बलात्कार पीडित - स्त्री समाज व न्याय ⚖️
बावीस वर्षांपूर्वी आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार विरोधात बिल्किस बानो न्यायालयात दाद मागत आहेत. बलात्कार झाला तेव्हा पाच महिन्यांची गरोदर असलेल्या बिल्किसच्या घरातील एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. सामूहिक बलात्कारानंतर तीन तास बेशुद्धावस्थेत असलेल्या बिल्कीसचा मृत्यू का झाला नाही म्हणून, तिलाही अनेक वेळा मारण्याचा कट रचण्यात आला. एका घटनेने उद्ध्वस्त झालेले बिल्किसचे कुटुंब सावरत नाही तोपर्यंत तिच्यावर समाजरूपी कंटकांनी असंख्य वेळा बलात्कार केले. बिल्कीस बानोचे अख्खे कुटुंब दंगलीत होरपळले. आजही न्याय मिळावा म्हणून तिचा एकटीचाच संघर्ष अविरतपणे सुरू आहे.
दंगलीनंतरचे सामूहिक बलात्कार भारतात व जगातही नवीन नाहीत, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान अंदाजे 75,000 ते 100,000 महिलांचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार झाले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात लाखो महिलांवर बलात्कार झालेत. भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीतही महिलांना मारण्यात आले. सामूहिक बलात्काराच्या निर्भया, कोपर्डी, हाथरस, उन्नाव अशी प्रकरणे समोर आहेत व जे सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे आहेत. पीडित महिलांनी जे-जे त्यांनी अनुभवले आहे, त्याबद्दल कित्येक महिलांना बोलण्याची संधी मिळत नाही. महत्वाचे म्हणजे, मनोसामाजिक आधार त्यांना मिळालेला नसतो. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना मनावर खोल परिणाम करत जातात व परिणामी त्या परिणामकारक घटनांच्या जखमा पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवल्या जातात.
बलात्कार या विषयावर अतिशय सखोल अभ्यास केलेल्या अठ्ठयांशी वर्षीय लेखिका सुझान ब्राउनमिलर यांच्या "अगेन्स्ट अवर विल" पुस्तकाविषयी विकास दिव्यकिर्ती यांना रणवीर अलाहाबादीयाच्या पाॅडकास्ट मध्ये बोलताना एकदा ऐकले होते. "अगेन्स्ट अवर विल" पुस्तकाची पीडीएफ इंटरनेट मोफत उपलब्ध आहे. "अगेन्स्ट अवर विल" पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुझान ब्राउनमिलर यांनी लिहिले आहे की, जेंव्हा केंव्हा मी बलात्कार या विषयावर बोलते तेंव्हा मला पहिला प्रश्न विचारला जातो की, "तुम्ही बलात्कार या विषयावर चर्चा, संशोधन करत आहात, तुमच्यावर बलात्कार झाला आहे का?" तिच्या संशोधन वृत्तीकडे बघून तिला जितक्या तटस्थपणे प्रश्न विचारला तितक्याच तटस्थपणे तिने "नाही" असे उत्तर दिले. समाजातील लोकांनी काही नियम बनवले आहेत, ज्याचे शोषण झाले त्यानेच त्यावर बोलले पाहिजे व टीका केली पाहिजे. परंतु, 'सुझान ब्राउनमिलर' वेगळया होत्या. सततच्या विचारल्या जाणार्या प्रश्नांना न डगमगता त्यांनी जगातील 'बलात्कार' या विषयावर महत्वपूर्ण कादंबरी लिहिली आहे.
"बलात्कार म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीच्या योनीमध्ये, गुद्द्वारात किंवा तोंडात हेतू परस्पर, दुसर्याच्या संमतीशिवाय त्यांचे लिंग टाकते." बलात्काराची ही सटीक व प्रखर व्याख्या पुरुषांच्या, पुरुषी वर्चस्वाची व त्याखाली दबलेल्या स्त्री अधःपतन झालेल्या व्यवस्थेची प्रचिती देते. मुलींना बलात्काराची व्याख्या माहिती नसते, व्याख्या सोडा बलात्कार म्हणजेच काय माहिती नसते. कारण, त्यावर कुणी बोलण्याची हिम्मत करत नाही. बलात्कार हा विषय बातम्या, टीव्ही पुरता मर्यादित राहिला आहे. बहुतेकवेळा अशा घटनांना वाचा फोडली जात नाही कारण, समाज नावाच्या भीतीपोटी स्त्रिया खितपत पडलेल्या असतात, म्हणून अशा घटना सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक रित्या घडलेल्या असतील तर घटनांना वाचा फुटते. भारतातील खैरलांजी, निर्भया, शक्ति मिल, हाथरस, कठुआ, उन्नाव, ज्या देशात 80 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या विविध प्रकारच्या देवींची पूजा करतात त्या देशातील अशाच काही बलात्काराच्या घडलेल्या ह्या सार्वजनिक काही मोठ्या घटना आहेत.
3 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या बहुप्रतिक्षित 2022 अहवालानुसार महिलांच्या अत्याचारां विरुद्ध 4,45,256 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी, 2022 मध्ये एकूण 31,516 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. राजस्थानात झालेल्या बलात्काराची संख्या प्रथम स्थानावर असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. आकड्यांची नोंद आहे, म्हणून NCRB अहवाल देऊ शकते, परंतु ज्या महिलांकडून त्यांच्यावर बलात्कार झालेला असून देखील कधी गुन्हे नोंदविलेच नसतील त्या आकड्यांचे काय??? हे आकडे अंधारात असलेल्या, बंद खोलीतील, बंद कपाटात अंधारात ठेऊन आहेत. जोपर्यंत यावर प्रकाशाची किरण पडणार नाही तोपर्यंत हे आकडे असेच बंद राहणार आहेत.
बलात्कार करणार्या पुरुषांची मानसिकता काय असावी, यावर अनेक संशोधकांनी सविस्तर लिहिले आहे. समाजात उघडपणे वावरणाऱ्या स्त्रियांना रोज या भीतीपोटी जगावे लागते की, माझ्यासोबत काही घडणार तर नाही ना? पुरुषांच्या घाणेरड्या मानसिकतेमुळे कित्येक स्त्रियांचे निर्भीडपणे जगणेच हरवुन गेले आहे. भारतातील खरी स्त्रीवादी स्त्री फुलन देवी आहे, असे मला वाटते. वास्तविक जीवनातील भारतीय डाकू-राणी जिच्यावर 1980 मध्ये 22 उच्च जातीच्या पुरुषांनी तिच्यावर तीन आठवडे सामूहिक बलात्कार केला, तिला गावात नग्न केले व फुलनने डाकू बनून सर्व 22 सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना ठार मारले. परंतु, प्रत्येक स्त्रीला असे करता येईलच असे नाही. कारण, प्रत्येक स्त्रीकडे बंदूक नसते व बोलण्याची ताकद पण. एका पुरुषांकडे स्त्री पेक्षा काही जास्त असेल तर ते म्हणजे फक्त स्नायूंची शक्ती ( Muscle Power). एकाच ताकदीच्या जोरावर स्त्री पुरुषांच्या खाली दबली गेली आहे. स्त्रियांना उपभोगता यावे म्हणून लैंगिक जनेनद्रियांची दहशत निर्माण करून पुरुष प्रधान समाज मनोविकृत होत आहे. बलात्कार करूनही स्त्री वाचली तर, तिचे स्तन विकृत करणे, योनीत टोकदार वस्तू टाकणे. इतके विकृत कृत्य करून स्त्री वाचली तर सरतेशेवटी गोळी झाडून हत्या करणे.
बिल्कीस बानो न्यायालयात दाद मागत आहे. परंतु , बलात्कार झालेल्या स्त्रियांच्या आरोपीला शिक्षा झाली म्हणजेच त्या स्त्रीला संपूर्णतः न्याय मिळाला असे आपल्याला म्हणता येईल का? न्याय मिळाला तरी बिल्कीसचे कुटुंब, तिची मुलगी, तिच्या घरातील सदस्य, तिचा समाजाकडून झालेला बलात्कार, समाजिक खच्चीकरण परत येणार आहे का??? रस्त्यावर उतरून आपण बलात्कार झालेल्या स्त्रीला न्याय मिळावा म्हणून मोठे-मोठे कॅन्डल मार्च काढणे व तिला न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करणे, इतकीच काय ती आपली न्यायाची परिभाषा. नाही का??? कितीतरी वर्षांनी गुन्हेगार सापडणार, मग न्याय मिळाला म्हणून जल्लोष करणार??? परंतु, एका बलात्कार झालेल्या स्त्रीसाठी हा न्याय अर्धवट आहे, असे मला वाटते. न्याय्य मिळाल्यानंतरचा न्याय कुठे आहे??? काही स्त्रिया आत्महत्या करतात, तर काही नैराश्यात जातात. एखादीच स्त्री बिल्कीस बानो सारखी समाजाला तोंड देत लढू शकते. नाहीतर, लढणार्या फुलन देवीला लोकांनी खाण्यातून विष देऊन मारून टाकले हे विसरता कामा नये.
बलात्कारित स्त्रियांच्या बाबतीत नागरिक म्हणून त्यांचे असंख्य वेळा हक्कच नाकारले जातात. समाजातील तिने गमावलेले स्थान, मान सर्व गोष्टींना ती मुकते व एका कोशात ती आयुष्याशी प्रताडना करीत जगते. बलात्कारित स्त्रीला उघड माथ्याने मनमोकळे जगता यावे, म्हणून समाज याकरिता काही पावले उचलतो का??? तिला पहिल्यासारखी वागणूक घरातून तरी मिळत असेल का??? तिला नोकरी करता येईल का??? तिला नोकरीवर कोणी घेईल का??? तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल का??? नव्याने आयुष्य सुरु करावे म्हणून कुठला पुरुष तिच्याशी लग्न करू शकतो का??? समाजात न्यायाची प्रक्रिया अवघड आहे, परंतु न्याया नंतरची प्रक्रिया म्हणजे सामाजिक न्यायाची त्याहीपेक्षा अवघड आहे. बलात्कारित स्त्रियांना बलात्कार झाल्यानंतरही समाजात उघडपणे व स्वछंदपणे जगता आले तर, खऱ्या अर्थाने समाज हा न्यायप्रिय प्राणी आहे असे आपल्याला म्हणता येईल. नाहीतर बलात्कारित स्त्रीवर समाजाकडून रोजच तिच्यावर बलात्कार केल्या जातो...✍️
संदर्भ :
1) इंडियन एक्स्प्रेस
2) लोकसत्ता
3) रणवीर अलाहाबादीया पाॅडकास्ट
4) अगेन्स्ट अवर विल ~ सुसान ब्राउनमिलर
5) NCRB रीपोर्ट
Comments
Post a Comment