धर्मांतर...
बाबासाहेबांचे धर्मांतर केवळ धार्मिक पद्धती बदलण्याचा निर्णय कधीही नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा होता. अस्पृश्यतेचा प्रश्न हिंदू धर्मातील एका धार्मिक पद्धतीने सुटणार नव्हता, त्यासाठी संपूर्ण सामाजिक व्यवस्थेत बदल घडवून आणणे गरजेचे होते. हिंदू धर्मातील अनेक नेत्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नावर काही वरवरचे उपाय सुचवले होते, परंतु त्या उपाययोजनेतून किती हिंदू सुधारले? मोठा प्रश्न आहे. उलट, या नेत्यांनी अस्पृश्यतेचा विचार फक्त धार्मिक श्रद्धेतूनच सोडवता येईल, असा मोठा भ्रम निर्माण केला. बाबासाहेबांनी मात्र या विचारसरणीचा तीव्र विरोध केला, आपल्या मुक्ती कोण पथे मध्ये बाबासाहेब म्हणतात, हिंदू धर्मात राहून हिंदूना सुधारणा करतो, म्हणणारे मला अर्धवट विचारांचे वाटतात आणि मला त्यांचा आता तिटकारा आला आहे. हिंदू धर्मातील सुधारकांनी अस्पृश्यतेला 'कलंक' म्हटले, परंतु एकाही नेत्यांनी, तथाकथित सुधारकांनी हिंदू धर्मालाच कलंक म्हणण्याची हिंमत दाखवली नाही. बाबासाहेबांनी मात्र स्पष्टपणे सांगितले की, हिंदू धर्मच विषमतेचा, शोषणाचा आधार आहे, त्यामुळे त्यात सुधारणा शक्य नाही. आजही धर्मांतर करून तुम्ही काय साधले, हा प्रश्न पुरोगामी आणि प्रतिगामी लोकांकडून सातत्याने विचारला जातो. यामध्ये, शरद पाटील, तर म्हणतात बाबासाहेबांनी जाती अंत कुठे केला, जाती अंताचा प्रश्न धर्मांतरावर सोपविला. इथे, शरद पाटील देखील बाबासाहेबांचे धर्मांतर समजून घेण्यात कमी पडले, परिणामी त्यांचे अनुयायी देखील ह्याच प्रश्नांची री ओढत असतात. यातून एकच निष्पन्न होते की, बाबासाहेबांच्या कृतीमागील व्यापक विचार आणि त्यातून पुढे आलेल्या सामाजिक क्रांतीची थोडीही जाणीव त्यांना झाली नाही. धर्मांतर म्हणजे केवळ धार्मिक विधींचे पालन बदलणे नव्हते, तर तो संपूर्ण समाजासाठी एक नव्या प्रकारचा दिलेला एक दृष्टिकोन होता. धर्मांतराने काय साधले, विचारणारे लोक अजून ब्राम्हणी लोकांच्या उष्ट्या हाताचा सत्यनारायणाचा महाप्रसाद खातात, त्या लोकांना, अजून ब्राम्हणी लोकांचे वर्चस्व झुगारता आलेले नाही आणि बाबासाहेबांच्या धर्मांतरावर टीका करतात. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना. धर्मांतराचा सल्ला दिला की म्हणतात, "धर्मांतराची गरज काय आहे?", "आता लोक निधर्मी होत आहेत" असे बोलतात आणि वरून म्हणतात, आम्ही हिंदू असलो तरी आम्ही बौद्ध विचार Fallow करतो. मला एक कळत नाही, हिंदू धर्मात तुम्ही जन्म झाला, मग तुम्हाला बौद्ध विचारांची गरज का पडते? Common Sense काही आहे की नाही? हिंदू धर्माच्या चष्म्यातून बौद्ध धर्माला बघणारे लोक, बौद्ध धर्माचा महत्वाचा भाग समजून न घेता त्याला भक्तीच्या मार्गात गुंडाळून ठेवतात. परंतु, बौद्ध धर्माचा सर्व पाया हा नीतिमत्तेवर आधारित आहे. सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा बौद्ध, नीतिमान समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा धर्म आहे, ज्यात सगळे समान आहेत. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, धर्मांतर बाबासाहेबांनी एका नव्या समाजाच्या निर्मितीसाठी केलेली पहिली पायरी होती, ज्यातून विषमता, शोषण आणि जातीयता यांचा नाश त्यांना करायचा होता आणि धर्मांतरातून उत्पन्न झालेली धम्मक्रांती आज वैयक्तिक साधनेसाठी नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठी एक मार्ग आहे. हे समजून घेणेच धर्मांतर विचाराचे खरे आकलन आहे.
Comments
Post a Comment