दाभोळकरांचे कार्य : वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक पुनरावलोकन
दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदे लागू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उदाहरणार्थ, 2013 मध्ये "महाराष्ट्र अंधश्रद्धा निवारण कायदा" लागू करण्यात आला. या कायद्याच्या अंतर्गत, अनेक अंधश्रद्धा आणि अंधविश्वासांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे, जसे कि हकीम, बाबाजींचे दावे, आणि अंधश्रद्धा प्रोत्साहन करणारे आयोजन यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्यावेळी दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ चालवली त्याचवेळी दलित पंथर संघटना देखील काम करत होती. दलित पँथरचे काम जातीय अत्याचाराच्या विरुद्ध काम करणे होते तर, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम अंधश्रध्दा दूर करणे होते. खरंतर एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या जगण्यातील तीव्रता आपली चळवळ आणि आंदोलनाची दिशा ठरवत असते.
आता बघुया दाभोळकरांच्या आंदोलनाची दिशा-
दाभोळकरांनी अंधश्रद्धेची चळवळ उभी केली, परंतु कोणती चळवळ? Plaster of Paris च्या ऐवजी मातीचा गणपती बसवला, पण बसवला गणपतीच ना. याच्यात कोणते अंधश्रद्धा निर्मूलन झाले? यामध्ये फक्त गणपतीचे माध्यम बदलले Plaster of Paris च्या ऐवजी मातीचा गणपती. इथे कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला? Only Material Changed... अंधश्रद्धेचे खूळ तसेच राहिले. जे गणपती शाळेच्या परिसरापासून दूर होते ते गणपती पर्यावरणाच्या नावाखाली मातीच्या माध्यमातुन शाळेच्या स्टेजवर आलेत. मुलांच्या मनावर वैज्ञानिक दृष्टिकोन कुठे कोरला जातोय? उलट गणपतीच्या भाकडकथा मुलांच्या बालमनावर कोरल्या जात आहेत. चिकित्सक बुद्धीने विचार केला तर, आपल्या लक्षात येईल की हे संविधानाने जे Scientific Temperament सांगितले आहे, त्याच्या विरोधात हे नाही का?
दाभोळकर रामाचे देखील असेच महत्व पटून देत आलेले आहेत. संघाचा राम वेगळा, गांधीचा राम वेगळा. आपल्याला इथे हा प्रश्न पडायला पाहिजे की दोघांचे राम वेगवेगळे असले तरी शेवटी ते रामाबद्दलच सांगतायत ना? इथे कोणता विवेक दिसतो आपल्याला? रामाने शंबूकाला नाहक ठार केले, केवळ तो शूद्र होता म्हणून आणि त्याच रामाचे दोन चारित्र्य सांगून आपल्याला शेवटी रामाचीच भक्ती करायला सांगतात ना? मग इथे लोकांच्या मनातील कोणती अंधश्रद्धा दूर झाली आणि कोणता विवेक जागृत झाला? हे तुम्हीच ठरवा आता. इथे कोणताही विवेकी सल्ला नसून उलट मला आध्यात्मिक मार्केटिंगच दिसले.
माझ्या खुपदा निरीक्षणात आले की विद्यार्थी अभ्यास न करता, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत भाग घेतात, काम करतात पण त्यांच्या स्वतः मध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झाला का हा प्रश्न आहे. कारण, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय Plaster of Paris चा गणपती सोडून मातीचा गणपती बसविणे असा होत नाही, की संघाचा राम वेगळा आणि गांधीचा राम वेगळा असा त्याचा अर्थ होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला राम, कृष्ण, गौरी, गणपती, हे असले पौराणिक नायक नायिका मुळासकट नाकाराव्या लागतील कारण तेंव्हाच तुम्ही तुमच्या डोक्यातील अंधश्रद्धेचे भूत नष्ट होईल.
बाबासाहेबांचा संदर्भ देऊन दाभोळकरांचे वैचारिक पैलू आपल्याला सांगितले जातात. परंतु इथे असे मांडण्याचा प्रयत्न करणार्यांचा स्वतःचाच वैचारिक गोंधळ दिसून येतो. कारण, बाबासाहेबांनी दीक्षा देताना ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यात, मी राम, कृष्ण, गौरी, गणपती यांना मानणार नाही त्यांची उपासना देखील करणार नाही अशी प्रतिज्ञा मानव समुहाला दिली. इथे बाबासाहेबांनी मुळासकट असल्या तत्सम नायक एका झटक्यात बाद केले, तिथे दाभोळकरांनी मात्र हे नायक मुळासकट नाकारले नाहीत. मग प्रश्न उरतो, कोणता विवेकवादी दृष्टिकोन आणि कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन?
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारताना धार्मिक परंपरांच्या बदलाचा मुद्दा उचलला. बाबासाहेबांनी 'रिड्यूसिंग अंधश्रद्धा' या तत्त्वात बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब केला आणि अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या विरोधात एक ठोस दृष्टिकोन तयार केला. त्यामुळे, दाभोळकरांनी बाबासाहेबांच्या विचारसरणीचा अवलंब केला असे म्हणणे थांबविले पाहिजे.
'अंधश्रद्धा निर्मूलन'च्या कार्यशाळांनी आणि प्रचाराने काही लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये सुधारणा केली आहे, पण अनेक चुकीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा कायम आहेत. 2017 च्या एका संशोधनात, भारतातील 60% लोक अद्याप धार्मिक परंपरांचे पालन करतात, जरी त्यांनी अंधश्रद्धा विरोधी कार्यशाळांमध्ये भाग घेतला असला तरी.
दाभोळकरांच्या मुलाने देखील मनाच्या स्वास्थ्यासाठी रामदासाचे श्लोक वाचायला सांगितले होते. मनाच्या स्वास्थ्यासाठी, कबीर रोहिदास, तुकाराम वाचायला का सांगत नाही तो? रामदास स्वामीने अंधश्रद्धा दूर केली का? काय तीर मारला त्याने की त्याचे श्लोक वाचायचे बाकी राहिले होते? ब्राम्हणवादी आणि हिंदुत्वाला प्राथमिक अवस्थेत ज्याने विकसित केले तो रामदास स्वामी आहे. अंधश्रध्दा निर्मूलन असे असते का? विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरली म्हणणारे रामदासांच्या श्लोकांचे पारायण करायला सांगणारे असले पुरोगामी लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन मुळासकट करणार की नाही हा प्रश्न विचारायला हवा.
लक्षात घ्या कोणत्याही अंधश्रद्धा अशा कार्यशाळा आयोजित न करताही, त्यासंबंधी कोणत्याही पुस्तकांचे पारायण न करता अशिक्षित लोक, अडाणी, गावकुसाबाहेर असणार्या मंडळीनी एका झटक्यात बाबासाहेब आणि बुद्धांना स्विकारणाऱ्या लोकांनी सगळया प्रकारच्या अंधश्रद्धा नाकारताना दिसतात, इतकेच नव्हे तर उघड विरोध करतात. आता इथे काय या लोकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या नाहीत. परंतु सर्वण पुरोगामी म्हणून ज्यांना तुम्ही डोक्यावर घेता ते तुम्हाला असा डायरेक्ट मार्ग कधीच सांगणार नाहीत कारण त्यांना मूळ तसेच ठेवुन वरवरचा बदल त्यांना अपेक्षित असतो. सगळे धर्म सारखेच म्हणणारे पुरोगामी कोणता धर्म वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो, हे देखील सांगणार नाहीत, कारण, आपला हिंदू धोक्यात येईल ही भीती असते.
अंधश्रद्धा निर्मूलन किती झाले, हे अनिस आणि त्यांच्या टीमला माहिती. आता गणपती गेला, राम गेला आणि आता जागोजागी स्वामी समर्थांचे भूत बायकांच्या डोक्यावर चढले आहे. त्याला खतपाणी घालणारे देखील असेच म्हणतात आम्ही अंधश्रद्धा बाळगत नाही, आणि दोन मिनिट लिहायला वेळ आहे का म्हणून तुमच्या अडचणी स्वामी दूर करतील म्हणून महिला पारायणच्या पारायणं स्वामीच्या केंद्रात जाऊन करत आहेत. त्यासाठी म्हटले, आपली बुद्धी जोपर्यंत कोणत्या वाईट गोष्टीला मुळासकट नाकारत नाही तोपर्यंत त्याच्यात असे नाहीतर असे गुरफटत राहणार. मराठी अभिनेत्रींचे अखंड स्वतंत्र असे स्वामीचे केंद्रच आहे. समाजातील तुमच्या भूमिका स्पष्ट नसतील तर, तुम्हाला वाचून, पाहून समाज काय स्पष्ट भूमिका घेईल?
शेवटी एकच सांगते, पेरियार म्हटले होते, "हिंदू धर्मात सुधार होणे शक्य नाही, तो नष्टच केला पाहिजे." हिंदू धर्मात सुधार करू पहाणार्या लोकांनी दाभोळकरांना नष्ट केले, ते त्यांच्याच लोकांनी आणि नंतरही ज्या भूमिका माध्यमांनी घेतल्या, नागरिकांनी देखील शांतता बाळगली त्यावरून तरी पेरियार यांच्या विधानाला बळकटी देते. दाभोळकर यांची अनिस कुठपर्यंत काम करेल आणि कितपत असे काम करेल हे येणारा काळ ठरवेल, परंतु दिवसरात्र तिथे काम करणार्या भाबड्या मुलामुलींनी विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम करायचे असेल तर बाबासाहेब आणी बुद्ध अंगीकारल्या शिवाय पर्याय नाही. कारण, अंधश्रध्दा निर्मूलन मुळासकट करायचे असते, ना की दाभोळकरांसारखी सौम्य अंधश्रद्धा बाकी ठेऊन.
Comments
Post a Comment