राम देव की माणूस?
माणसातील राम हरवला आहे म्हणण्यापेक्षा राम आधी माणूस होता की देव होता हे सिद्ध करणे आवश्यक आहे. देवाला माणसात शोधण्याची व माणसात देव शोधण्याची गरज का पडते आहे? रामाला देवत्व बहाल केल्यामुळे रामाच्या चांगल्या बाजूलाच आजपर्यंत धर्मांध लोकांनी महत्व दिले आहे. रामाला माणसात शोधण्याचा प्रयत्न करण्यापुर्वी रामाची माणूस म्हणून तुम्ही चिकित्सा केली आहे आहे का?
रामाची उपासना करणारे लोक राम या देवाची उपासना करतात व त्यातील माणसाची नाही. एखाद्याला देव बनविले की माणसाचे तर्कशास्त्र आणि तार्किक बुद्धी दोन्ही
नष्ट होते. रामाला तुम्ही देव बनविले तर मग तो माणसाचा
देव बनला असे म्हणता येत नाही आणि माणसातील राम हरवला आहे हे तर मुळीच नाही. देव म्हणून रामाचे माणूसपण काय आणि कोणते होते हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. रामाला रामाचे तरी कोणते माणूसपण चिकटले आहे?
रामाची देव म्हणून बाजू पाहताना -
1) राम मर्यादा पुरुषोत्तम असतो.
2) एक आदर्श राजा असतो.
3) पुरुषार्थ सिद्ध पुरुष असतो.
4) कर्तव्य पालन करणारा असतो.
हे गुण भक्ताला आदर्श वाटतील. परंतु , जर राम आदर्श असेल तर मग देव कुणाला म्हणायचे? राम देव आहे तर मग माणूस म्हणून तो कसा आहे?
रामाचे चरित्र इतके आदर्श आहे तर -
1) सीता त्यागाचे काय?
2) बालीच्या वधाचे काय?
3) शंबूक वधाचे काय?
हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत आणि रामाच्या चरित्रावर हे मोठे डाग आहेत. हे माहिती असूनदेखील रामाची उपासना करणे बंद होत नाही कारण तुम्ही त्याकडे माणूस म्हणून न बघता देव म्हणून बघता. माणूस माणसाची चिकित्सा करू शकतो. परंतु , देवाची नाही करू शकत. रामाचे चरित्र निष्कलंक असते तरी देखील त्याची उपासना होणार नाही. कारण , मग तो माणूस होईल आणि माणसाची उपासना कोण करणार? देवाची उपासना तो कलंकित असला तरी होते , कारण तो देव आहे. रामाला केवळ माणूस म्हणून पाहणारे लोकच रामाची नैतिक पातळीवर चिकित्सा करू शकतात.
रामाला देव मानणारे लोक रामाच्या चुका मान्य करत नाहीत, कारण रामाच्या देवरूपाने ते आंधळे झालेले असतात. ख्रिस्ती मिशनरी भारतात आले होते तेंव्हा, त्यांना भारतात लोकांचे देवाशी लडिवाळपणे वागणे घृणास्पद वाटले आणि म्हणाले “ हे लोक देवाला न्हाऊ घालतात, खाऊ घालतात, झोपवतात आणि जागे करतात, चोर्या करणार्या आणि गोपीशी व्याभिचार करणाऱ्या देवाची उपासना करतात. ” भारत तेंव्हा निरक्षर होता पण आज सुशिक्षित झाल्यावर देखील देवाला आंघोळ घालणे, खाऊ घालणे, झोपवणे आणि जागे करणे थांबले नाही.
माणसात देव शोधायचा असेल तर देवाचे चरित्र सुद्धा तितकेच शुद्ध पाहिजे, नाहीतर देव सुद्धा खोटाच आहे असे म्हणावे लागेल. खोट्या देवांची जागा तुम्हाला खऱ्या देवांना द्यायची असेल तर खोट्या देवांचा खोटेपणा तुम्हाला खरेपणाने सिद्ध करावा लागेल.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली म्हणून तिची किंमत करता येत नाही. कारण, पाप पुण्याला महत्व देणार्या हिंदू धर्माने रामाला पापाच्या शिक्षेतून वगळून देवपण बहाल केले आणि परिणामी आज विशाल महाकाय त्याचे साम्राज्य पसरले.
वस्तुस्थितीचा कोणताही आधार नसलेली देव ही संकल्पना धार्मिक माणसाला प्रिय असते. धर्मात स्वहित नसून देवाच्या हिताकरिता जगणे असते.
माणूस म्हणून आपण दुय्यम स्थान स्वीकारतो आणि देवाला प्रथम स्थान देऊन माणसात सुद्धा देव शोधायला लागतो. माणसाला माणूस म्हणून स्विकारा , आणि जर माणसात देव शोधायचा असेल तर आधी देवाचे माणूस म्हणून अस्तित्व सिद्ध करा.
ब्राम्हणी देवता शास्त्राच्या खुळचट कल्पनेतून हिंदूनी बाहेर पडल्याशिवाय हिंदूना देवपण आणि माणूसपण दोन्हींच्या संभ्रमातुन मुक्तता नाही.
Comments
Post a Comment