पुरोगामीतत्व व अंतर्गत दांभिकता...

पुण्यात मराठ्याच्या मुलाला रूम शोधताना ब्राह्मण कुटुंबियांनी रूम नाकारली म्हणून, स्पेस वर काही बहुजनांनी / पुरोगामी लोकांनी त्यांचे जाती भेदाचे अनुभव सांगितले. विशेष मला यात काय वाटले असेल तर ते, म्हणजे मराठ्यांना आता कळतेय, जातिभेद काय असतो तो, कारण आजपर्यंत मराठ्यांनी सुद्धा कमी जातीभेद केला नाही. फुटक्या कपात चहा देणे, दलितांच्या लग्नात न जेवणे, दलितांना घराच्या बाहेरच्या बाहेरूनच हाकलून लावणे, दलितांच्या हातात पैसे वरून फेकणे, दलितांच्या मुला-मुलींना त्यांच्याशी प्रेम विवाह न करू देणे... अशी असंख्य उदाहरणे, मराठ्यांनी केलेल्या जातीभेदाची देता येतील. 

बहुसंख्य शिवाजी महाराजांना मानणारा मराठा, ब्राम्हणां सारखं जातीभेद कधी व केंव्हापासून, कितव्या शतकात करायला शिकला? हेच मोठे कोडे उलगडले नाही अजून.... मराठ्यांनी कधी स्वतःला ब्राह्मणांच्या रांगेत स्वतःला नेऊन बसविले, परंतु आता ब्राम्हणांनी त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे त्यांना आता आपल्यापेक्षा खालच्या जातीने काय भोगले असेल याची त्यांना जाणीव होत आहे. आजपर्यंत, ब्राह्मणांच्या आडून मराठ्यांनी जातीभेद केला नाही असे आपल्याला वाटते , परंतु दोष फक्त ब्राह्मणांना देऊन चालणार नाही, मराठे सुद्धा जातीभेद करण्यासाठी व तो जातीभेद टिकून ठेवण्यासाठी तितकेच कारणीभूत आहेत. 

बहुजन स्वतःला म्हणून घेणारे मराठे, बहुजनांमध्ये स्वतःला उच्चवर्गीय समजतात. जातीय उतरंड ह्याची सुरुवात इथून होते व पुढे जाऊन ते वाढत जाते. मराठ्यांचे बारकाईने निरीक्षण केले तर, आपल्या लक्षात येईल शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेऊन चालत असताना जाती द्वेष करू नका असे सांगितले असतांनाही दलितांना डिवचण्यासाठी तुम्ही आमची सात जन्म बरोबरी करू शकत नाही अशा स्वरूपाच्या रील बनवून, समाजात आणखी द्वेष निर्माण केला. शाहू महाराजांनी दलितांना आरक्षण दिले म्हणून, शाहू महाराजांचा द्वेष करणारे मराठे मी पाहिले. शिवाजी महाराजां इतके उच्च स्थान शाहू महाराजांना मराठ्यांनी दिले असेल असे क्वचितच आढळते. 
शाहू महाराजांना आज मराठ्यांपेक्षा दलितांनी जवळ केलेले आपल्याला आढळून येईल. दलितांच्या घरी, शिव, शाहू, फुले, आंबेडकर सर्व महापुरुषांचे फोटो लावुन दिसतील, परंतु मराठ्यांच्या घरी शिवाजी महाराजां व्यतिरिक्त इतर कुणाचाही फोटो दिसत नाही. 

सावकार, पाटिल, देशमुख, देवसरकर अशा श्रीमंत मराठ्यांच्या संस्था, कारखाने, शाळा कितीतरी बाबी आहेत. मी असेही श्रीमंत मराठे पाहिले, स्वतःच्या संस्था काढल्यात, व संस्थेतील कर्मचारी-वर्ग संस्थेच्या मालकाच्या घरच्या फरश्या पुसण्याचे काम करतो. कुठली मानसिकता आहे ही? म्हणजे, तुम्ही त्यांना संस्थेत सुद्धा राबवून घेणार व घरीही साफसफाई करायला सुद्धा लावणार? काय बोलायचे अशा मराठ्यांना? आरक्षण बाबतीत बोलायचे झाले तरी, श्रीमंत मराठे आम्ही कसे गरीब मराठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपडणार व गरीब मराठ्यांची स्थिती जैसे थे राहण्याची पुन्हा एकदा दाट शक्यता आहे. मराठ्यांनी आजपर्यंत सर्व क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे मग श्रीमंत असणारे मराठे का गरीब मराठ्यांना पुढे घेऊन जात नाही? खरंतर हा प्रश्न सर्वच समाजासमोर उभा राहतो. कारण, प्रत्येक समाजातील सुशिक्षित लोकांनी त्याच समाजातील लोकांना धोका दिलेला आहे. ब्राह्मणी वर्चस्वाची झळ मराठ्यांना सोसावी लागत असेल तर, दलितांना तर मराठा व ब्राम्हण दोन्ही ताकदीचा सामना करावा लागतो. 

