भारतीय सिनेमा आणि #Oscars2024
भारतीय सिनेमा आणि ऑस्कर यांचा संबध फक्त भारतातून सिनेमाचे ऑस्करसाठी नाव पाठवणे इतकाच आहे. सिनेमा इथून जसा जातो, तसेच गटांगळ्या खात बाहेर पडतो आणि ओपेनहाइमरने सात ऑस्कर जिंकले म्हटले की आपण फक्त तोंडात बोटे घालून पाहत राहतो. भारतात सिनेमा मनोरंजनाच्या पलीकडे गेलाच नाही. भारतीय सिनेमा एका पारंपारिक पद्धतीने लोकांसमोर आणल्या गेला. नाचणे , गाणे , आयटम साँग , हीरोची एंट्री , मारधाड , सेक्स , शिव्या , अश्लील भाषा , जात , धर्म , प्रेमप्रकरण , विरह , दुःख , सुख , परिवार यामध्येच आपला सिनेमा अडकला.
चंगळवादी पिढीचे चंगळवादी जगणे, हिरोईन श्रीमंत, हीरो गरीब तर कधी हीरो श्रीमंत तर कधी हिरोईन गरीब, त्यांना एकमेकांवर प्रेम होणार आणि मग लग्न करणार. भोळ्याभाबड्या जनतेला प्रेमाच्या पुढे भारतीय सिनेमाने काही दाखविले आहे का? भारतीय सिनेमा इतका आमच्या पिढीवर हावी झाला की आमच्या प्रेमाच्या संकल्पना देखील आमच्या नसतात ते एका डायरेक्टर आणि हीरो हिरोईन पडद्यावर काय दाखवतात त्यावर अवलंबून असतात. प्रेमही दाखवले तरी अर्धवट दाखवणार मध्येच दुश्मन एंट्री घेणार आणि असा आमचा सिनेमा कधी संथपणे तर कधी जलद गतीने पुढे जाणार.
सिनेमा मनोरंजन असे समीकरण झाले आणि जगात आपला सिनेमा मागेच पडला. या उलट जगातील सिनेमा पाहिले तर विज्ञानाचा प्रचार - प्रसार, कल्पनेला वाव, भरभरून तत्वज्ञान, जबरदस्त कहाणी, नाच, गाणे नाही, आयटम साँग नाही, अंधश्रद्धेला खतपाणी नाही. प्रत्येक सिनेमात विवेकवादी भूमिका, प्रेमात देखील एका किसच्या पुढे काही नाही. सिनेमात असलेल्या महत्वपूर्ण भूमिका आणि आणि महत्वाचे लक्ष केंद्रित करून केलेली सिनेमाची आखणी. एका सिनेमाला 3-4, 10 वर्षे लागली तरी चालतील परंतु त्यात काहीच कसर बाकी सोडत नाहीत.
आपल्याकडे मात्र आठवड्याला एक सिनेमा प्रदर्शित होतो आणि धूळखात पडतो. ऑस्कर काय कोणत्याच पुरस्कारावर आपले नाव नोंदवावे अशा लायकीचे सिनेमे आपण बनविले माहीत. भारतीय सिनेमा तोपर्यंतच चांगला जोपर्यंत समांतर सिनेमांना महत्व होते. जब्बार पटेल, सत्यजित रे, श्याम बेनेगल यांचे सिनेमा पाहताना एक संदेश होता. अतिरंजित आणि अतिशयोक्ती नसलेले यांच्या सिनेमातील हीरो - हिरोईन देखील मनाला भावतील असेच होते. कोणता बडेजाव नाही. विषयावर लक्ष केंद्रित अशी सिनेमाची आखणी होती.
काळ बदलला आणि सिनेमा सिनेमा न राहता वारेमाप पैसा कमविण्याचे साधन, ऍक्टिंगचा पत्ता नसलेल्या कलाकारांचा भरणा, अंगप्रदर्शन करणाऱ्या हिरोईन, दारू पिऊन धिंगाणा घालणारी युवा पिढी, ताल,सुर नसलेले गायक-गायिका, दुसऱ्याच दिवशी गाणे विसरले पाहिजे असे संगीत देणारे संगीतकार आणि योग्य शब्दांची कमी जाण आणि अश्लील शब्दांचे जास्त जाण असलेले गीतकार अशामुळे भारतीय सिनेमाची नौका बुडाली.
जगातील सिनेमाशी चढाओढ करायची असेल तर निदान जगाचे सिनेमे पाहून तरी आपले सिनेमे बनविले पाहिजेत. भारतीय सिनेमाने भारतीय लोकांचे मनोरंजन इतकीच भिस्त न ठेवता समग्र जगात आपले सिनेमे कसे पाहिले जातील या धाटणीचे सिनेमे बनवावेत. एकाच विशिष्ट कंपूतल्या सिनेमाची ऑस्कर कधीच दखल घेणार नाही. विविधतेने नटलेल्या देशात विविधतापूर्ण सिनेमे बनले तर विविधता जगाला दाखवता येईल.
Comments
Post a Comment