शिवाजी समजून घेताना...

शिवाजी महाराजांचा विचार केला तर, शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. मध्ययुगीन भारतीय काळातील महाराष्ट्रातील, शिवाजी महाराजांचा हा एकमेव इतिहास आहे म्हटले तरी चालते. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे, आवडते राजे आणि आराद्य दैवत. शिवाजी महाराजांचे, नाव घेतले की स्फूर्ती चढते. एक अभिमान, अंगात संचारतो. आपण, महाराष्ट्रीयन लोक शिवाजी महाराजांवर खूप गर्व करतो. शिवाजी महाराजांना, कुठे ठेवावे आणि कुठे नाही ठेवावे असे आपले होत असते. शिवाजी महाराज यांचेवर गर्व असणे चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. पण आपण खरच जो शिवाजी महाराज ओळखायला पाहिजे तो ओळखला आहे काय?
        
शिवाजी महाराजांच्या, कर्तृत्वाचे आपण आपल्या परीने चित्र रंगविले आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण, आपण त्यांना एकाच नजरेतून बघतो आहोत. खरंतर, हा ही मोठा प्रश्न आहे की, लोकशाही असणाऱ्या भारतात आपण शिवाजी महाराजांना आठवण्याचे कारण काय? आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय असणाऱ्या भारतात एका राजाचा काळ आठवणे, म्हणजे नक्किच काहीतरी त्या राजाचा काळ काहीतरी वेगळा असला पाहिजे. शिवाजी महाराज यांची प्रतिमा, ही एक प्रतिमा राहिलीच नाही, त्यांच्या अनेक प्रतिमा अनेक इतिहासकारानी वेगवेगळया पध्दतीने आपल्या समोर आणल्यात. शिवाजी महाराज, एक आदर्शवादी राजा होते, असे म्हणू म्हणू आपण त्यांचा काळ आठवतो. त्यांच्या स्वराज्याची चर्चा करतो, त्यांच्या शौर्याची गाथा गातो, त्यांनी इतके किल्ले जिंकले, त्यांनी तितके किल्ले जिंकले यापुढे खरच शिवाजी महाराज काय होते हे विचारात घेतले आहे काय? शिवाजी कोण होता? तो कसा होता? तो काय करायचा? तो धार्मिक होता की नाही? तो राजा म्हणून जनतेसाठी कसा होता? फक्त एक राजा होते की त्याही पेक्षा पुढे जावून आपल्या रयतेसाठी, ते एक माणूस म्हणून कसे होते, या सगळ्यांचा विचार करणे गरजेचे आहे, नाहीतर आपण शिवाजी महाराज यांना एकाच नजरेतून बघू.
       
शिवाजी महाराज, यांचा विचार केला तर अनेक प्रश्न निर्माण होतात. कितीही, मोठे आपण झालो तरी, शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र शासनाच्या चौथीच्या पुस्तकाच्या पुढे वाचला आहे काय? किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला तरी वाचायला सांगितला आहे काय? तर, या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असेल तर, मिळवले तरी जास्तीत जास्त प्रमाण याचेच निघणार आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास आपण चौथीच्या पुढे वाचला नाही आहे. आणि, वाचणार आहोत की नाही याचीही खात्री नाही. म्हणूनच, आज खरे गरजेचे आहे शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. नाहीतर, शिवाजी महाराजांची एकच प्रतिमा जनसामान्यात जाईल.  
       
शिवाजी महाराजांनी, स्वराज्य स्थापन केले म्हणजे काय केले तर, त्या काळातील असलेल्या परकीय मुलकी सत्तांना दाखवून दिले की, महाराष्ट्रातील जागा बळकावणे इतके काही सोप्पे नाही. शिवाजी महाराजांनी, फक्त परकीय सत्तांना रोखण्यासाठी सत्ता स्थापन केली होती काय? तर याचे उत्तर सगळ्याना ज्याच्या त्याच्या परीने देता येईल? आणि मग ज्याच्या त्याच्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर तोच प्रश्न पुन्हा घोंगावतो. कारण, मग प्रश्न पडला तरी, आपण एकाच बाजूने त्याचे उत्तर शोधत असतो. आता, सध्याच्या परिस्थितीत विचार केला तर, शिवाजी महाराजांना, समाजाने वेगवेगळे बिरुद लावले आहेत. जसे की, " हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ", " हिंदूहृदयसम्राट ", " हिंदूचे आराध्य दैवत " अशी असंख्य अशी बिरुदे शिवाजी महाराजांना लावलेले आपल्याला आढळतील. मुळात प्रश्न हा, पडतो शिवाजी महाराजांना असे साच्यात का बांधले आहे? या साच्यात बांधण्या मागची भावना काय आहे? कदाचित ही बिरुदे स्वतःच्या सोयीसाठी लावली असावीत कारण, शिवाजी महाराजांनी स्वतःहून कधीच म्हटले नाहीत की " मी जे स्वराज्य स्थापन करणार आहो, ते हिंदूचे स्वराज्य आहे." त्यामुळे असे, एका साच्यात शिवाजी महाराजांना आपण अडकवून, त्यांची महती कमी करत आहोत. 
       
भारतीय इतिहासातील, मध्ययुगीन काळात सरंजामशाही आणि राजेशाहीचा तो काळ होता. तसेच, वेगवेगळया सततच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागत असत. त्यामुळे, सामान्य जनता भरडली जात असे. त्यांचे, अतोनात नुकसान होत असे. त्यामुळे, हे स्वराज्य स्थापन करण्याचा हा काळ असला, राजाच्या आधिपत्यखाली असला तरी हा काळ मनुष्यजातीला त्रस्थ करणारा होता. पुढे, चालून आपली प्रशासन व्यवस्था निर्माण करताना, शिवाजी महाराजांनी जाणले होते, की सरंजामशाही जास्त दिवस टिकू शकणार नाही. त्यामूळे, शिवाजी महाराजांनी सरंजामशाही नष्ट केली. 
       
शिवाजी महाराजांनी ज्या काळात राज्य स्थापन केले, त्या काळात राज्य स्थापन करणे सहज शक्य नव्हते. मोगलाई, असणारा तो काळ, महाराष्ट्रातील निम्मे लोक त्यांचीच चाकरी करीत. शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे भोसले हे सुद्धा आदिलशाहाचे जहागीरदार होते. शिवाजी महाराजानी, स्वराज्य स्थापन केले ते स्वतःच्या कर्तुत्वावर, पराक्रमावर. कारण, शिवाजी महाराज हे राजा कुठल्याही वारसा हक्काने झाले नाही. वारसा हक्काने राजा होणे आणि आणि स्वकर्तृत्वाने राजा होणे यात खूप फरक आहे. त्यामुळे, शिवाजी महाराज इतर झालेल्या राजांपेक्षा नक्किच वेगळे ठरतात. त्यामुळे शिवाजी महाराजांचे जण सामान्यां मधील स्थान अढळ असेच आहे. 

कॉम्रेड. गोविंद पानसरे " शिवाजी कोण होता " नावाचे पुस्तक लिहिताना त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे, ते यासाठीच की त्यांना त्यांचा अनादर करायचा नसून शिवाजी महाराजांना बहाल केलेल्या दैवत्वाला दूर सारून आणि त्यांच्या बाजूला असलेले अवताराचे वलय, त्यांना दूर करून माणसाच्या पातळीवरच्या शिवाजी महाराज त्यांना बघायचा आहे. आणि असा शिवाजी आपला असतो आणि तो सगळ्याना हवा हवासा वाटतो. 
        
शिवाजी महाराजांचे वेगळेपण आपल्याला त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्यातून दिसून येते. शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्वांना आपलेसे वाटायचे. त्यामध्ये कुठल्याच लोकांमध्ये भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांचे राज्य, सामान्य रयतेला, सामान्य जनतेला, अल्पसंख्याक असणाऱ्यांना, बहुजनांना सगळ्यांना शिवाजी महाराजांचे स्वराज्य आपलेसे वाटायचे. स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी सामान्य रयतेच्या अंगी असणारे पराक्रमी गुण हेरून त्यांनी आपले सैन्य तयार केले. त्यात कुठल्याही जाती किंवा धर्माला थारा नव्हता. सगळ्याना सोबत घेऊन चालणारे शिवाजी महाराज होते. 
        
आपण सर्वजण मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळायला पाहिजे, म्हणून किती वर्ष झाले प्रयत्न करीत आहोत. परंतु, आपल्या राज्यकारभारात इंग्लिश भाषेचाच उपयोग केल्या जातो. इथेच, आपला विरोधाभास दिसून येते. जर, खरच मराठी बद्दल कळवला असेल तर, सगळे व्यवहार मराठीत व्हायला हवे. पण हे चित्र दिसत नाही. काळानुरूप, हे आणखी बदलत जाणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळात, राज्यकारभाराची भाषा प्रामुख्याने फारसी होती. पण ही भाषा जास्त कुणाला येत नव्हती. त्यामुळे, चालणारा राज्यकारभार तितकासा कुणाला नीट समजत नसे. राज्यकारभारात काय सुरू आहे, हे नीट कुणाला कळत नव्हते. त्यामुळे, शिवाजी महाराजांनी सर्व सामान्य रयतेला समजेल, म्हणून विचारपूर्वक राज्यभाषा कोश तयार केला आणि मराठीत कारभार सुरू केला. असे, रयतेच्या हिताचा विचार करणारे राज्य सर्वांना आपलेसे वाटायचे.परंतु खुद्द शिवाजी महाराजांचे, सहा भाषेवर प्रभुत्व होते. मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, संस्कृत, तेलगू इ. भाषा राजांना उत्तम प्रकारे येत होते. शिवाजी महाराज जनतेच्या हितासाठी असणाऱ्यां छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असत. जनतेच्या हितासाठी कोणत्या गोष्टी, महत्वाच्या आहेत आणि कोणत्या नाहीत, याचा सारासार विचार करून शिवाजी महाराज राज्यकारभारात गोष्टी सामावून घेत असत. त्यामुळे जनतेला कधी, परकेपणा जाणवायचा नाही. 

शेतकऱ्यांना आपण उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतो. आणि, त्यांच्याच हिताचा जर आपण विचार करत नसेल, तर आपण लोकशाहीच्या कुठल्या मार्गावर जात आहोत? शिवाजी महाराजांच्या शेतकरी धोरणाबद्दल विचार केला तर, आपल्याला दिसून येते की, शिवाजी महाराजांनी सगळा राज्यकारभार हा शेतकरी केंद्रित ठेवला होता. शिवाजी महाराजांनी, मुघलांच्या आक्रमणाने उध्वस्त झालेली गाव, कौलनामे घेवून पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला तयार असणाऱ्यां शेतकऱ्यांना, बी - बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. अजून, नव्याने लागवडीस आलेल्या, जमिनींना सुरूवातीची 4 - 5 वर्षे महसुलसुद्धा कमी ठेवला. शिवाजी महाराजांनी ठरलेलाच महसुलच वसुल करण्याचा दंडक घालून दिला आणि तो अमलात आणला. दुष्काळात महसुल माफ केला. कारण, जर शेतात पिकलेच नसेल तर शेतकरी महसुल कुठून देणार? असे, शेतकरी हिताचे निर्णय शिवाजी महाराज घेत. दुष्काळात, शिवाजी महाराज शेतकऱ्यांची सर्वतोपरी मदत करीत. आपल्या स्वराज्यातील शेतकऱ्याला कधीही, वाटू दिले नाही की, त्यांचा राजा शेतकऱ्यांना सोबत नाही आहे म्हणुन. शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांबद्दल प्रचंड कळवळा होता. त्यामुळे, सामान्य रयतेला शिवाजी महाराज आपलेसे वाटायचे. शिवाजी महाराज रयतेची काळजी घेत असत तर त्याच्या दहापट काळजी रयत शिवाजी महाराजांची घेत. आजच्या लोकशाहीला, लाजवेल अशी भूमिका शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या बद्दल घेतली होती. 
        
शिवाजी महाराजांचे असंख्य असे पैलू आहेत, जे आजही आपण आजच्या काळात समजून नाही घेऊ शकलो. शिवाजी महाराज आपल्यासमोर आज आपल्यासाठी देवाच्या ठिकाणी जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांचे जे व्यक्तिमत्व आपण जाणायला पाहिजे, ते कुठेतरी जाणून घेण्यास आपण कचरत आहोत. खरे, शिवाजी कोण होते? हे आजही आपल्याला जाणायचे आहे. खरंतर खरा शिवाजी आपल्यासमोर येऊ न देण्याचे कारण काय आहे? त्यांची साचेबद्ध असणारीच प्रतिमा आजही आपल्या डोळ्यासमोर आहे. ही, प्रतिमा ज्या ब्राह्मणी लोकांनी आपल्यासमोर आणली आहे, त्या प्रतिमेच्या पलीकडे जावून आपल्याला शिवाजी ओळखायचा आहे. 
        
शिवाजी महाराज, हे जागतिक कीर्तीचे आणि कर्तुत्ववान राजे आहेत. परंतु, अजूनही संपूर्ण खरे असणाऱ्यां शिवाजींचे चरित्र उपलब्ध नाही आहे. हे निर्विवाद कटू सत्य आहे. आणि जे काही शिवाजी महाराजांबद्दल उपलब्ध आहे ते मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून आपल्या समोर उभे आहे. कल्पना करून लिहिलेल्या, त्यामध्ये रंजनात्मक गोष्टी सांगून इतिहास लिहिलेला आहे आपल्याला समजावे लागेल. आणि, खरा शिवाजी समजून घेण्यामध्ये ह्या गोष्टी अडचणींच्या ठरत आहेत. 
        
शिवाजी महाराजांनी, स्वराज्य निर्माण करताना आपल्या सोबत सर्व धर्मातील आणि जातीतील जनतेला सोबत घेतले होते. त्यामध्ये विश्वासार्ह असणारे, बाजी पासलकर, कान्होजी जेधे, शिवाजी काशिद, जिवा महाले, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद, नुरखान बेग, काझी हैदर, लाय पाटील, येसाजी कंक, फिरंगोजी, प्रतापराव, कोंडाजी फर्जंद, सूर्यराव काकडे, नेताजी पालकर, सिद्धी हिलाल, सिद्धी इब्राहिम, फकिराचा खापर पणजोबा, मुरारबाजी व बाजीप्रभू, हे प्रभू इ. सर्व जाती धर्माचे लोक शिवाजी महाराजांसाठी प्राणपणाने लढले. 
        
दुसऱ्याच बाजूला आपण पाहिले तर असे दिसून येते की, शिवाजी महाराजांसोबत काम करणारे त्यांचे आप्तस्वकीय त्यांचे शत्रू होते. परकीय, शत्रू तर शिवाजी महाराजांना होतेच परंतु जास्त धोका शिवाजी महाराजांना परकीयापेक्षा स्वकीयांनीच जास्त धोका दिला. याप्रसंगी, कृष्णाजी भास्कर, रामदास, मोरोपंत इ. अनेक भटजी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या आडवे आले. अफजलखान भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांनावर कृष्णाजी भास्करने वार केला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले. परंतु हा, इतिहास जाणून बुजून आपल्यासमोर कुणी येऊ देत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास, जो लिहिल्या गेला आहे तोही जाणीवपुर्वक त्यांची प्रतिमा खराब करण्याचे एक षडयंत्र चालविल्याचे दिसते आहे. याचा अर्थ असा निघतो की, शिवाजी महाराजांना जिवंतपणी शत्रू होते आणि त्यांच्या पश्चात्य देखील त्यांना शत्रू निर्माण झालेत. 
        
पेशवाई काळात खरेतर शिवाजी महाराजांचा इतिहास दडून गेला होता. इतक्या, कर्तुत्ववान माणसाचा इतिहास काही शुल्लक कारणासाठी दडपून टाकण्यात आला. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा नवीन इतिहास निर्माण केला आणि त्यांच्याच वाट्याला पाहिजे तो सन्मान आला नाही. शिवाजी महाराजांचा, उपयोग सगळ्या लोकांनी पाहिजे तसा आणि पाहिजे त्या वेळी केलेला आपल्याला पहायला मिळतो. मग ते, राजकारण, आर्थिक किंवा सामाजिक कारण असो शिवाजी महाराज आपल्याला प्रत्येकाच्या तोंडी वेगवेगळा दिसतो. 
        
शिवाजी महाराजांचा, इतिहास पहिल्यांदा कुणी शोधून काढला तर ते महात्मा ज्योतीबा फुले यांनी, जो की कालानुरूप गडप झाला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी, 1869 साली शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली. आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा खरा पोवाडा लिहिला. महात्मा फुले, यांनी शिवाजी महाराजांनी केलेले कर्तुत्व जगातील प्रत्येक घरी पोहोचले पाहिजे या उद्देशाने, 1870 साली शिवजयंती सुरू केली. याप्रसंगी, लोकमान्य टिळक 12 - 13 असतील. परंतु, आपल्याकडे हेच शिकविल्या जाते, की लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली. खरेतर, त्यामागचे कारण म्हणजे, शिवजयंतीला विरोध करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला. कारण संभ्रम निर्माण होण्यासाठी लोकांमध्ये. आपण आजही बघतो, शिवजयंती जवळ आली की एक, नवीन वाद नेहमीच तयार होतो, शिवजयंती कधी साजरी करायची ते. इंग्रजी कॅलेंडर नुसार करायची की तिथीप्रमाणे करायची. पण हा वाद करून खरच काही प्राप्त होणार आहे काय? इतर कुणाच्या बाबतीत आपण तिथी किंवा हे शोधतो का? नाही ना? मग शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण हा विचार का करतो? तर सरळ सरळ याचे उत्तर मिळते ते म्हणजे शिवजयंती शांततेत साजरी होऊ न देणे. पण, असे करून काय मिळणार आहे? याचा विचार प्रत्येक पिढीने करायला हवा. 
        
आज शिवाजी महाराजांना हिंदू लोक, शिवाजी महाराजांना हिंदूचे आराध्य दैवत म्हणून संबोधतात, त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, त्यांनी खरच शिवाजी महाराजांना आपलेसे केले आहे की? आपल्याला कोणता नेता नाही म्हणून उचला शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याची जेंव्हा घोषणा केली, त्यावेळेस ब्राह्मणांसोबत, हिंदू धर्मानेही कडाडून विरोध केला. हिंदू धर्म म्हणजे काय तर, हिंदू हे वैदिक धर्माचे नाव आहे. आणि, वैदिक धर्माच्या कुठल्याही ग्रंथात हिंदू शब्द नाही आहे. संपूर्ण बहुजनांचे नेतृत्व सर्व क्षेत्रातील नेतृत्व करण्यासाठी ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म या नावाचा त्याग करून त्यांनी हिंदू हे नाव परिधान केले. आज जे हिंदुत्वाचा, पायंडा पाडला त्याचा परिणाम म्हणजे समाजामध्ये भेदाभेद करणे होय. आज, हिंदुत्व म्हणजे मिरवतात, त्यांचा त्यामागचा उद्देश म्हणजे इतर धर्मियांच्या बाबतीत असलेला रोष व्यक्त करणे होय. त्याचाच आजचा परिणाम म्हणजे, वेगवेगळया लोकांनी धर्माच्या नावाखाली काढलेल्या वेगवेगळया संघटना. म्हणजे, समाजातील भारतीयत्वाची भावना नष्ट होऊन स्वतःला एका धर्माच्या नावाखाली बांधुन ठेवणे, इतकेच काय ते आले. आपल्याला, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरून त्यांना जाणायचे आहे. ना, की हिंदुत्वाच्या नजरेतून. 
        
शिवाजी महाराज समजून घेताना असे वाटते, की खरच आपल्याला या विषयावर चर्चा करण्याची गरज का भासत आहे? का आवश्यकता भासत आहे या गोष्टीची? इतक्या कर्तुत्ववान राज्याची, प्रतिमा आणि त्याचे समाजासमोर असलेले रेखाटलेले चित्र आणि असलेले चित्र यात खूप तफावत आहे. हीच, तफावत दूर करणे गरजेचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना शोधले आणि महात्मा जोतिबा फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोधून काढले. नाहीतर दोघांचेही इतिहास हे दडपलेच गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवाजी महाराजांचे चिकित्सक असे वर्णन केले आहे. 
        
शिवाजी महाराजांच्या बद्दल दुसरी एक भावना समाजात दृढ पसरली आहे. ती म्हणजे, शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे होते. अत्यंत, हीन दर्जाचे राजकारण या मागे दडलेले आहे. समाजातील, लोकांच्या मनात इतर धर्माबद्दल कसा द्वेष पसरवायचा, हे सगळ्याना अगदी सफाईदारपणे जमते. समाजात तेढ निर्माण करणे, जातीय दंगे कसे पसरतील याच गोष्टीचा उन्माद मांडलेला आहे. आणि त्यातूनच युवा पिढीवर याचा वाईट परिणाम होत आहे. शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवली, म्हणजे कुणी शिवाजी महाराज यांचा अनुयायी होत नाही, तर त्यानुसार वागावे लागते. म्हणजे, आपण स्वतःला इतके महान समजायला लागलो की बस्स, शिवाजी शिवाजी महाराजां सारखे दिसायचा प्रयत्न करीत आहोत. पण नुसता दिसून काही उपयोग नाही. शिवजयंतीला मुलींनी लुगडे घालून, चष्मा लावुन रॅली काढण्यात काही अर्थ नाही. तर, शिवाजी महाराजांचे गुण नसानसात भिनले पाहिजे. आणि खरा शिवाजी ओळखला पाहिजे. स्वतःला शिवभक्त म्हणणारे, हे असे वागून एका धर्माप्रति असलेला आपला द्वेष, तिरस्कार दाखवून देतात. आम्ही, बहुसंख्य आहोत हा त्यांचा त्यामागे उद्देश असतो, आणि तेही एकाच धर्मातील लोकांच्या साठी त्यांचे हे असे वागणे असते. आणि तो धर्म म्हणजे मुसलमान. युवा पिढीलाही इथे दोष देऊन चालणार नाही कारण त्यांच्या समोर जे चित्र मोठे निर्माण करतात, त्याचेच ते अनुकरण करतात. म्हणूनच, येणाऱ्या पिढीसाठी प्रत्येक पिढीने शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. 
        
शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष करायचे, अशी जनसामान्यांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी पक्की भूमिका आहे. अफजलखान, शायिस्तेखान, दिलेरखान हे स्वराज्याचे शत्रू होते. याबाबत कुणाच्याही मनात अजिबात शंका नाही. परंतु, शिवाजी महाराजांचे हे धार्मिक शत्रुत्व नव्हते तर, राजकिय शत्रुत्व होते. परंतु, इतिहासकारानी असा इतिहास लिहिला आहे की, बस्स त्यातून फक्त आणि फक्त मुसलमान यांच्या बद्दल कसा द्वेष पसरवता येईल याची सोय केलेली आहे. अफजलखान, शायिस्तेखान, दिलेरखान, औरंगजेब यांच्या प्रत्येकासोबत घडलेल्या प्रसंगावरून, महाराज मुसलमानांचा द्वेष करायचे असे पक्के मनात भरण्याचे काम, कथाकार, शाहीर, नाटककार आणि कादंबरी, मालिका, चित्रपट, कथा, महानाट्ये यांनी केले आहे. कादंबरी, मालिका, चित्रपट, कथा, महानाट्य म्हणजे काही इतिहास नव्हे. 
        
शिवाजी महाराजांचे जगातील पहिला चित्र रेखाटणारा चित्रकार मीर महमद हा मुसलमान होता. त्याने जर महाराजांचे खरे चित्र रेखाटले नसते तर, आज जे चित्र उपलब्ध आहे तेही उपलब्ध राहिले नसते. त्याच्यातही काहीतरी उणीदुणी ठेवलीच असती. शिवरायांचे पहिले सेनापती, हा नूरखान बेग होता. सिद्धी इब्राहिम व मदारी मेहतर हे राजांचे निष्ठावान सरदार होते. इब्राहिम दौलतखान हा राजांचा आरमारदल प्रमुख, काझी हैदर हे राजांचे खाजगी सचिव होते. केळशीचे संत बाबा याकूब, पाटगांवचे संत मौनीबाबा हे शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी होते. रुस्तुमेजमान राजांचा गुप्तहेर होता. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील 35 टक्के हे मुसलमान होते. त्यांना, नमाज पठण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी रायगडवर मस्जिद बांधली. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील महत्वाचे सहकारी हे मुसलमानच होते. त्यामुळे, शिवाजी महाराज मुस्लिमांचा द्वेष करायचे, हे कुठेच दिसून येत नाही. शिवाजी महाराजांचे हे चित्र ज्यांनी तयार केले, त्यांनी विचार करायला हवे की, आपण शिवाजी महाराजांचे असे चित्र का तयार करत आहोत? शिवाजी महाराज धार्मिक होते, धर्मांध नव्हते. मुस्लिमांसोबत झालेले युद्ध, हे धार्मिक कधीच नव्हते तर राजकिय युद्धातून पेटलेला संघर्ष होता. जी गोष्ट धर्माची तीच जातीची होती. 
        
शिवाजी महाराज खरं म्हणजे मराठ्यांचे नव्हते, त्यांच्या सोबत अठरा पगड जातीने काम केले आहे. ब्राम्हण ( चांगलेवाले ), न्हावी, रामोशी, मांग, महार अशी सगळ्या जातीची माणसे त्यांच्या सोबत होती. शिवाजी महाराजांनी अनेक अस्पृश्य असणाऱ्यांना किल्लेदार म्हणून नेमले होते. त्यांच्या धार्मिक आस्थेला खुलेपणाची आणि खुल्या अवकाशाची आस होती. म्हणून शिवाजी महाराजांचे स्वराज्य कधीच एका जातीची किंवा धर्माची मक्तेदारी नव्हती. म्हणून प्रबोधन काळात, महात्मा जोतिबा फुले त्यांची, समाधी शोधून त्याच्यावर " कुळवाडी भूषण " असा गौरवास्पद पोवाडा रचतात. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिबा फुले यांना गुरुस्थानी ठेऊन आपली सामाजिक चळवळ संविधाना पर्यंत घेऊन जातात. 
        
आज आपली जबाबदारी आहे, खऱ्या शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. प्रत्येक राजकीय व्यक्तीनी ज्या प्रमाणे शिवाजी महाराज रंगवला आहे, त्या पासुन चार हात लांब रहायला पाहिजे. शिवाजी महाराजांचे नाव वापरुन राजकीय शक्ति आपली पोळी भाजत आहेत. शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उंचीसाठी आपण भांडत आहोत. पुतळ्याची उंची, याचा विचार करण्यापेक्षा शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आपली बौद्धिक उंची वाढवावी. खोटी अस्मिता बाळगणे बंद करायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविण्यामागे जी त्यांची सुसंस्कृत, सुसंगत आणि वस्तुनिष्ठ प्रतिमा होती, ती आजही लोकशाही बळकट करण्यासाठी कामी येते. सर्वसामान्य माणसाला आत्मविश्वास आणि उत्साह देणारी आहे. ही प्रतिमा हिंदू - मुस्लिम भेदभावाच्या पलीकडे जावून, जातिभेदापलीकडे जावून माणसाला माणुसकीच्या नात्याने जोडणारी त्यांची ओळख आहे. 
        
आज शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात जन्म घेवून 394 वर्षे उलटून गेली, आणि आजही आपण धर्म, राष्ट्रवाद आणि हिंसा यावर अडून आहोत. इमर्सन (Emerson) च्या म्हणण्यानुसार " कोणताही समाज एका मनुष्याएवढा कधीच मोठा होऊ शकत नाही. " त्यामुळे, समाजाने कधी तितकी उंची नाही गाठली तरी, समाज बांधव त्यांचे खरे विचार जाणून घेऊन नक्किच स्वतः मध्ये परिवर्तन करू शकतो. एखाद्या व्यक्तीला, धर्माच्या चौकटीत बांधुन त्यांचे कर्तुत्व नजरेआड करता कामा नये. धर्म हा सार्वजनिक जीवनात नेहमीच विध्वंसक राहणार आहे. आणि त्याची परिभाषा कायम तीच राहणार आहे. कारण त्याचे अस्तित्व वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीचे बनले आहे. 
        
शिवाजी महाराजांना मिळालेल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात, त्यांनी आपल्या रयतेसाठी केलेल्या दैदीप्यमान कामगिरीमुळे जगातील सर्वोत्तम राजांमध्ये त्यांची गणती होते. शिवाजी महाराजांना दैवत्व बहाल करून पाहण्यापेक्षा, त्यांना एक उत्कृष्ट प्रशासक आणि लोककल्याणकारी राजा म्हणून पाहिले पाहिजे. शिवाजी महाराजांनी नुसती स्वप्ने बघितली नाही तर, त्यांनी कार्याला महत्व दिले, अहोरात्र कष्ट घेतलेत आणि स्वराज्याचे स्वप्न साक्षात सत्यात उतरवले आणि एक नवा आदर्श निर्माण केला. 
        
लोकसंग्रह, औदार्य, गुणज्ञता, निःपक्षपातीबुद्धी, निष्कपटीपणा, मित्रभाव, जरब, उद्यमशीलता, कल्पकता, तेजस्विता, स्वाभिमान, स्वप्रजावात्सल्य, व्यवहारिक वर्तन, कौटुंबिक वर्तन, धर्मनिष्ठा, धर्माभिमान वरील सर्व गुण असणारे अस्सल शिवाजी महाराज आपण स्विकार करून आपला मनुष्यदेह सार्थकी लावावा. 

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली