हुंडा आणि पुरुषी मानसिकता...
NCRB च्या डेटा नुसार 2022 मध्ये 6450 हुंडाबळींची नोंद झाली. म्हणजेच दर दिवशी 17 नवविवाहित मुलींची हत्या झाली. ही तर नोंद झालेली आकडेवारी आहे. ज्या केसेस नोंदविण्यात आल्या नाहीत त्याची संख्या तर याच्या दहापट असेल.
मुलींच्या मागण्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या मुलांना प्रश्न आहे. हुंडाबळी म्हणून मुलांचा बळी कधी गेला आहे का? मुलगी हुंडा देत नाही म्हणून स्वतःला कधी विहिरीत ढकलून दिले का? गळफास घेऊन आत्महत्या केली आहे का? हुंडा तिनेच द्यायचा, वरून मागण्या देखील करायच्या नाहीत. अरे, लग्न करतात की एकमेकांवर उपकार करताय?
मुलींनी मागण्या केल्या तरी अडचण, हुंडा दिला तरी तिचा बळी, नाही दिला तरी तिचाच बळी. करायचे काय त्या मुलींनी? आम्ही हुंडा घेत नाही म्हणणारे मुले देखील, सोने मागतात, कार मागतात, फ्रीझ, सोफा, पलंग अरे बापरे अजून काय-काय ?
तुमच्या घरी काहीच नसते का? प्रतीकात्मक पद्धतीने का होईना आम्ही असा हुंडा घेणार आणि गावभर सांगत हिंडायचे, आम्ही हुंडा घेतलाच नाही. हे दोगलेपण काय कामाचे? पहिली गोष्ट तुम्हाला मुलगी नको असते आणि मुलगी हवी आहे तर बिनपगारी 24 तास राबणारी नोकर हवी असते.
काहीजण म्हणतात मुलींचे आई-वडील स्व-खुशीने काही देत असतील तर यात वाईट काय आहे? अरे भावडय़ानो, त्यामागे स्व-खुशी असते की मुलींच्या बापाला भीती असते, हे बघायला नको का? मुलींच्या बापाला भीती असते, आपण काहीच नाही दिले तर हा पोरगा आपल्या मुलीला खुश ठेवेल का? काहीही न घेता मुलगा गॅरंटी घेतो का मुलीला सांभाळण्याची?
आता अजून तिसरे येतात आणि म्हणतात मुले जसे मुलगी काहीही नसली तरी तिच्यासोबत लग्न करतात तशा मुली करत नाहीत. अरे भावडय़ानो, मुलगी काही नसली तरी तुमच्या घराची, तुमच्या लेकरांची जबाबदारी घेते की? तिच्या कामाचे पैसे तुम्ही
देता का? बेरोजगार मुलाशी मुली लग्न करत नाहीत हा सगळा फालतूपणा झाला. बेरोजगार मुलीशी मुले लग्न करतात. कारण, त्याच्यात त्यांचे हित असते. कित्येक मुलांना स्वतःपेक्षा जास्त शिकलेली मुलगी देखील नको असते. मुलींना दुय्यम लेखणारे तुम्ही मुले, स्वावलंबी मुलगी तुम्हाला नको असते. तुमचा पुरुषी अहंकार यामागे दडलेला असतो.
तुम्हाला मुलगी हवी असते पण तिचे अस्तित्व नको असते. लैंगिक भावना पूर्ण करणारी आणि तुम्हाला समर्पित अशीच मुलगी तुम्हाला हवी असते. त्यामुळे तुम्ही बेरोजगार मुलीशी लग्न केले तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. हतबल असलेल्या मुली तुमच्या पितृसत्ताक विचारा पुढे काही भूमिका घेत नाहीत आणि ती पण तुमच्या नजरेत आयुष्यभर चांगला राहण्याचा प्रयत्न करते.
मुलाला नंदीबैल म्हटले तरी खरी मुंडकी मूलच मुलीची डोलावत असतात. मुलांच्या म्हणण्याला दुजोरा दिला ती चांगली नाहीतर वाईट. मुलगा बेरोजगार मुलीशी लग्न करतो त्याची कारण वेगळे आहेत आणि मुलगी बेरोजगार मुलाशी लग्न का करत नाही याची कारणे वेगळी आहेत. दोन्हींची सरमिसळ करून आम्ही मुले किती चांगले याचा टेंभा मिरविणे बंद केले पाहिजे.
हुंडा बळी, स्त्री-भ्रूण हत्या सगळीकडे बळी फक्त स्त्रीचा जातो. हुंडा देणारे आणि घेणारे दोन्ही जमात सारखीच मूर्ख आहे. कोणाचीच कुणाला खात्री नसते त्यामुळे एकमेकांना पैसे, वस्तु देऊन आयुष्यभराची शारीरिक व मानसिक सुरक्षा मिळावी म्हणून समाजव्यवस्थेने तयार केलेली व्यवस्था म्हणजे लग्न.
त्यामुळे अर्धवट माहितीवर आणि भावनिक रील्स बघून तुम्ही तुमचे विचार प्रगल्भ करत असाल तर तुमचे विचार तुम्हालाच लखलाभ. पुरोगामी महाराष्ट्र म्हणे...! जिजाऊ आणि सावित्रीमाईंचा विचारांचा वारसा चालविणार पण हुंडा घेऊन !
ऐसा कैसा चलेगा?
Comments
Post a Comment