राजकियदृष्ट्या सक्षमपणे असणार्‍या मराठ्यांनी स्वतंत्र मिळाल्यानंतर किती जाती निर्मूलन व्हावे यासाठी प्रयत्न केले. ब्राम्हणी वर्चस्व असले तरी, ब्राम्हणांनी मराठ्यांना व मराठ्यांनी ब्राम्हणांना सोबत घेऊनच राजकिय पोळी भाजलेली आहे. स्पेसवर बोलतांना काहीजण म्हणाले, जात निर्मुलन नाही, पण आम्हाला जातच नष्ट करायची आहे. पंरतु, कसे करणार आहात, याचा कुठलाही थेट अजेंडा कुणाकडे नाही आहे. एकजण अमेरिकेत बसून ट्विट करणार, एकजण मुंबईत बसून, एकजण कुठूनतरी खेड्यात बसून. जाती निर्मुलन व जात नष्ट करणे तुमचा अजेंडा असेल तर ठोस पावले उचलली पाहिजेत, त्यासाठी ट्विटर माध्यम आहे का? गरिबांच्या असंख्य लोकांकडे मोबाईल नाहीच आहे. स्पेस घेतांना तुम्ही स्वतःला सेलिब्रिटी समजत होतात व इतरांना सर्वसामान्य. मला तर काही हे कळलेच नाही? तुम्हाला खरंच, गावाबाहेर किती लोक ओळखतात यावर मला साशंकता आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचे असेल, तर आधी हा भेदभाव नष्ट करायला पाहिजे. 

ब्राह्मण्यवाद कधी नष्ट होईल माहिती नाही. परंतु, स्वतःला बहुजन, पुरोगामी म्हणणार्‍यांनी कनिष्ठ जातीबद्दल संशय घेणे, नेत्यांची चळवळींची बदनामी करणे, प्रसंगी शिव्या व शाप देत राहणे हेही ब्राह्मण्यवादाची प्रमुख लक्षणे आहेत, हे विसरून चालणार नाही. शिक्षण, प्रशासन, राजकारण, आर्थिक, औद्योगिक, इतिहास, साहित्य व कला इत्यादी ठिकाणी मराठा, दलित, पुरोगामी, बहुजन तरुणांची संख्या कमीच आहे. प्रशासनात जाणारे तरुण-तरुणी, ऐनवेळी माघार घेऊन चळवळीत, समाजकार्यात उतरतात व परिणामी व्यवस्थेत बदल करण्यासाठी पुन्हा ब्राह्मणांकडूनच अपेक्षा करतात. बदलाची सुरुवात स्वतःपासून न करता, स्वतःच्या घरातील लोकांपासून न करता समाजात बदल घडविण्याचे स्वप्न बघतात. बदलाची सुरुवात स्वतःपासून न करणार्‍या लोकांना तर समाजात बदल घडविण्याचा काही अधिकारच नाही. पिढी दर पिढीला बदल होत असतात, मग स्वतःच्या पिढीपासून कुणाला का बदल नको असतो? 

ब्राम्हणी लोकशाहीची जागा हळूहळू आता ब्राम्हणी हुकुमशाही घेत आहे. डावे, पुरोगामी, दलित, मराठा (स्पेशल Mention करण्याचे कारण, बहुजन समाजातील, मराठा स्वतःला बहुजनापेक्षा वेगळे समजतात व दलितांना बोलताना त्यांचा दलित म्हणून उल्लेख करतात.) कुणाची काही चूक नाही यात, महान प्राच्यविद्या पंडित शरद पाटील सुद्धा दलितांचा दलित म्हणून उल्लेख करायचे. शरद पाटील सुद्धा चुकले होते, ज्यांनी जाती, वर्ण व्यवस्थेवर बोट ठेवले. परंतु, अशा बाबींमुळे पुरोगामी, बहुजन समाज उघडकीस पडतो. फुले, आंबेडकरांचे जाती निर्मूलनाचे किंबहुना जाती नष्टाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, पुरोगामी, बहुजनांनी, कार्यकर्त्यांनी किमान स्वतःचे आधी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. समाजात बदल घडविण्याचे स्वप्न पाहत असाल तर, चिकित्सक बुद्धीने आधी पुरोगामी चळवळीतील ब्राम्हण्यवादी महत्वाकांक्षा नष्ट करून टाकावी लागेल... पुरोगामीतत्वातील अंतर्गत दांभिकता नाहीशी करावी... ✍️












Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली