धम्मक्रांती...
धर्मांतर म्हणणे आता खरंतर म्हणणे बंद केले पाहिजे.
कारण, धर्मांतराने माणसाचे केवळ श्रध्दा स्थान बदलतात , परंतु ज्यावेळेस आपण धम्मक्रांती म्हणू , त्यावेळी एक संपूर्ण समाजाच्या नैतिक आणि सामाजिक मूल्यांचे पुनर्निर्माण करण्याचा मार्ग त्यात दडलेला दिसेल. बाबासाहेबांनी धम्माला केवळ अध्यात्मिक दृष्टिकोनातून कधीच पाहिले नाही , तर त्यांचे उद्दिष्ट एका न्यायपूर्ण , समताधारित , आणि बंधुत्वावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करणे हे आहे.
मुक्ती कोण पथे मध्ये बाबासाहेब म्हणतात - "धर्मांतर हा केवळ मौजेचा विषय नाही. हा माणसाच्या जीवनातील निर्वाण साध्य करण्याचा प्रश्न आहे."
ते पुढे सांगतात की , धर्मांतराची तयारी अगदी जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात घेऊन जाण्याइतकीच गंभीर असते. बाबासाहेबांनी धर्मांतराचे विश्लेषण दोन प्रकारांनी केले : एक सामाजिक आणि ऐहिक दृष्टिकोनातून, दुसरे धार्मिक व तात्विक दृष्टिकोनातून. धर्मांतर हे राष्ट्रांतर किंवा वस्त्रांतर
नव्हे, अशी त्यांची ठाम आणि स्पष्ट भूमिका होती. आपले धर्मांतर ही अशी एका धम्म क्रांतीची सुरुवात आहे, ज्याचा उद्देश केवळ वैयक्तिक किंवा अध्यात्मिक मुक्तीसाठी नसून, ते एका नवा समाज उभारण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे आणि बाबासाहेबांनी दाखवलेला असा मार्ग आहे, जो न्याय, समता आणि बंधुत्वाच्या आधारावर एक नीतिमान समाज घडवतो.
बाबासाहेब आपल्याला बुद्धाकडे घेऊन जाताना, बुद्धाची इतर कुणाशीही तुलना न करता बाबासाहेबांनी बुद्धाला थेट कार्ल मार्क्सच्या शेजारी नेऊन बसविले. सर्व जग ज्या मार्क्सवादी विचाराने प्रभावित झाले, त्या मार्क्सला उत्तर देऊ शकणारा कोणी असेल तर तो बुद्ध आहे , कारण दोन्ही विचारसरणी अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढा देण्यावर भर देतात. बाबासाहेबांचा हा दूर दृष्टिकोन असा होता की धम्मक्रांती ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाचे मोठे साधन आहे, जिथे व्यक्तीचे मन आणि समाजाची संरचना दोन्ही सुधारली जातात.
धम्मक्रांतीच्या माध्यमातून, बाबासाहेबांनी मनुष्याला त्यांचे हरवलेले मानवत्त्व परत देण्याचे ध्येय ठेवले होते. समाजातील असमानता आणि अन्याय दूर करून नव्या सामाजिक, सांस्कृतिक, आणि राजकीय मुल्यांची मांडणी करण्याची बाबासाहेबांनी गरज व्यक्त केली. बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे उद्दिष्ट म्हणजे समाजात खरे परिवर्तन घडवून आणणे, जिथे समता, न्याय, आणि बंधुत्वाच्या तत्वांवर समाज चालेल आणि एक नवीन मनुष्यत्व निर्माण होईल.
धम्मक्रांतीचा हा प्रवास म्हणजे, समता, न्याय, आणि बंधुत्वाच्या तत्वांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी एक बौद्धिक आणि सामाजिक लढा आहे, ज्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🙏🏻
Comments
Post a Comment