सोज्वळ भांडवलदारी चेहरा रतन टाटा

रतन टाटांच्या मृत्यू नंतर सर्वांचा कंठ दाटून आला. तसे पाहिले तर, त्यांच्या औद्योगिक कार्यापेक्षा त्यांच्या साधेपणाचीच लोकांनी जास्त चर्चा केली. आजच्या घडीला, सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेत जगभरात केवळ पैसा कमावणे नव्हे, तर एक चांगला भांडवलदार म्हणून स्वतःला सोज्वळ, साधाभोळा आणि सुसंस्कृत म्हणून सिद्ध करणे ही नव्या काळातील एक यशस्वी रणनीती आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या "सोज्वळ" व्यक्तिमत्त्वाचे गौरवगीत गायले जात आहे. परंतु, वास्तवात, या सर्व मिथकांमागची सत्यता वेगळी आहे. 

रतन टाटांच्या नेतृत्वाखालील जमशेदपूर स्टील प्रकल्प हा एक मोठा उद्यम ठरला, पण या यशामागे स्थानिक आदिवासींचा प्रचंड गेलेला बळी आहे. स्टील प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी डिमना तलाव हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला, पण या तलावासाठी स्थानिकांची जमीन बळकावण्यात आली. स्थानिकांना जमीनबदलाची योग्य किंमत तर दिलीच नाही, उलट तलावामुळे स्थानिक इकोसिस्टीम बिघडली, ज्याचा परिणाम थेट त्यांच्या शेतीवर झाला. अडाणी आणि अंबानी यांच्या सारखेच, टाटा ग्रुपसारख्या प्रतिष्ठित उद्योगांनी सुद्धा गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांना न्याय न देण्याचे काम केले आहे. 

ओडिशाच्या कलिंगा नगरमध्ये देखील असेच घडले. कलिंगा नगरमध्ये स्टील निर्मिती प्रकल्पासाठी आदिवासींची जमीन हडपली गेली. आदिवासींना पैसे परत न देता त्यांच्या जमिनी बळकावल्या आणि आदिवासींनी विरोध केला तेव्हा गोळ्या चालवल्या. यामध्ये 14 आदिवासींची हत्या करण्यात आली आणि शेकडो लोक जखमी झाले. पुढे त्यांच्या विरोधात माओवाद्यांचे आरोप लावून गुन्हे दाखल केले गेले. इतके सगळे घडून देखील अजूनही त्या मरणाऱ्या कुटुंबांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, हा संघर्ष काही फक्त एक औद्योगिक लढाई नाही तर एक जातीगत आणि सामाजिक शोषणाचे एक भयाण वास्तव आहे, ज्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. 

इतके सगळे घडत असताना टाटा समुहाने मात्र, टाटांचे साधी राहणीमान दाखवणे, अगदी जमशेदजी टाटांपासून सुरू झालेली ही परंपरा रतन टाटांनी प्रचंड कौशल्याने सांभाळली. गरीब, आदिवासींचे शोषण करून, टाटांच्या व्यक्तिगत साधेपणाचे गौरविकरण करणे सुरू झाले. स्वतःची बॅग स्वतःच उचलणे, कपड्यांच्या साधेपणाचे वर्णन, त्यांच्या खाली जमिनीवर बसायचे वर्णन, स्वतःमधील लहान मुल जपायचे वर्णन, कुत्र्या सोबत कसे खेळायचे, एकच बातमी बाकी होती, ती म्हणजे ते सामान्य लोकांसारखेच श्वास कसे घ्यायचे इ. अशा त्यांच्या सामान्य माणसासारखे राहण्यावर ढिगाने Article छापल्या जाऊ लागले. या सगळ्या गोष्टींना इतके महत्त्व प्राप्त झाले की, जणू काही एका भांडवलदाराच्या साध्या राहणीमुळे त्याने स्थानिकांच्या जमिनी हडपणे, कारखान्यातील कामगारांचे, आणि आदिवासींवर गोळ्या चालवणे हे सगळे माफ झाले. साधी राहणी केल्यामुळे सगळे माफ होणार आहे का हे? साधे राहणीमान धर्माच्या अफूच्या गोळी पेक्षा देखील वाईट आहे. 

अडाणी अंबानीला दिवसरात्र शिव्या घालणारे लोक टाटांची चिकित्सा करणे टाळतात. Communist लोकांना तर अश्रूच अनावर झाले. कारण, त्यांच्या साधेपणाच्या गोष्टींकडे ते भुलले. हेच पुरोगामी राजकीय लोकांना देखील लागू होते. जेव्हा एकाच मापदंडाने भांडवलदारांचे मूल्यांकन केले जात नाही, तेव्हा समतेच्या लढाईतूनही ही संघर्षाची धार बोथट होते. अडाणी आणि अंबानी सारखेच टाटा देखील भांडवलशाहीचे उत्तम उदाहरण आहेत. चांगले ब्राम्हण, खराब ब्राह्मण, तसेच चांगले भांडवलदार आणि भांडवलदार पुरोगामी पालुपद बंद करून उघड्या डोळ्यांनी आणि चिकित्सक बुद्धीने माणसाने पाहिले पाहिजे. एका आदर्श भांडवलदारांचे चित्रण हे त्या व्यक्तीच्या उदारतेवर किंवा साधेपणावर नाही तर त्याच्या साम्राज्यविस्ताराच्या पद्धतींवर अवलंबून असते आणि वास्तव हे आहे की, टाटा ग्रुपने देखील स्वतःचे साम्राज्य उभारण्यासाठी गरीब, स्थानिक आणि आदिवासींचे शोषण केले. 

चांगल्या मनाचे साधे भांडवलदार, नैतिक अब्जाधीश ह्या संकल्पनाच मुळात खुळचट आहेत. कारण, नैतिकतेने या व्यवस्थेत अब्जावधी होणे अशक्य आहे. एक तर ती जनरेशनल वेल्थ असते किंवा एका मोठ्या प्रमाणात चोरी किंवा शोषण. या आर्थिक साम्राज्यविस्ताराच्या गोष्टींमधून आपण ज्या बाबींना "कमावले" असे म्हणतो, ते प्रत्यक्षात हडपले गेलेले असते. साधेपणाचा मुखवटा लावुन कोणी, चांगले भांडवलदार होत नाहीत. रतन टाटा यांच्या साधेपणाच्या आणि सामाजिक कार्याच्या मिथकाखाली दडलेले वास्तव हे वेगळे आहे. त्यांच्या औद्योगिक साम्राज्यविस्तारात झालेल्या हिंसक, अनैतिक, आणि जातीय पद्धतींना नजरेआड करणे म्हणजे त्यांच्या साम्राज्याचीच बाजू घेणे आहे. त्यामुळे त्यांच्यावर नुसती सहानुभूती दाखवणे म्हणजे शोषणाचे गुणगान करणे ठरेल.

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली