पुणे करार : एक अपयश
स्वतंत्र मतदारसंघाचे महत्व काय होते? त्याचा काय परिणाम झाला असता? पुणे करार का अनुत्पादक ठरला? यासारख्या कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजचे आंबेडकरी विचारवंत आणि कार्यकर्ते गंभीर विचार करताना दिसत नाहीत. पुणे करारामुळे पहिल्या निवडणुकीत SC मतदारसंघावर कसा घात झाला , बाबासाहेबांनी त्या निवडणुकीचं विश्लेषण कसे केले आणि त्यांनी "Qualified Electorate" साठी का संघर्ष केला? याबद्दलही पुरेशी चर्चा कोणी करत नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी जंगजंग का पछाडले , कारण त्यांना पुणे कराराच्या मर्यादा आणि त्याचा धोका जाणवला होता. पुणे करारामुळे खऱ्या प्रतिनिधित्वाऐवजी कृत्रिम समावेशकता निर्माण झाली , ज्यामुळे दलित समाजाच्या प्रतिनिधित्वावर आघात झाला. बाबासाहेब हे जाणून होते की , आता "Qualified Electorate" हा एकमेव उपाय होता , जो समाजाच्या खऱ्या प्रतिनिधित्वाला योग्य दिशा देईल. मात्र , आजचे आंबेडकरी विचारवंत आणि चळवळीचे सदस्य या कोणत्याही प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. यात दुसरी चिंताजनक गोष्ट म्हणजे , आज राजकारणाचे स्वरूप आणि चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका वरवरचा झाला आहे की , मूलभूत राजकीय प्रक्रियेतील सखोलता देखील कोणी लक्षात घेत नाहीत. "सत्ताधारी जमात" बनण्याच्या आंधळ्या धडपडीत , आंबेडकरी चळवळीचा मूळ हेतू , शोषितांचे प्रतिनिधित्व आणि त्यांचा राजकीय संघर्ष सगळे काही हरवत चालले आहे. आजचे तरुण आणि तथाकथित प्रगतीशील मंडळी या मुद्द्यांवर अभ्यास करत नाहीत. सत्तेत सहभाग घेण्याची सर्वांची धडपड आहे. परंतु , सत्तेत जाण्यापूर्वी राजकीय प्रक्रियेतील मूळ मुद्द्यांचे ज्ञान आणि त्याबद्दलचे योग्य आकलन मात्र राहिलेले नाही. आंबेडकरी चळवळीने आज बाबासाहेबांच्या राजकीय सखोलतेचा अभ्यास करून तशाच प्रगल्भतेने पुढे जाणे अत्यावश्यक बनले आहे. पुणे करार हा एका मोठ्या अपयशाचे प्रतीक आहे , ज्याने दलितांच्या राजकीय सक्षमीकरणाला खीळ घातली. बाबासाहेबांनी या कराराच्या फसव्या स्वरूपावर आणि त्यातल्या धोखादायक मुद्द्यांवर वेळोवेळी प्रकाश टाकला होता. कराराच्या विरोधात बाबासाहेबांनी दिलेली लढाई आणि त्यांची राजकीय दृष्टी या या गोष्टी आजच्या पिढीला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या काळात बऱ्याच लोकांना पुणे कराराच्या ऐतिहासिक , राजकीय परिणामांची सखोल जाणीव नाही , म्हणून त्या कराराला फक्त एक विजय आणि ऐतिहासिक समारंभ म्हणून पाहतात. त्यामुळे फक्त पुणे करार साजरा करण्याऐवजी , त्याचे वास्तविक फलित आणि बाबासाहेबांनी का आणि कसा त्याला विरोध केला हे समजून घेणे आजची गरज आहे. अन्यथा आपण त्याच चुका पुन्हा करत राहु , परिणामी ज्याने आपला संघर्ष अधिक कठीण होत जाईल.
Comments
Post a Comment