वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???


❛❛ वेश्या व्यवसाय , पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तूंच्या तात्काळ मोबदल्यात, सामान्यत: जोडीदार नसलेल्या किंवा मित्र नसलेल्या व्यक्तीसोबत, अनैतिक लैंगिक प्रक्रियांमध्ये अडकण्याची प्रथा. वेश्या स्त्री, पुरुष किंवा ट्रान्सजेंडर असू शकतात आणि वेश्या व्यवसायात भिन्नलिंगी किंवा समलैंगिक क्रियाकलाप असू शकतात, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या बहुतेक 'स्त्रिया' वेश्या आणि बहुतेक ग्राहक 'पुरुष' आहेत. ❜❜ 

ब्रिटानिकाच्या या व्याख्येनुसार वैश्या व्यवसायाशी निगडित शेवटचे वाक्य आपले लक्ष केंद्रित करून घेते. "ऐतिहासिक दृष्टय़ा बहुतेक 'स्त्रिया' वेश्या आणि बहुतेक ग्राहक 'पुरुष' आहेत." जगातील सर्वात जुना व्यवसाय म्हणून वेश्या व्यवसाय संबोधल्या जातो. ग्रीक, रोमन या राज्यांना सुद्धा वैश्या व्यवसायाची प्राचीन काळापासून परंपरा लाभलेली आहे. भारतातील वेश्या व्यवसायाला तर ऋग्वेद, धर्मसूत्र, महाभारत, बौद्ध काळ, जैन काळ, कौटिल्यचे अर्थशास्त्र, कामसूत्र ग्रंथ. इत्यादी, बाबींचे पुरावे लाभलेले आहेत. 

आज वेश्यांना, सेक्स वर्कर्स म्हणून जरी त्यांना संबोधले जात असले तरी, साधारणी, गणिका, अखंड सौभाग्यवती अशा विविध नावांनी ती प्राचीन काळापासून प्रचलित होती. वेश्या व्यवसायाशी निगडित असणारे दोन महत्वाचे घटक म्हणजे इथली स्त्री व इथला पुरुष. वेश्या म्हंटल्यावर जितक्या लवकर एका स्त्रीचे नागडे चित्र आपल्या डोळ्यांसमोर समोर उभे राहते तितके नागडे चित्र एका पुरुषाचे उभे राहत नाही व हेच आपल्या समाजातील दुतोंडी व दुटप्पीपणाचे लक्षण आहे. 

भारतातील आकडेवारीचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, NACO (नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन) ने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात 8 लाखांहून अधिक महिला सेक्स वर्कर्स आहेत आणि 6000 हून अधिक महिला सेक्स वर्कर्स शारीरिक हिंसाचार आणि इतर प्रकारच्या अत्याचारांना बळी पडल्या आहेत. पुण्यातील बुधवार पेठ, नागपूरातील इतवारी, मुंबईतील कामाठीपुरा, कोलकात्यातील सोनागाची, दिल्लीतील जी. बी. रोड, अलाहाबादातील मीरगंज, वाराणसीतील शिवदासपूर, व मुझ्झफरपुरातील चतुर्भुजस्थान आजची भारतातील आठ मोठी शहरे जिथे रात्री उशिरापर्यंत रेड लाईट एरियात स्त्रीच्या शरीराच्या कमरेखाली दररोज योनीत हालचाली होत असतात. 

महान विचारवंत, तत्त्वज्ञानी, द सेकंड सेक्स पुस्तकाच्या लेखिका सिमोन डी ब्यूवोइर यांचा स्त्रीवादी दृष्टीकोन असे सांगतो की, "नैतिकदृष्ट्या वेश्या व्यवसाय स्वीकारार्ह कार्य आहे. परंतु, तोपर्यंतच, जोपर्यंत या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले लोक ते स्वइच्छिने करतात आणि त्यांना इतर कामगारांसारखे दिलेले अधिकार दिले जातात." स्त्रीवादी विचारसरणीतून याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, भारतात वेश्यांना वेश्या म्हणून काम करण्याचा नैतिक अधिकार दिला असला तरी, भारतीय समाजव्यवस्था नैतिकतेच्या दृष्टीकोनातून वेश्यांकडे बघतो का??? स्त्रीवादी स्त्रियांच्याकडून वेश्यांना लैंगिकतेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी कुठले पावले तरी भारतात उचलली गेली आहेत का ??? उलट वेश्यांना वेश्या व्यवसायाच्या साखळदंडात अडकून ठेवणारी, साखळदंड आणखी मजबूत करण्यासाठीच भारतीय पुरुषसत्ताक जमात आणखी साखळदंड घेऊन रेड लाईट एरियात उभी आहे. 
 
लैंगिकतेच्या गरजा भागविण्यासाठी पूरुषसत्ताक समाजव्यवस्थेने प्रत्यक्षात आणलेली ही व्यवस्था टिकून राहण्यास पुरुष जबाबदार आहे की, स्वतःहून, स्वतःला या जोखडात बांधुन घेणारी स्त्री जबाबदार आहे??? लैंगिकतेच्या गरजा नैतिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी नैतिकतेचा मुखवटा घालून मिरवणारी ही विवाह संस्था भारताने स्विकारली असताना, अपवित्रतेच्या गटारात जाऊन एक पुरुष व एक स्त्री कसे काय लोळू शकतात??? विवाहातील पावित्र्य जपण्याचा साळसुदपणे प्रयत्न करणारा निर्लज्ज पुरुष व पैशांच्या मोबदल्यात शरीर विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असणार्‍या स्त्रियांना ही व्यवस्था इतकी मान्य झाली आहे की, पैशांच्या मोबदल्यात एकमेकांच्या शरीराची विटंबना करण्यात सुद्धा ते धन्यता मानतात. सामाजिक व राजकीय पातळीवर वेश्यांना वेश्या व्यवसायातून कायमची सुटका करण्यासाठी, स्त्रीला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी शरीराचा धंदा करण्याऐवजी दुसरा पर्याय समाजव्यवस्था का सुचवत नाही??? का व कशासाठी इथल्या पुरुषांना बाहेरच्या स्त्रीची गरज निर्माण होते व ही गरज भागविण्यासाठी बाहेरची स्त्री का व कशासाठी इतकी तत्पर असते??? 

वेश्या व्यवसाय म्हणजे स्त्रीने पैसे घेऊन स्व संमतीने, व स्व संमतीने पुरुषाने केलेला एकप्रकारे बलात्कारच आहे. वेश्या व्यवसाय, स्त्री अत्याचार काय असते, व त्याचे समाजव्यवस्थेतील परिणाम काय होतात, हे समजून घेण्याचे मोठे प्रवेशद्वार आहे. जवळपास केलेल्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले आहे की, वेश्या कमाई करत असल्या, चैनीचे जीवन जगत असल्या तरी 80% वेश्यांवर रोजच बलात्कार होतो. कधी-कधी हा हिंसाचार इतका बळावतो की अनेकदा त्यांना खूनाचा देखील सामना करावा लागतो. सेक्स वर्कर्स म्हटले म्हणून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली असती तर इतक्या अपमानास्पद वागणूकीला त्यांना सामोरे जावे लागले नसते. स्त्रियांच्या बाबतीत समाजाने आजतागायत टिकून ठेवलेली सर्वात घाणेरडी व लांछनास्पद व्यवस्था आहे, ज्यात स्त्री व पुरुष दोन्ही भरडले गेले आहेत. 

