30 जानेवारी...

30 जानेवारी 1948 ज्या दिवशी सर्व जग एका शोकाकुल वातावरणात निघून गेले. क्षणार्धात काय झाले हे, कुणाला काही कळलेच नाही. आपल्या सोबत असणारे गांधी, पापणी लवण्याच्या आत कसे निघून गेले? आभा आणि मनूच्या खांद्यावर हात ठेवुन, प्रार्थनास्थळी जाणारे गांधी अचानक कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो देह, एक नीरव शांतता घेऊन निपचित पडला होता. तो, हडकुळा देह शेवटी जातानाही सांगत होता, अहिंसा हाच मोठा धर्म आहे... बुद्धाची शांतता त्या, देहावर जाणवत होती. समुद्रलाही, लाटा जोरजोराने लाटा धडकाव्यात... आणी त्या लाटेत आपण कुठेतरी निघून जावे. असेच हे वातावरण होते. गांधीजींचा मृत्यू म्हणजे आपला मृत्यू आणि देशाचा मृत्यू अशी जनभावना उमळू लागली.
    
नेहमीप्रमाणे वेळेवर जाणाऱ्या गांधीजींना, त्या दिवशी प्रार्थना स्थळी जाण्यासाठी 10 मिनिट उशीर झाला. वेळेच्या बाबतीत गांधीजी कधीच चुकत नसत. प्रत्येक, कामात वेळ पाळणारे गांधीजी मात्र त्या दिवशी वेळ पाळण्याचे चुकलेत. इकडे दिल्लीतील बिर्ला भवन संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी, प्रार्थनास्थळ खचाखच भरलेले होते. तत्पूर्वी , बिर्ला भवनमध्ये गांधीजी नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या उपपंतप्रधानाशी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी त्यांची चर्चा विनिमय चालले होते. सरदार पटेल यांच्यासोबत त्यांची मुलगी मणिबेन, सचिव या नात्याने त्यांच्यासोबत आल्या होत्या. दुपार झाली होती. नेहमीप्रमाणे गांधीजींसाठी आभाने भोजन आणले. सरदारांशी बोलत बोलत गांधीजींचे भोजन चालले होते. सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये काहीतरी मतभेद झाल्याची कुजबुज लोकांच्या कानी पडली होती. आणि, नेहमीप्रमाणे त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठी हा विषय गांधीजींकडे आला. यांच्यामध्ये त्यामुळे, गांधीजींना काय वेळ झाली हे, कळलेच नाही. नेहमी वेळ कटाक्षाने पाळणारे गांधीजी त्या दिवशी वेळ पाळण्यास त्यांच्याकडून दुर्लक्षित झाले.
    
वेळेच्या बाबतीत, काटेकोर असणारे गांधीजी त्या दिवशी पटेल सोबतच्या चर्चेत व्यस्त झाले. आभाच्या लक्षात आले, आज गांधीजींना वेळ होत आहे ते, परंतु चर्चेत व्यत्यय येऊ नये म्हणून ती, सांगण्यास थोडे कचरत होती. शेवटी, खूप वेळ होत आहे म्हणून तिने गांधीजींना त्यांचे घड्याळ दाखविले! " आता मला निघायलाच पाहिजे! " असे म्हणून गांधीजी उठले. स्वच्छतागृहात जाऊन आल्यानंतर, गांधीजी बिर्ला भवनच्या डाव्या हाताला असणाऱ्या प्रार्थना स्थळी जायला निघाले. वयानुसार, गांधीजींना चालायला आधार लागत असे. त्यामुळे, प्रार्थनास्थळी जाताना गांधीजींना आभा आणि मनू आपल्या खांद्याचा आधार देत, गांधीजी दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवुन चालत. " या तर माझ्या काठ्या आहेत. " असे त्या मुलींच्या बाबतीत गांधीजी म्हणत असत. 
    
गांधीजींच्या चालण्यात अतिशय निरागसपणा होता. जेवताना आभाने दिलेला गाजराच्या रस्याची त्यांना आठवण झाली. गांधीजी म्हणाले, " एकूण तू मला पशूपेय दिले म्हणायचे. बा तर याला घोड्याच पेय म्हणायची! " गांधीजी पुढे म्हणाले " एकंदर जे कुणालाही खायला आवडत नाही ते मी अगदी आवडीने खातो. असचं ना ? असा, हसत हसत गांधीजींचा संवाद मनू आणि आभाशी चालला होता. तेवढ्यात आभाने गांधीजींना विचारले, " बापू, आज तुमचे घड्याळाकडे अजिबात लक्ष नाही , असे दिसतेय. " गांधीजी म्हटले," तुम्ही दोघीजणी माझा वेळ सांभाळायला असल्यावर त्या वेळेची काळजी मी कशाला घ्यावी." " परंतु, आज तर तुम्ही आमच्याकडे बघायलाही तयार नाही आहात. " आभाच्या उत्तरावर गांधीजी खळखळून हसले. चालत चालत, ते प्रार्थना स्थळा जवळ असलेल्या, हिरवळी, पर्यंत पोहोचले. चारशे - पाचशे लोक त्या दिवशी प्रार्थनास्थळी जमलेत. 
    
गांधीजीं स्वतःशी पुटपुटले, "आज मला यायला दहा मिनिट उशीर झाला. असा उशीर करणे मला मुळीच आवडत नाही. असे म्हणून, ते प्रार्थना स्थळी चौथऱ्यावर पोहचण्यासाठी त्यांनी चार - पाच पायऱ्या पटापट चढल्यात. गांधीजी ज्या मंचावर बसुन प्रार्थना घेत, तो मंच फक्त पाच - सहा पावलांवर होता. सगळेजण गांधीजींना वाकून नमस्कार करीत होते. त्यांना, जाण्यासाठी वाट करून देत होते. गांधीजी, आभा आणि मनू यांच्या खांद्यावरून हात काढून सगळ्यांना नमस्कार करत होते. तितक्यात एक, इसम गांधीजींच्या वाटेत आला. गांधीजींना त्याने नमस्कार केला. गांधीजींना पहिलेच, प्रार्थनेसाठी उशीर झाला, त्यामुळे मनूने त्याला हात झटकून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने तिलाच बाजूला ढकलून दिले. आणि, ती बाजूला जाऊन पडली. आणि, काही कळायच्या आत, त्या इसमाने गांधीजींच्या पुढ्यात पिस्तूल रोखले, आणि सटासट तीन गोळ्या घातल्या. गोळ्या, लागल्यामुळे गांधीजींचा देह प्रार्थनेच्या वाटेवर जात असताना, थोड्याच अंतरावर कोसळून पडला. आभाच्या खांद्यावर, त्यांनी हात ठेवला आणि " हे राम " पुटपुटले, आणि कायमचे ह्या जगाला शोकसागरात लोटून गेले. 

आभा आणि मनू यांनी, गांधीजींचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. गांधीजींचे थोडे उघडे डोळे पाहून, त्यांना असे वाटले थोडा प्राण बाकी असावा. सरदार पटेल आले, त्यांनाही गांधीजींची नाडी पाहून तसेच वाटले. परंतु, तसे काहीच झाले नव्हते. कोणीतरी हजरजबाबीपणा दाखवत, डॉक्टरांना पाचारण केले. दहा मिनिटात ते आलेत. डॉ. डी. पी. भार्गव यांनी सांगितले " दहा मिनिटा पूर्वीच गांधीजींचा मृत्यू झाला आहे." सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. गांधीजींच्या पार्थिव शरीराकडे पाहून सगळेजण हुंदके देत होते. डॉ. जीवराज मेहता आले. त्यांनी सुद्धा गांधीजींच्या मृत्यूला दुजोरा दिला. गांधीजींच्या मृत्यूची वार्ता सर्व जगभर वाऱ्यासारखी पसरली. साऱ्या जगाला गांधीजींच्या मृत्यूने हादरा बसला. गांधीजींच्या छातीत लागलेल्या गोळ्या जणूकाही आपल्याच छातीत लागल्या असे सर्वांना वाटू लागले. 
    
गांधीजींच्या मृत्यूची बातमी एकूण, सगळेजण एक एक करून गोळा होऊ लागलेत. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, शिक्षणमंत्री मौलाना आझाद, गांधीजींचा पुत्र देविदास सर्वच राजकीय नेते गोळा झाले. कुणाच्याही, न कळत घडलेली ही गोष्ट सर्वांना चटका लावत होती. देविदास आपल्या पित्याचा देह पाहून, त्याने त्यांच्या देहाला स्पर्श केला. निद्रिस्त अवस्थेत असणारे गांधीजींचे शरीर त्यास उबदार वाटत होते. त्यांचे मस्तक आभाच्या मांडीवर विसावले होते. देविदास या स्थितीचे वर्णन करताना म्हणतो, " रात्रभर आम्ही अत्यंत शोकमग्न अवस्थेत त्यांच्या शेजारी बसून होतो. त्यांच्या, मुखावर मृदू शांत प्रभा पसरली होती, आणि त्यांच्या शरीराभोवती दैवी प्रकाशवलय पसरले आहे, असे वाटत होते. आपण शोक करून त्या पावित्र्याचा अनादर तर करीत नाही आहोत ना, असे आम्हाला वाटू लागले. "
    
जशी जशी वेळ सरकू लागली, तशी- तशी गांधीजींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांची रीघ वाढू लागली. अनेक, राजकीय नेते तिथे आले होते. त्यापैकी, अनेक जणांना रडू कोसळले. हजारो लोक, ओळीने त्यांचे अंतिम दर्शन घेत होते. जणूकाही, महासागर लोटला. गांधीजींचा तो निपचित पडलेला देह पाहून, अनेक जणांना अश्रू आवरत नव्हते. त्यांच्या, अश्रूंना कुठलाही बांध नव्हता. 
    
गांधीजींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी, अनेक लोक दुरून दुरून येत होते. गांधीजींच्या अंत्ययात्रेला, लोकांच्या गर्दीने जणू काही महासागराचे रूप धारण केले. बिर्ला भवन मधून त्यांचा देह मध्यरात्री गच्चीवरून खाली आणण्यात आला. तिथे, हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथातील श्लोकांचे वाचन चालू असताना अनेकांना रडणे आवरत नव्हते. गांधीजींचा तिसरा मुलगा रामदास येईपर्यंत, पुन्हा एकदा त्यांचा देह गच्चीवर नेण्यात आला. जेणेकरून सगळ्यांना दर्शन घेता येईल. शोकाकुल झालेल्या या वातावरणामुळे, सर्व गर्दी शोक सागरात बुडून गेली. रामदास, नागपूर वरून आल्यानंतर गांधीजींचा देह, परत गच्चीवरून बिर्ला भवनच्या मुख्य प्रांगणात आणल्या गेला. गांधीजींच्या, मस्तकाच्या जवळ पुष्पचक्र ठेवण्यात आले... 
     
गांधीजींचा देह, दुसऱ्या दिवशी शववाहिकाने पवित्र यमुना नदीच्या किनारी आणण्यात आला. गांधीजींची अंतिम यात्रा, अल्बुकर्क मार्गावरील बिर्ला भवन पासून निघाली. यमुना नदी पर्यत साडे पाच मैल अंतर पायी येत येत सुमारे 4 वाजून 20 मिनिटे झाले होते. यमुना किनारी, आपल्या आवडीच्या नेत्याला पाहण्यासाठी आधीच तिथे 10 लाख लोकांचा जमाव आला होता. गांधीजींच्या शव वाहिके समोरुन चार हजार लष्करी सैनिक, एक हजार वैमानिक व नौदलाचे शंभर खलाशी शिरस्त्राणे घालून आपल्याला निरनिराळ्या रंगाच्या गणवेशात शववाहिकेच्या पुढे - मागे संचलन करीत होते. त्यामध्ये, गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांचे अंगरक्षक असलेले धारकरी - घोडेस्वार, हातात लाल पांढरे त्रिकोणी बावटे घेऊन चालले होते. 
     
यमुना नदीपासून, थोड्या अंतरावर, चिता रचण्यासाठी दोन फुट उंचीचा आणि साधारण आठ बाय आठ फुट आकाराचा चौथरा बांधण्यात आला. त्यावर, चंदनाच्या लाकडाची चिता रचण्यात आली. आणि, त्या चितेवर गांधीजींचा शांत आणि निरागस देह ठेवण्यात आला. बुद्धाच्या शांततेची शिकवण आजीवन पाळणारे गांधीजी आज कायमचे शांत होऊन गेले. ज्या, प्रमाणे बुद्ध मृत्यू समयी उत्तरेकडे मस्तक आणि दक्षिणेकडे पाऊल ठेवुन स्थिरावले त्याचप्रमाणे गांधीजींचा देह त्या चंदनाच्या चितेवर शांत निपचित पहुडलेला होता. 
     
दुपार टळून गेली, संध्याकाळचे पावने पाच वाजले. रामदासने अग्नी प्रज्वलित केला. जमा झालेल्या लोकांच्या, डोळ्यातून तत्क्षणी हुंदके बाहेर यायला लागले. स्त्रिया आक्रोश करू लागल्यात. रामदासने, रडत रडत आपल्या पित्याच्या शांत देहाला अग्नी दिला. तशी, आसमंतात एकच आरोळी उठली, देशासाठी धडपडणारा देह आज कायमचा शांत झाला... शांत झाला... शांत झाला...

⚜️ गांधीजींवर आधारित माझ्या अप्रकाशित पुस्तकातील एक भाग...✍️

Comments

Popular posts from this blog

वेश्या व्यवसाय, आजची स्त्री व आजचा पुरुष....???

रीक्लेम द नाइट : जातीय भेदभावाचा अंधार

शोषितांच्या संघर्षाची खिल्ली