रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार
कोलकता येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून 'रीक्लेम द नाइट' प्रदर्शनाचे आयोजन मुंबई मध्ये हिरेनंदानी गार्डन्सच्या महिलांनी केले. परंतु, झाले काय इथल्या उच्चभ्रू महिलांनी जयभीम नगरच्या महिलांना या प्रदर्शनात सामील करून घेण्यास नकार दिला आणि कारणे काय सांगितले, तर "तुमची समस्या इथे उपस्थित असलेल्या समस्यांपेक्षा वेगळी आहे", "हिरेनंदानी गार्डन्सच्या निवासी महिलांनी हे प्रदर्शन विशेषत: हिरेनंदानी संकुलातील रहिवाशांसाठीच आहे. सगळीकडे घटनेचा निषेध होत असताना, जय भीम नगर स्लममधील महिलांनी या प्रदर्शनात सामील होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. इतकेच नव्हे तर, या महिला रहिवाशांनी त्यांच्याकडून प्लाकार्डस् काढून घेतले आणि त्यांना प्रदर्शन स्थलावरून काढून टाकले.
विचार करा... महिला महिला जर महिलांच्या समस्येसाठी एकत्रित येऊन प्रदर्शन करत असतील, तर इथे जातीचा संबध यावा का? संपूर्ण महिला एक महिला म्हणून स्त्री समस्येसाठी झगडत असेल तर, परंतु दलित, वंचित महिलांकडे जातीय विषमतावादी दृष्टीने बघून त्यांना हाकलून लावले जाते.
खरंच, ह्या समस्या अशाने सुटणार आहेत का?
स्लममधील महिलांनी आपल्या संघर्षाची कहाणी द वायरला सांगितली आहे, आपल्या मराठी मीडियाला जातीचा किडा आहे, ते अशा बातम्या देतील तर नवल होईल. स्लम महिलांचे म्हणणे असे आहे की, हिरेनंदानी गार्डन्सच्या महिलांनी त्यांच्या समस्यांना मान्यता दिली नाही. जयभीम नगर स्लममधील महिलांचे घर जून 6 रोजी तोडण्यात आले होते आणि त्यामुळे त्या भर पावसात उघड्यावर राहायला लागल्या होत्या. या महिलांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली स्थिती आणि सुरक्षिततेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. जयभीम नगर मधील महिलांच्या समस्या वेगळया असल्या तरी, समस्त महिलांच्या सुरक्षेचा विचार करतांना, त्याच वेळी सर्व महिलांचे समानपणे संरक्षण आणि अधिकार सुनिश्चित करणे आवश्यक नाही का?
कोलकता मध्ये काय झाले, याची उच्चभ्रू महिलांना चिंता, पण त्यांच्या जवळ असलेल्या इतर महिलांना नीच वागणूक. नेमकी कोणत्या न्यायासाठी मागणी चालू आहे? महिला सुरक्षेसाठी आवाज उठविण्याऱ्या ह्या महिला प्रत्यक्षात मात्र स्वतःताच्या उच्चभ्रू जातींच्या पलीकडे पाहण्याची यांची मानसिकता ठेवली नाही. म्हणूनच खेदाने म्हणावेसे वाटते, आपल्याकडे बलात्काराच्या घटनेला देखील जातीच्या कचाटय़ातून बघावे लागते कारण, जितका संघर्ष एका उच्च जातीतल्या महिलेवर बलात्कार झाल्यावर न्याय मागण्यासाठी होतो, तितका संघर्ष दलित, आदिवासी महिलांवर बलात्कार झाल्यावर होत नाही. कारण, इथे न्याय मागण्यासाठी देखील जात फॅक्टर काम करतो. म्हणून आजही खैरलांजी, हाथरस सारख्या घटनांमध्ये न्याय मिळत नाही.
आता जातीय भेदभाव कुठे राहिला, असे म्हणणे खूप छान आणि गोड वाटते, पण अशा जेंव्हा घटना घडतात तेंव्हा भारताची खरी सर्वसमावेशकता उघडकीस पाडते. आपल्याच जातीचे वर्चस्व, आपलीच दडपशाही, आपलाच लोकांच्या समस्या महत्वाच्या, इतर लोकांच्या समस्येवर कोणी तोंड उघडला देखील तयार नसते आणि वरून जातीचे मुद्दे काढले की आपल्याच जातीयवादी ठरवले जाते. म्हणून, हे गांधीवादी, नेहरूवादी, पुरोगामी मार्क्सवादी लोक ढोंगी वाटतात. एकानेही या घटनेवर का लिहिले नाही? गांधी आणि आंबेडकर संबधावर लिहितांना यांचे हात थांबत नाहीत आणि अशा घटना घडतात तेंव्हा यांच्या लेखणीतून शब्द बाहेर पडत नाहीत.
प्रत्येक महिला ही एक व्यक्ती असते, आणि तिच्याकडे एक व्यक्ती म्हणूनच पाहिले पाहिजे. अशा घटनांना तोंड देण्यासाठी महिला महिलांमधील भेदभाव समाजाने जो आखला आहे, ते तोडणे आवश्यक आहेत. सामाजिक न्याय आणि समानतेची तत्त्वे फुलवण्यासाठी, समाजातील प्रत्येक महिलांच्या समस्यांना मान्यता देणे आणि एकमेकांचे दुःख समजून घेणे आवश्यक आहे. जातीय असमानता आणि सामाजिक विभाजन कमी करण्यासाठी, अधिक समावेशकता आणि सहकार्याची गरज आहे. अन्यथा, या भेदभावाचा परिणाम समाजातील प्रत्येक गटावर होईल आणि एक सकारात्मक बदल घडवणे अत्यंत अवघड होईल.
Comments
Post a Comment