वेश्यांना समाजात आदराचे स्थान मिळावे विविध संघटना काम करताना दिसतात. आता तर समाजात त्यास आदराचे स्थान निर्माण व्हावे म्हणून सेक्स वर्कर्स संबोधण्याची अट घातली आहे. अरे, मूर्ख सरकार नावात बदल केल्याने तिच्या कामात बदल होणार आहे का??? तेच शरीर व त्यावर रोज पडणारे हजार निर्लज्ज मुडदे. वेश्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, संघटना हजर. वैश्यांमुळे एड्स ग्रस्तांची समस्या निर्माण झाली म्हणून कित्येक संघटना गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम्सचे पॉकेट, आयपिल गोळ्या त्यांना मदत म्हणून पाठवत असतात. परंतु, समस्यांना मुळासकट नष्ट करायचे याबद्दल कुणीही स्त्रीवादी स्त्री व स्त्रीवादी पुरुष संवाद साधताना दिसत नाही. 

अभ्यास करताना असेही निष्कर्ष आढळून आले की, असंख्य प्रश्नांचे वर्तुळ पूर्ण करून काही महाभाग विचारवंताना असे वाटते की, वेश्या आहेत म्हणून भारतात विवाह संस्था टिकून आहे, सामान्य स्त्रियांवरील बलात्काराचे प्रमाण कमी झाले आहे, विनयभंग करणार्‍यांची संख्या कित्येक पटीने खालावली आहे. इत्यादी. इत्यादी. खुळचट व अर्धवट एखाद्या विषयाचे, गांभीर्य लक्षात न घेता केलेले आकलन असे संदर्भ देऊ शकतात. पुरुषांची लैंगिक मक्तेदारी टिकून ठेवण्यासाठी अशा संदर्भांना स्त्रीवादी स्त्रियाही खतपाणी घालतांना दिसत आहेत. तमाशा, बाॅलीवूड, पोर्न इंडस्ट्री, इत्यादी कलेच्या नावाखाली स्त्रीचे रोजच शोषण होत आहे. न्यूड सीन देणे, ही ऍक्टिंग असेल तरी, माझ्या मते, पैसे घेऊन तुम्ही स्वतःला पडद्यावरच्या वैश्या आहात हे सिद्ध करत आहात. ऍक्टिंग, मनोरंजनाच्या नावाखाली चालले हे प्रकार समाजाचे अधःपतन करण्यास हातभार लावत आहे. 

वेश्या, आजची स्त्री व आजचा पुरुष समाजातील एक वास्तव आहे. कूटाणखाण्यात अहोरात्र लाल दिव्याच्या मंद अंधारातील खाटेवर तडफडणारे तिचे शरीर, व नैतिकतेचा मुखवटा धारण करून समाजात वावरणारा पुरुष, कधी ही व्यवस्था उखडून टाकणार आहेत??? लैंगिकतेच्या साखळीत अडकलेली स्त्री व पुरुष दोघांनी मिळून ही साखळी खंडित केली तर किती मोठा आदर्श देशभरात निर्माण होईल. परंतु, एकट्या स्त्रीने हे बंड करून चालणार नाही तर, मुळापासून ही साखळी खंडित करण्यासाठी पुरुषांनी सभ्यतेचा मुखवटा गाळून ही व्यवस्था उलथून टाकण्यास सुरुवात केली पाहिजे. भारतातील वास्तविक असणारी समाजिक दडपशाही, राजकिय दडपशाही, आर्थिक दडपशाही यातून स्त्रीच्या मुक्तीचा मार्ग शक्य झाल्यास ही व्यवस्था तिच्याकडूनही दडपण्यात वेळ लागणार नाही. गरजेचे आहे ते फक्त, सामाजिक नियमांच्या कसोटीत स्त्रीने अडकविलेल्या शरीरातून मुक्त होणे व पुरुषाने लैंगिकतेच्या अवास्तव अपेक्षेतून स्वतःचे निराकरण करणे… ✍️

संदर्भ :
1) ब्रिटानिका
2) Data And Facts Of NACO 
3) The Second Sex ~ Simanundi Behaviour 
4) मराठी विश्वकोश 
5) The Indian Express 






Comments

  1. छान लिहिलंय..वास्तवदर्शी समाजाचं आणि पुरुषाचं दिगंबरचित्र

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली