पुरुष दिन...
प्लेटो म्हणतो , "आपण समाजाच्या नियमांनी बांधलेले गुलाम असतो , जोपर्यंत आपण आपल्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा शोध घेत नाही." प्लेटोचा हा विचार पुरुष दिनानिमित्ताने पुरुषांना तंतोतंत लागू पडतो. समाजाने पुरुषांसाठी ठरवलेल्या चौकटीबाहेर पुरुषाने जगायचे ठरवले तरी , त्यांच्या स्वाभाविक स्वातंत्र्याच्या मर्यादेबाहेर ते जगू शकत नाहीत. कर्तव्याचे ओझे , जबाबदारीची चौकट , आणि भावनाशून्यतेचा मुखवटा एकाचवेळी ते अनेक बाबींचा सामना करतात. लहानपणापासून पुरुषांना शिकवले जाते , 'तू मुलगा/पुरुष आहेस आणि तू रडू शकत नाहीस.' अशाप्रकारे त्यांच्यावर तिथूनच कर्तव्याची जबाबदारी टाकली जाते आणि कधीही रडू नको म्हणून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्याची इच्छा मारली जाते. पुरुषांच्या वेदना , संघर्ष , जबाबदारी , यापलिकडे पुरुषांचे माणूस म्हणून अस्तित्व स्विकार करण्यासाठी पुरुषांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे , मी माणूस म्हणून कधीतरी जगतो का? मलाही भावना आहेत , कधीतरी माझे मन मोकळे केले आहे का? सर्वांच्या नजरेत मी खुश राहावे म्हणून मी माझे मन मारून का जगतो? आई - वडील , बहीण , भाऊ , बायको , प्रेयसी यांची जबाबदारी घेता-घेता माझ्या भावनांना मी किती महत्व देतो? ज्या पद्धतीने एखादी स्त्री रडून पुरुषांकडे मन मोकळे करते , तसे मी का माझे मन स्त्रीकडे मोकळे करू शकत नाही? स्वतःच्या यशस्वी बाह्य प्रतिमेच्या मागे दडलेल्या भावनिक पुरुषांचे मन कधीही कोणाला दिसत नाही आणि ते शोध घेण्याचा देखील कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळेच आजही पुरुषांच्या संघर्षांना , त्यांच्या वेदनांना , त्यांच्या अपयशाला समाजामध्ये जागाच नाही. अपयशी पुरुषाला समाज स्वीकारत नाही. त्यामुळेच तो सतत धडपड करतांना आपल्याला दिसतो. चौकटीबाहेर पडून काम करणार्या पुरुषांना समाजाच्या नजरा आणि अपेक्षा त्यांना मोकळे होऊ देत नाही. इतिहासात डोकावले तर , स्त्रीसत्ताक राज्यात पुरुषी मानसिकता उफाळून आल्यामुळे स्त्रीसत्ताक राज्य कोलमडून पुरुषसत्ताक राज्य आले आणि इथे स्त्रियांचे दमन सुरू झाले. परंतु , त्यापलीकडे जाऊन मी तर असे म्हणेल आता पुरुषांच्या पुरुषसत्ताक राज्यामध्ये केवळ स्त्रियांचे दमन होत नसून पुरुषांचे देखील तितकेच दमन होते. इतिहासात पुरुषांनी स्त्रियांचे शोषण केले , त्यामुळेच आजही पुरुषांकडे त्याच नजरेतून समाज बघतो. पुरुष म्हटले की एक अनामिक भीती स्त्रीच्या मनात देखील दडलेली असते , त्यामुळेच स्त्री - पुरुष यांच्यात मोकळे नाते तयार होऊ शकत नाही , कारण एकमेकांना माणूस म्हणून बघितले पाहिजे , ही भावनाच रुजलेली नाही. सन्मान मिळून देण्यासाठी व्यवस्थेचे वाभाडे काढणारे बाबासाहेब ह्या सर्व पुरुषांनी स्त्रीसाठी धडपड केलेली आहे आणि म्हणून ते महापुरुष ठरलेले आहेत. आता समाजात स्त्रियांचीच नाहीतर पुरुषांचीही पुनःस्थापना होणे गरजेचे आहे. विषमतेचे बळी केवळ स्त्रीच नाहीतर आता पुरुष देखील ठरलेले आहेत. त्यामुळेच आज कर्तुत्वाच्या आड दडलेल्या सर्व पुरुषांच्या वेगवेगळया भूमिका रोज सोशल मीडियावर पाहायला मिळतात , विशेषतः त्या मुलांचे मला नवल वाटते , मुली जरी थोड्या प्रमाणात व्यक्त होत असल्या तरी सामाजिक , राजकीय , आर्थिक बाबींवर पुरुषांचेच प्रमाण व्यक्त होण्याचे जास्त आहे. त्याचबरोबर इतके सांभाळून देखील ते कितीही थकलेले ( गृहीत धरते 🤭) असले तरी मुलींना जेवलीस का? यासारखे प्रश्न विचारून मुलींची काळजी घेतात आणि मुलगी हो म्हणाली तर मनोमन आनंदी होतात. ही मंडळी इतक्या साध्या मनाची आहेत की , उत्तर हो आले तर रोजच Dm मध्ये तिला जेवलीस का? विचारल्याशिवाय ते जेवणच करत नाहीत. ओळख नसताना देखील मुले मुलींना आनंदी ठेवण्याचा आणि स्वतःला निष्फळ आनंद देण्याचा प्रयत्न करतात आणि या बरोबरच तिच्या सोबत भावी आयुष्याचे स्वप्न देखील रंगवत असतात. पण वास्तविकता अशी आहे की , पुरुषांना मनमोकळे करण्याची परवानगी मिळत नसल्यामुळे हे त्यांचे प्रश्न आणि काळजी व्यक्त करण्याचे साधे-भोळे प्रयत्न , हेच त्यांच्या बोलक्या व्यक्तिमत्त्वाचे पुरावे आहेत. आजही मुलींनी शुभेच्छा दिल्या नाही , लेख लिहिला नाही म्हणून नाराज असलेल्या मुलांचे Tweet दिसत आहेत आणि म्हणून ते स्वतःच स्वतःला शुभेच्छा देऊन व्यक्त होत आहेत. पुरुषांच्या या मनोवस्थेकडे बघता एकच वाटते , आजचा दिवस फक्त गौरवगान करण्याचा नसून , पुरुषांच्या मानसिक , भावनिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे. पुरुषांना देखील आपल्यातील , 'मी माणूस आहे' ही जाणीव झाली की त्यांचे स्वतंत्र प्राप्त होईल. प्लेटोच्या विचारांना अनुसरून , स्वाभाविक स्वातंत्र्याचा शोध घेतलेला पुरुष समाजाला एक नवा दृष्टीकोन देईल आणि या शोधात , कर्तृत्वाच्या आणि कर्तव्याच्या जोखडाखाली दबलेल्या पुरुषांना आपले खरे माणूसपण सापडेल.
जागतिक पुरुष दिनानिमित्ताने माझ्या सर्व
पुरुष Followers मंडळीना जागतिक पुरुष
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 🌸 💚🙏🏻
Comments
Post a Comment