलेली शिकवण आजही किती प्रभावशाली आहे याचे हे उदाहरण आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यांचे पालन केले तर आपल्या जीवनाकडे एका आदर्श दृष्टीकोनातून बघितल्या जाते. असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येतात तेंव्हा, "मी बुद्ध आहे," हे एक वाक्य आपल्या सत्यतेचा, प्रामाणिकपणाचा आणि संयमाचा दाखला देतो. आजही आपल्या धम्माचे नाव घेतल्यावर लोकांच्या मनात लगेचच एक आदर आणि विश्वास निर्माण होतो.

दुसरे कठोर वास्तव म्हणजे, आपल्याच समाजातील भांडवली, चंगळवादी जीवनाला हुरळून गेलेले मुले बुद्धाच्या शिकवणीपासून दूर जात आहे. Occasionally दारू पिणे काही वाईट आहे का? या सबबीखाली दारू पिण्याला देखील प्रोत्साहन देतात, त्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट होत आहे. यातून इतर लोकांना आपसूकच बोलायला संधी मिळते, "का हो तुमच्यात तर दारू पीत नाही, तरीही तुम्ही का पिता?" त्यामुळे आपल्या मुलांनी धम्माने जे शिकवले आहे, तो संयम, विवेक आणि शुद्ध जीवनशैलीचा मार्ग अवलंबिला पाहिजे. जेणेकरून आपल्याभोवती असलेले बाबासाहेब आणि बुद्धांच्या आदराचे हे कवच नष्ट होऊ नये.

आपल्या समाजाची खरी ओळख, बुद्ध आणि बाबासाहेब आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणे, आपण वागलो तर आपले समाजातील आपले स्थान आणखी उंचावेल यात शंका नाही. बुद्ध आणि बाबासाहेबांनी दिलेला विचार हा फक्त आचारसंहितेचा भाग नाही, तर ती एक जीवनशैली आहे. आपल्या मुलांनी ते पालन केले तर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि आपल्या समाजाला जास्त सन्मान मिळेल. बाबासाहेबांची आणि बुद्धाची शिकवण केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता ती खोलवर रुजवणे काळाची गरज आहे. कारण ती नेहमीच नेणीवेनेही आपल्या वर्तनात प्रकट होत राहते.

आपली एखादी व्यक्ती सामाजिक विषयावर कधीही थेट बोलत नसली तरीही, प्रसंगी स्वतःचा आधार बुद्धात शोधते. ह्यातच बाबासाहेबांच्या परिवर्तनाची आणि बुद्धाच्या विचारसरणीची खरी ताकद आहे, हे दिसून पडते. आपल्या वागणुकीतून, बोलण्यातून किंवा अगदी साध्या संवादातूनही आपल्यातील "बुद्ध" प्रकट होतो, तेंव्हा आपली जबाबदारी आणखी जास्त वाढते, असे मला वाटते.

असो, एरवी सतत मला सामाजिक विषयावर बोलते म्हणून चिडवणारा माझा भाऊ, या निमित्ताने का होईना प्रसंगी "मी बुद्ध आहे " असे ठासून सांगतो, यातच त्याच्या नेणीवेतील बाहेर आलेला "बुद्ध" बघून माझे हसू आवरेनासे झाले!!! 🤭

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली