कार्ल मार्क्स...

तू हरला मार्क्स...
तुला तुझ्याच लोकांनी हरवले...
तू भारतात टिकू शकत नाही... हेच सत्य आहे...
आज जे मार्क्‍सवादी , कम्युनिस्ट , कॉम्रेड बनू फिरू पाहतायत ते एक ढोंग आहे. भारतातील बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, यांना कमी लेखण्यासाठी त्यांनी तुला सोईनुसार जवळ केले. तुझे तत्वज्ञान सर्वतोपरी असले तरी भारतात शोषित वंचितांच्या लढाईसाठी तुझे तत्वज्ञान कमी पडते. तू ज्या भांडवलशाहीचा विरोध करतोस ती भांडवलशाही भारतात आहे कुठेय? तू ज्या युरोप मध्ये बसून प्रगाढ मोठे ग्रंथ लिहिले त्यात जातीचा कुठलाही उल्लेख नाही. भारतात जन्म तुझा झाला असता तर जातीवरून देशातील पीडितांना काय सोसावे लागले हे तुला समजले असते आणि दास कॅपिटलच्या दुप्पट व्हॉलुम इथल्या जात व्यवस्थेवर तू लिहिले असते. 

तुझ्या तत्त्वज्ञानात गरीब व श्रीमंत दोनच वर्ग आहेत , पण तुला माहिती आहे का भारतात गरिबीचे कारण समाजिक मागासलेपण आहे. भारतात स्वतःला अर्थतज्ज्ञ म्हणणारे लोक गरिबीचे कारण समाजिक मागासलेपण आहे याकडे साफ दुर्लक्ष करतात. गरिबीमधील 85% लोक हे समाजिक दृष्ट्या मागास आहेत आणि त्यातील 50% हून अधिक लोक पूर्वास्पृश्य आणि आदिवासी आहेत. दुसरी गमंत तुला सांगू का? इथले शेतमजुर, कारखान्यातील मजूर, असंघटीत मजुर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने कमी परंतु , धर्म आणि भांडवलावर मोठे अंकुश असलेले आणि ज्यांचा कष्टाच्या कामाचा कोणताही संबध नाही असे तथाकथित लोक शोषितांचे मसीहा बनू लागले. बुद्धाला जसे सोयीस्कर स्वीकारले तसेच तुलाही. 

कार्ल तू जन्म घेण्याच्या 100 वर्षे जवळपास आधी अॅडम स्मिथने अर्थशास्त्राचा आधुनिक पाया रचला होता. तुझ्या जन्मानंतर मात्र तू अर्थशास्त्राचा पाया मजुर लोकांच्या जीवनाशी निगडित करून मोठा संघर्ष उभा केला. वर्गसंघर्षाची मोठी बाजू तू भक्कमपणे मांडली पण भारतातील वर्णसंघर्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरच पुरेसे आहेत. इथल्या श्रमिक वर्गाला बुद्ध, फुले, आंबेडकर समजू नये म्हणून मुद्दामपणे तुला त्यांनी जवळ घेतले. नाहीतर आम्ही भारतीय लोक विदेशी संस्कृती, विचार, परंपरेला दूषणे लावत गावभर हिंडत असताना तुला एकट्यालाच जवळ करण्याचे कारण काय आहे? हा मोठा सुप्त आणि गंभीर प्रश्न आहे. नाही का कार्ल? बहुजनांच्या विचारात भेसळ केली आणि स्वतः मात्र नामानिराळे राहिलेत. 

इथल्या फुले दाम्पत्यांनी मिळून जे करून दाखवले ते 100 - 150 वर्षात केले , तुझ्याकडून प्रेरणा घेतलेल्या वर्ग लढा लढणार्‍या लोकांनी तरी करून दाखवले का? गुलामगिरी, शेतकर्‍यांचा आसूड हे ग्रंथ लाखमोलाचे आहेत. तू तर तुझ्या पत्नीला देखील स्त्रीवादी आंदोलनात कधी सहभागी करून घेतले नाही. तुझ्या तत्त्वज्ञानावर आधारित ज्यांनी क्रांती केली त्या मावो, लेनीन, चे-गवेरा यांनी तरी स्त्रियांना कधी क्रांती साठी जागा दिली का? मार्क्‍सवादी लोकांची स्त्री - पुरुष समता ही पुस्तक केंद्रितच राहिली. तू म्हटला होता सर्व मजुर, शोषितांनी एकत्रित यावे पण आता हुकूमशहा, दहशतवादी, आतंकवादी लोकच एकत्रित येत आहेत. विशेष म्हणजे मार्क्‍सवादी लोकांना मार्क्‍सवादी म्हटले की तर त्यांची तळपायाची आग मस्तकालाच जाते. तूच सांग कार्ल , त्यांना तुझ्याबद्दल प्रेम आहे का? 

धर्माला अफुची गोळी म्हणून तू मोकळा झालास. धर्म माणसाला का आवश्यक आहे याची एकदा तू चिकित्सा केली असती तर तुला देखील पटले असते. माणसाला नीतिमत्ता, नैतिकता आणि नीतिमूल्याने जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. तुझ्या विचारधारेला अनुसरून चालणारे लोक एरवी बुद्धाला, फुलेंना, आंबेडकरांना पूजले की दोष देतात आणि आज तुझे अनुयायी तुलाच कुंकू, भंडारा, फोटोला हार घालून पूजत आहेत. नास्तिकतेचे इतरांना धडे देणारे तुझ्या शब्दाला देवासारखे प्रमाण मानतात. परंतु , कार्ल मार्क्स तूही चुकू शकतोस हे मान्य करत नाहीत. 

भारतात Annihilation of Caste ग्रंथ भारताच्या दृष्टीने कितीतरी पटीने जात विध्वंसासाठी बहुमोल आहे. भारताला मात्र फुले, शाहू आणि आंबेडकर सोडून आता तूच जवळचा वाटायला लागलास आणि सर्व गोरगरीब जनता डफडी वाजवत लाल क्रांती करण्यासाठी रस्त्यावर निघाली आहे. तू आजच्या दिवशी जग सोडले तेंव्हा 10 - 12 लोक देखील तुझ्या अंत्यविधीला जवळ नव्हते. पण आज जगात तुझे विचार वाऱ्यासारखे पसरले. तुझे विचार कोणी कितपत स्विकारावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु, देशातील लोकांची सामाजिक परिस्थिती , सामाजिक मानसिकता काय आहे यावर ते जास्त अवलंबून आहे. कार्ल मार्क्स तू विचारक म्हणून जरी सर्वश्रेष्ठ असला तरी तू भारताचे समाजकोडे सोडविण्यासाठी अयशस्वी आहेस. 

तू इंग्लंडमध्ये तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आजारी असताना तुझी मुलगी लाराला पत्र लिहिले होते , 
"As to myself, i have turned into a perambulating stick, running the greatest part of the day, arising myself, going to bed at 10 o'clock, reading nothing, writing less, and altogether working my mind to that state of nothingness which Buddhism considers the climax of human bliss..." तुला देखील बुद्धाची गोडी निर्माण झाली होती हे या पत्रातून दिसून येते. थोडे दिवस आणखी जगला असता तर तुझ्या संकल्पना तूच परत एकदा बदलल्या असत्या आणि बुद्धाला जवळ केले असते. असो... आता काळ खूप पुढे गेला आहे. भारताच्या दृष्टीने तू कालबाह्य ठरतो... तू भारतात जन्म घेतला असता तर  तुझे तत्वज्ञान बाजूला ठेवुन बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर हेच स्वीकारले असते...
कारण, इथे हेच सर्वतोपरी आहेत... 
आजच्या स्मृति दिनानिमित्त कार्ल मार्क्स
तुला अभिवादन!...🙏🏻

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली