धर्मनिरपेक्ष देशाची धार्मिक गोष्ट...🔱🇮🇳🔱
धर्मनिरपेक्षता युरोपमधील ही विचारधारा असून , अतीतवादाला बाजूला सारून मानवी व्यवहारांसाठी स्विकारलेला एक इहवादी दृष्टिकोन. ब्रिटानिकाच्या व्याख्येनुसार धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकार , शिक्षण किंवा समाजाच्या इतर सार्वजनिक भागांमध्ये धर्माची भूमिका असू नये असा विश्वास आणि दुसरे म्हणजे अधर्म , निधर्मीपणा, नास्तिकता, किंवा धर्मविरोध म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही. परंतु , भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला “हिंदू राष्ट्र ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईश्वरशासित हिंदू राष्ट्राच्या उत्तरोत्तर वाटचाल करीत आहे. धर्मनिरपेक्षता गेली खड्ड्यात आणि आजच्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा स्थापनेने तर खऱ्या अर्थाने एका धर्मनिरपेक्ष देशाची वाटचाल कशी हिंदू राष्ट्राकडे होत आहे, यावर शिक्कामोर्तब झाला. ज्या हिंदू धर्माचे इतके उदात्तीकरण केले जातेय, त्या हिंदू धर्माला कुठलाही एकमेव धर्म संस्थापक व ईश्वरी प्रेषित नाही, आणि म्हणूनच की काय हिंदूचा एकमेव प्रमाण असा पवित्र ग्रंथही नाही आणि तरीही हिंदू धर्म धोक्यात असल्याच्या आरोळ्या ठोकून धर्मांध लोकांसाठी, धर्मांध आंधळ्या राजकारणाचा सुडबुद्धीने सत्ताधाऱ्यांनी डाव टाकला.
भारतात अत्यंत लोकप्रिय असलेल्या धार्मिक उजव्या बाजूची ही वाटचाल, त्यांच्या कोणत्याही मार्गातील अडथळ्यांचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःहूनच दूर सारून खऱ्या विरोधाला धर्माच्या कक्षेत बांधुन ठेवले आणि विरोधकांच्या विरोधाला विरोध करण्यासाठी विरोध शिल्लक ठेवला नाही. अयोध्येतील दंगलीचे प्रतीक असलेले, आणि निर्माण होणारे हे राम मंदिर भारतातील धर्मनिरपेक्षतेचा एकप्रकारे मोठा ऱ्हास दर्शविते. भारतीय राज्याचे स्वरुप बदलण्यासाठी या घटनेने भारताची धर्मनिरपेक्ष , बहुलवादी समाज म्हणून भारताचे अस्तित्व आता संपले आहे, आता त्याच्या जागी सावरकरप्रणित “ हिंदू अखंडतावादी” राज्य जन्माला आले आहे व ज्याचे दाई म्हणून सत्ताधारी लोकांना श्रेय देण्यास काही हरकत नाही.
सत्ताधारी सरकारच्या अति धार्मिकतेने, धार्मिक कट्टरतावादाचा मोठा विजय झाला. न्याय, समानतेसाठी, वचनबद्ध सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या आशेने केलेले प्रयत्न, आज मोदींच्या वतीने धुळीस मिळाले. डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते, “जर हिंदु राष्ट्र खरोखरच प्रत्यक्षात आले तर ते देशासाठी भयंकर आपत्ती ठरेल यात शंका नाही, कारण ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. या दृष्टिकोनातून ते लोकशाहीशी सुसंगत नाही. हिंदू राज कोणत्याही परिस्थितीत थांबवले पाहिजे. ” हिंदुत्ववादी, मनुवादी लोकांना सोडून चिकित्सक बुद्धीने विचार करणार्या सर्वसामान्य, अल्पसंख्याक समाजातील लोकांना आज खरोखरच डॉ. आंबेडकरांच्या भाकीताची प्रचिती आली असणार.
सर्व धर्मांच्या भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्या, भोळ्या भाबड्या जनतेला फसवून निवडून आलेल्या पंतप्रधानांनी, भारतीय असल्याची टोपी झुगारून हिंदू राजाचे मुकुट घालण्याची, पंतप्रधानांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी. 5 ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या राम मंदिराच्या पायाभरणीच्या अध्यक्षीय भाषणाचा शेवट हिंदू धार्मिक घोषणा “हर हर महादेव ” तीनदा उच्चार करून भाषणाचा शेवट केला. राम मंदिर पूर्ण झाले नाहीतरी, “ ये तो सिर्फ झांकी है, काशी-मथुरा बाकी है ” अशा घोषणा देऊन वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील इदगाह मशिदीभोवती भितीदायक गोंधळ घातला.
देशाच्या विविध भागातून अयोध्येला 1000 गाड्या, 50, 000 यात्रेकरूंच्या मेजवानीची करण्याची सत्ताधारी पक्षाची व्यवस्था, जातीपातीच्या 150 भिन्न गटांना आमंत्रण आणि 4000 पवित्र पुरुष, मंदिरामध्ये 5 लाख एलईडी स्क्रीन बसविणे, आजच्या दिवशी घरोघरी दिवे लावुन दिवाळी साजरी करण्याचा मोदींचा आदेश म्हणजे एकप्रकारे बहुसंख्याक हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी काळजीपूर्वक राबविलेल्या मोहिमेपेक्षा कमी नाही. जातीय एकमत निर्माण करण्याच्या हेतूने हिंदू राष्ट्र उभारणीसाठी धार्मिकतेचा विजयी शुभारंभ म्हणजे हे राम मंदिर.
भारतीय जनता पक्षाचा आणि आरएसएसचा एक प्रमुख हेतू आहे, तो म्हणजे भारताला ईश्वरशासित हिंदू राज्यामध्ये रुपांतरीत करणे आणि पौराणिक “अखंड भारत ” संकल्पाचा पाठपुरावा करणे. भाजप सत्तेवर आल्यानंतर दहा वर्षांत भाजपाचा प्रत्येक नेता पुजारी झाला. हिंदू धर्माचे राजकारण व राजकारणाचे हिंदूकरण हे समीकरण तत्कालीन सत्तेचे अंतिम मध्यस्थ आहे. भाजपचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आम आदमी पार्टी देखील हिंदू धर्माचा अजेंडा राबविण्यात पुढे सरसावले आहेत. दिल्लीतील रोहिणी मंदिरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सुंदर कांड आणि हनुमान चालीसा पाठ आयोजित करण्याचे आदेश अधिकार्यांना देऊन स्वतः देखील सपत्नीक उपस्थित राहिले. बिजू जनता दलाचे, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायकानी जगन्नाथ हेरिटेज काॅरिडोर प्रोजेक्ट लाँच केला आणि त्यासाठी 943 कोटी खर्च करणार असल्याचे जाहीर केले. पंतप्रधानाच्या पावलावर पाऊल टाकून, ममता बॅनर्जी, एकनाथ शिंदे, राहुल गांधी, अखिलेश यादव, नवीन पटनायक, स्टॅनली, नितीश कुमार मातब्बर राजकारणी लोकांना देखील राजकारणासाठी धर्म महत्वाचे क्षेत्र वाटत आहे.
धार्मिकतेचा अवडंबर इतका माजला की, पंतप्रधानाना लोक देव, राजा, अवतार समजायला लागले. हिमाचल प्रदेशचे शहरी विकास मंत्री सुरेश भारद्वाज मोदींना भगवान शिवचा अवतार म्हटले, दुसर्या एका नेत्याने कृष्णाचा अवतार म्हटले, उपराष्ट्रपती जगदीप धनखङ यांनी मोदींना युगपुरुष म्हटले, आणि सर्वात महत्वाचे रामजन्म भूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी तर डायरेक्ट भगवान विष्णूचा अवतार म्हटले. दहा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स न घेणारे मोदी 12 ऑक्टोबर पासून ते 23 नोव्हेंबर पर्यंत 10 मंदिरांना भेट देऊन आलेत आणि आता तर प्रत्येक चार दिवसाला एक मंदिर दौरा ठरलेला आहे. धार्मिक, दार्शनिक, सियासी राजकारणी म्हणून मोदींचे उभारलेले चाललेले हे चित्र सामान्य माणसाला, खासकरून अल्पसंख्याक समाजातील लोकांना घाबरवणारे आहे.
संविधानानुसार आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. सरकार कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापासून दूर राहणे अनिवार्य असताना देखील सत्ताधाऱ्यांनीच धार्मिकतेचा राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला. बहुसंख्य हिंदू रामाला मानतात, म्हणून रामाला राष्ट्रीय महानायक घोषित केले. संविधानाला पायदळी तुडवत धर्म आणि आस्था संविधानापेक्षा सरकारला जास्त महत्वाची झाली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, या लोकांना देखील कळले होते, हिंदू राष्ट्राची पायाभरणी केली तर, हिंदू बहुसंख्याक हिंदू राष्ट्र कधीही टिकणार नाही. परंतु, सत्ताधारी सत्तेवर आल्यापासून, धर्मनिरपेक्ष भारत आता हिंदू भारत म्हणून धार्मिक कट्टरतावादाकडे झुकला. एक धर्मनिरपेक्ष देश आता वास्तविक हिंदू धार्मिक राज्य बनला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अभूतपूर्व धर्मनिरपेक्षता संपुष्टात आल्यामुळे नजीकच्या काळात धार्मिक भारतीय राज्याचा मोठा परिणाम भारताच्या भविष्यावर होणार आहे. लोकशाही पुरस्कृत धर्मशाही राबविण्यात यशस्वी झालेला आजचा धर्मांध भारत धार्मिक कट्टरतावादाचा, हिंदूत्ववावर हिंदुत्वाचा, धर्मावर धर्माचा, बहुसंख्याकाचा अल्पसंख्याकावर, बंधुत्वावरीर द्वेषाचा मोठा विजय दर्शवितो... ✍️
संदर्भ ~
1) पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) यह लोकतंत्र नहीं, धर्मतंत्र है - रविश कुमार ऑफ़िशीयल
3) द वायर
4) द प्रिंट
5) ऑस्ट्रेलियन आउटलूक
6) लोकसत्ता
7) मीडियम
Comments
Post a Comment