परंपरेच्या चौकटीत अडकलेली स्त्रीशक्ती
आजपासून नवरात्र महोत्सव सुरू झाला. नवरात्रीच्या सणामध्ये नऊ दिवस स्त्रीच्या शक्तीचे गुणगान गाणे, तिच्या विविध उपमांद्वारे तिच्या प्रतिमा निर्माण करणे हे समाजाची एक परंपरा बनली आहे. या दिवसांमध्ये आदी शक्तिच्या नावाखाली परंपरा, संस्कृती म्हणून एका स्त्रीचे महत्व रटाळ पद्धतीने पटून दिले जाते. शेतकरी जातींचे सण, सीतेची पूजा म्हणजेच काळ्या जमिनीची पूजा विविध संदर्भात तुम्हाला ऐतिहासिक महत्व या उत्सवात मांडून स्त्री शक्तीचे गुणगान गायले जाते. हे सगळे मांडण्यात आजकाल चांगले विचारवंत पुढे यायला लागले आहेत. विविध सणाच्या निमित्ताने आपण परंपरा, संस्कृती आणि मूल्ये कशी जपली पाहिजेत हे इथल्या स्त्रियांना कळले पाहिजे वगेरे बोलणारे. परंतु, परंपरा, संस्कृती आणि मूल्ये जपणारी स्त्री कशी भरडली जातेय यावर कुणीही विचारवंत मत मांडत नाहीत. सणानिमित्ताने आज कोणती साडी, उद्या कोणता रंग यासारख्या बाह्य गोष्टींवर जोर देणे आणि त्याची ऐतिहासिक बाजू सांगून स्त्रीला गुरफटून ठेवणे, हेच निरंतर सुरू आहे. सुशिक्षित असो वा निरक्षर, उच्च वर्णीय स्त्रीवादी स्त्रिया देखील या परंपरेत मूग गिळून गप्प बसलेल्या असतात. हे सर्व करून स्त्रीच्या जीवनात कोणता विशेष बदल घडणार आहे? विचारवंत म्हणून समाजात मिरवणारे स्त्रीचे मूल्यमापन बाह्य गोष्टींवर अधोरेखित करतात. सणाच्या निमित्ताने संस्कृती, परंपरा आणि मूल्ये यांच्याशी स्त्री किती निगडित आणि तिने ते जपले पाहिजे, अशा शब्दांत विचार मांडून तिला गुलामीत ढकलतात. पुरातन संस्कृतींमध्ये स्त्रीला महत्त्व दिले गेले असले तरी, आजच्या संदर्भात तिचा आवाज तर दाबला जात आहे. नेहमी स्त्री विचारांचे महत्त्व मांडताना, तिला परंपरा आणि संस्कृतीच्या आधारेच मांडण्यात येते. परंतु, परंपरा, संस्कृती, मूल्ये मानवनिर्मित असून त्याद्वारे स्त्रीचे मूल्यांकन करणे कितपत योग्य आहे? यावर विचार केल्यास, एक लक्षात येईल, समाजात स्त्रीला अजूनही व्यक्ती म्हणून मान्यता दिली जात नाही, तर तिला संस्कृतीच्या सापेक्ष ठेवले जाते. खरंतर, तिला संस्कृतीनिरपेक्ष दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे. त्यामुळे, तिचा खरा आवाज समजून घेतला जाईल, आणि स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात मान्यता मिळेल.
जय भीम ! 🙏🏻
Comments
Post a Comment