भारतातील मूळ समस्या - जात
भारतातील डाव्या लोकांना सगळया समस्येचे मूळ कारण जात आहे हे मान्य नसते म्हणून सकाळी हा प्रश्न विचारला. गरिबी आणि जातीची तुलना कुठेच होऊ शकत नाही. कारण, गरिबीपेक्षाही काही भयंकर असेल तर ते म्हणजे जातव्यवस्था आहे. तुमची जात खालची असेल आणि तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे , जातव्यवस्था भारतातील मूळ समस्या आहे हे परत एकदा सिद्ध झाले. जातआधारित तुमचे शोषण होत असेल तर तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात याने तितकासा फरक पडत नाही. जातीवरून उद्भवत असलेल्या समस्या आणि गरिबीवरून उद्भवत असलेल्या समस्या ह्या वेगवेगळया स्वरूपाच्या असतात. आजचा दलित जर श्रीमंत असला तरी, पहिले त्याची जात शोधली जाते त्यानंतर त्याचा पैसा. याउलट मात्र सवर्ण लोकांचे. ते कितीही गरीब असले तरी त्यांची जात शोधली जात नाही. अत्याचाराच्या परिसीमा देखील आपल्याकडे जात केंद्रित आहेत.
खालील दोन उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.
1) खैरलांजी प्रकरण
2) कोपर्डी प्रकरण
दोन्ही उदाहरणे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहेत. खैरलांजी प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून महाराष्ट्र इतका पेटून उठला नाही, जितका कोपर्डी प्रकरणाच्या वेळेस पेटून उठला अत्याचार हा अत्याचार असतो , परंतु भारतात अत्याचार करणारी व्यक्ती कोण आहे आणि अत्याचार कुणावर झाला, त्याची जात पाहून आपण पेटायचे की नाही हे ठरवल्या जाते. दोन्ही उदाहरणात आर्थिक परिस्थिती सारखी आहे. परंतु, पीडितांची जात वेगवेगळी आहे. न्यायासाठी मिळावा म्हणून ज्या पद्धतीने कोपर्डीसाठी न्यूज पेपरचे रकानेच्या रकाने भरून छापले ते मात्र खैरलांजीच्या वाट्याला आले नाही. असो, स्त्री-अत्याचारावर एक वेगळा लेख होईल.
एकूण समस्येचे मूळ कारण शोधले तर आपल्याला जातच दिसते. पाणी पिण्यासाठी झालेली शिक्षा असो, की तुमच्या अंगावर लघवी करणे असो. भारतात Caste हे Capital आहे. शोषण जातीमुळे होत असल्यामुळे तुम्ही व्यक्तिगत गरीब आहात की श्रीमंत आहात हे दुय्यम स्थानावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इथे एक वाक्य फार महत्वाचे ठरते, "तुम्ही गरीब आहात म्हणून शूद्र नाही आहात तर तुम्ही शूद्र आहात म्हणून तुम्ही गरीब आहात." माणूस म्हणून तुम्ही कितीही मोठ्या पदाला गेलात तरी, तुमच्या वाट्याला जातीमुळे अवहेलना येते म्हणजे येतेच आणि त्याचे उत्तम उदाहरण बाबासाहेब स्वतःच आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की, भारतातील डावे लोक सतत केवळ गरीब व श्रीमंत किंवा भांडवलदार व मजूर असे भेद मांडून मोकळे होतात आणि इथल्या जातीच्या समस्येवर, प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसतात. डाव्यांनी कधी जातीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलेच नाही आणि गोष्टी भांडवलशाहीचा बीमोड करण्याच्या.
ब्राम्हण गरीब असला तरी त्याचा समाजिक स्तर समाजात उच्च असते त्यामुळे त्यांना कधी समाजिक अत्याचाराला बळी पडावे लागत नाही. गरिबीमुळे जर कुणी स्वतःला अस्पृश्य म्हणत असेल तर, गरीब ब्राम्हण, गरीब मराठा नाले, रस्ते साफसफाईचे काम का करत नाहीत? हाही प्रश्न विचारला पाहिजे. त्यामुळे, मुळातच इथे जात व्यवस्था घट्ट रुतून बसलेली आहे आणि प्रत्येकाला जात जळू सारखी चिकटलेली आहे. गरीब आणि श्रीमंत भेद हा वरवरचा ठरतो आणि जात अंतर्गत शोषण ही मुख्य आणि महत्वाची समस्या ठरते.
जातव्यवस्था कायम आर्थिक आणि बौद्धिक प्रगतीवर नियंत्रण ठेवणारी आणि सामाजिक सुधारणा करण्याच्या मार्गातील एक मोठा अडसर आहे. भारताला जाती व्यवस्थेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी फार मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. नाहीतर, एक दिवस गरीब लोक श्रीमंत होतील पण चिकटलेली जात काय जाणार नाही. म्हणून शेवटी हेच खरे ठरते, भारतात सगळ्या समस्येचे मूळ कारण "गरिबी" नसून "जात" आहे.
Comments
Post a Comment