पाण्याच्या ग्लासात लपलेली जातीय असमानता

ब्राम्हण व्यक्तीने दलितांना पाणी देणे आणि त्याला "खरा भारत" असल्याचे सांगणे म्हणजे असमानतेला मान्यता देणे होय. ही कृती एकतर्फी आहे , ज्यात दलिताला केवळ स्वीकारणाऱ्याच्या भूमिकेत ठेवले जाते , देणाऱ्याच्या नाही. बघा मित्रांनो... जात कशी काम करते ते –

याचाच अर्थ असा की , अद्यापही समाजात ब्राह्मणांना उच्च आणि दलितांना नीच मानले जात आहे आणि हे सामाजिक समतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. कॉंग्रेसची विचारधारा कधी सामाजिक तत्त्वांना धरून होती? उलट , अनेकदा ब्राह्मणवादी विचारांना अप्रत्यक्षपणे पोषण दिले गेले आहे आणि आजही असे Tweet करून दलितांना कायमस्वरूपी खालच्या स्थानावर ठेवले जाते. अरे , राहुल गांधीने ग्लास मध्ये पाणी टाकले नसते तर खर्गेनी काय पाणी पिले नसते का? हे असले विधान करून फक्त तुम्ही कॉंग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. परंतु , आंबेडकरवादी विचारसरणीने दलित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या संघर्षाची तुम्ही उपेक्षा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाने आपल्या हक्कांसाठी लढा दिला , ज्यामुळे त्यांना हा सन्मान आणि अधिकार प्राप्त झाला आणि हा सन्मान , अधिकार त्यांनी मिळवला आहे. नाहीतर तुम्ही काय सहज दलितांना पाणी दिले असते काय? तुम्ही केलेले विधान अजूनही , तुम्ही दलितांना अद्यापही "पाणी घेणारा" म्हणून पाहता आणि जो विचार स्वतः जातव्यवस्थेला मान्यता देतो. इथे कोणी कोणाला पाणी देण्याचा मुद्दाच नाही आहे , इथे प्रत्येकाला समान हक्क आणि समान अधिकार आहेत. उच्चवर्णीय लोकांनी केलेली कृती लगेच कौतुकास्पद मानली जाते आणि त्याला तुम्ही खरा भारत संबोधतात. खरंतर ही उथळ कृती आहे , कारण एकाला दलित आणि एकाला ब्राम्हण संबोधन करून तुम्ही जात व्यवस्थेचा गाभा तसाच ठेवला आहे. नुसते संविधान हातात घेतले म्हणजे आपण महान होत नाही , त्यातील समानतेचे तत्वे वाचावी लागतात. पाणी देणे ही कृती केवळ ब्राह्मणाच्या "दयाळूपणाचे" प्रदर्शन आहे , जी वस्तुतः जातीय विषमतेचेच एक मोठे स्वरुप आहे. दलितांना कायम लाभार्थी दाखवणे , म्हणजे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारणे होय. कॉंग्रेसची विचारधारा कितीही चांगली वाटत असली तरी जातीयवादीच आहे. कारण , ते पाणी देण्या- घेण्यामध्ये देखील जात शोधतात आणि असले Tweet करून आम्ही किती महान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. एका ब्राह्मण व्यक्तीने दलिताला पाणी दिले म्हणजे , खरा भारत होत नाही , खरा भारत तेंव्हाच म्हणता येईल जेंव्हा व्यवस्थेतूनच असमानता नष्ट होईल. कॉंग्रेसच्या ह्या कृतीतून गांधीजींचा प्रभाव यामध्ये स्पष्ट दिसून येतो. गांधीजींची 'हरिजन' संकल्पना , जरी उदारमतवादी असली तरी ती अपूर्ण होती , कारण ती दलितांना त्यांचे अधिकार देण्याऐवजी त्यांना वश करण्याचा प्रयत्न करते. हे विधान देखील त्याच विचारधारेवर आधारित आहे. त्यामुळे ही असली खोटी सहिष्णुता , उपकार दाखवणे बंद करा आणि दलितांच्या मानवी हक्कांचा अनादर करू नका. संविधानानुसार , कोणत्याही व्यक्तीला पाणी मिळणे हा तिचा हक्क आहे , दान नाही आणि तुमच्या मते हा खरा भारत असेल तर ते कॉंग्रेसलाच लखलाभ! 

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली