'मनुस्मृती' दहन झाली का???
25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा मूळ धार्मिक आधार असलेल्या व त्याचे प्रतीक नाकारण्यासाठी हिंदूचा आद्य ग्रंथ म्हणजेच 'मनुस्मृती'चे दहन केले. आंबेडकरांनी केलेली ही राजकिय कृती असली तरी,
सामाजिक परिवर्तनाची त्यास एक किनार होती. स्त्रियांसह, अस्पृश्य लोकांना असमानतेची अमानुष वागणूक देणारे घाणेरडे नियम त्यात समाविष्ट होते. तमाम स्त्रियांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम सहजासहजी झाला नव्हता. कारण, फारच तुरळक लोकांचा आंबेडकरांच्या या कृतीला पाठींबा होता. आंबेडकरांनी जनतेला उद्देशून म्हटले होते, "असमानतेने जन्माला घातलेल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचा अधिकार नष्ट करूया. धर्म आणि गुलामगिरी सुसंगत नाही."
मनुस्मृती दहनच्या कार्यक्रमात केवळ स्त्रिया व अस्पृश्य लोक नव्हते तर, काही ज्ञानी ब्राम्हण सुद्धा होते आणि ही एक आश्चर्याची बाब आहे. आंबेडकरांचे सहकारी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे म्हटले, "मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो असलो तरी मनुस्मृतीच्या सिद्धांताचा मी निषेध करतो. ते धर्माचे नाही तर विषमता, क्रूरता आणि अन्यायाचे प्रतीक आहे. पिढ्यानपिढ्या दुःखाला कारणीभूत असलेल्या मनुस्मृतीचे जाहीर दहन करण्यात यावे, असा ठराव मी मांडतो."
★ मनुस्मृतीने सांगितलेले काही नियम बघुया ~
1) स्त्री स्वतंत्रपणे जगण्यास समर्थ नसल्यामुळे , तिला लहानपणी तिच्या वडिलांच्या ताब्यात, स्त्री (पत्नी) म्हणून तिच्या पतीच्या ताब्यात आणि विधवा म्हणून तिच्या मुलाच्या ताब्यात ठेवावे.
2) आपल्या पत्नींवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे, हे सर्व पतींचे कर्तव्य आहे. शारीरिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या पतींनीही आपल्या पत्नींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
3) नामकर्म आणि जातकर्म करताना, वेद मंत्रांचे पठण स्त्रियांनी करू नये, कारण स्त्रियांमध्ये सामर्थ्य आणि वैदिक ग्रंथांचे ज्ञान नसते. स्त्रिया पवित्र नसतात व त्या सतत खोट्याचे प्रतिनिधित्व करतात.
4) दारू पिणे, वाईट लोकांचा सहवास, पतीपासून दूर होणे, भटकंती करणे, बेफिकीर कितीही तास झोपणे हे स्त्रियांचे दोष आहेत.
5) जर एखाद्या स्त्रीने , स्वतःच्या श्रेष्ठतेच्या महानतेचा गर्व बाळगला, तिच्या पतीप्रती असलेल्या स्वतःच्या कर्तव्याचे उल्लंघन केले तर, राजाने तिला सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांसमोर फेकण्याची व्यवस्था करावी.
6) ब्राह्मण पुरुष ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि अगदी शूद्र स्त्रियांशी लग्न करू शकतात. परंतु, शूद्र पुरुष फक्त शूद्र स्त्रियांशीच लग्न करू शकतात.
7) एखाद्या महिलेने उच्च जातीतील पुरुषासोबत सेक्सचा आनंद घेतल्यास, हे कृत्य दंडनीय नाही. परंतु याउलट, जर एखाद्या स्त्रीने खालच्या जातीतील पुरुषासोबत सेक्सचा आनंद घेतला तर तिला शिक्षा देऊन तिला एकटे ठेवले पाहिजे.
8) खालच्या जातीतील पुरुषाने उच्च जातीतील स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवल्यास, त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली पाहिजे व जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या जातीतील स्त्रियांसह आपली शारीरिक इच्छा पूर्ण केली तर त्याला त्या स्त्रीच्या विश्वासाची भरपाई देण्यास सांगितले पाहिजे.
9) पुरुषांमध्ये सद्गुणांची कमतरता असू शकते, अगदी लैंगिक विकृत, अनैतिक आणि कोणतेही चांगले गुण नसलेले असू शकतात आणि तरीही स्त्रियांनी त्यांच्या पतीची सतत पूजा आणि सेवा केली पाहिजे.
10) पात्र असलेल्या शूद्राने कधीही संपत्ती जमा करू नये, कारण जेव्हा शूद्र श्रीमंत होतो तेव्हा तो ब्राह्मणांना त्रास देतो.
★ स्त्रियांच्या बाबतीत मनुस्मृतीचे मत ~
मनुस्मृतीने स्त्रियांना उपभोगीय साधन म्हणून म्हणुन प्रस्थापित केले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषी नियंत्रण ठेवण्यासाठी मनुस्मृतीने पुरुषाला उद्युक्त केले. पुरुष, नीच, हरामी, दारुडा, कमकुवत, मारझोड करणारा असला तरीही स्त्रियांनी त्यांचे पाय धुवून पाणी पिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला ज्ञान संपादन करण्याचा अधिकार नाकारला. तिने कुठल्याही परिस्थितीत पुरुषाला परमेश्वर मानून त्याची गुलामी केली पाहिजे. स्त्रीच्या बाबतीत मनूने बनवलेले हे नियम पुरुषी व्यवस्था बळकटीकरण करण्यास कारणीभूत ठरले. प्रश्न पडतो, मनुस्मृतीने सांगितलेल्या किती नियमातून स्त्री बाहेर पडली आहे. उलट, आता पुरूषापेक्षा, स्त्रीच स्वतःहून पुरुषी वर्चस्व बळकटीकरणास बढावा देत आहे. स्त्री मुक्ती करण्यासाठी "हिंदू कोड" बिलाला सर्वात जास्त विरोध स्त्रियांनीच केला होता, इतिहास साक्षी आहे. कारण, इथल्या स्त्रीला पुरुषी व्यवस्था तीव्रपणे मान्य आहे. तिच्यावर कितीही अन्याय झाला तरी ती पुरुषी दबावाखाली, पुरुषी वर्चस्व निमुटपणे सहन करते. बेशरम, बेअक्कल, बावळट हे शब्द तिचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पुरेसे आहेत. तिचे मत इतरांपेक्षा थोडे वेगळे असेल तर तिला तो मांडण्याचा अधिकार नसतो. स्त्रीने इतरांच्या मताला अनुमोदन दिले पाहिजे. तिच्या स्व-मताची कुणाला किंमत नसते. स्त्रियांच्या बद्दल प्रेम व आदर ही भावना क्वचितच दिसते. स्त्रीने सुद्धा ही व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी पुरुषांनाच पाठींबा दिला परिणामी ही व्यवस्था आणखी बळकट झाली आहे.
★ अस्पृश्यांच्या बाबतीत मनुस्मृतीचे मत ~
अस्पृश्य लोकांना वर्णाश्रम धर्मात स्थान नाही, ते 'बहिष्कृत' आहेत असे मनुस्मृतीने ठासून सांगितले. अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मनूस्मृतीने हिरावून घेतला. अस्पृश्य लोकांनी वरच्या वर्गाची चाकरी केली पाहिजे. शारीरिक, मानसिक गुलामगिरीत अस्पृश्यांना जखडून ठेवले पाहिजे. अस्पृश्यांना कोणताच अधिकार नको नाहीतर ते डोक्यावर चढतील. पायातून जन्म झालेल्या अस्पृश्यांसाठी पायाखालील जागा मनुस्मृतीने निश्चित केली. अस्पृश्य लोकांना हिंदू धर्मात कोणतेही महत्वपूर्ण स्थान नव्हते. अस्पृश्य लोकांपेक्षा हिंदू धर्मात, हिंदूला मोठे स्थान प्राप्त होते. अस्पृश्य लोकांचे पावलांचे ठसे उमटू नये म्हणून पाठीला झाडू बांधणे, थुंकीसाठी गळ्यात मडकी बांधणे पेशव्यांच्या काळात बंधनकारक होते, पाणी, अन्न, शिक्षण मनुस्मृतीने नाकारले. परिणामी, हिंदूंचे ब्राह्मणी वर्चस्व प्रस्थापित झाले व अस्पृश्य लोक गुलाम झाले. मनूने माणूस म्हणून माणसांचे अस्तित्व नाकारले, राजस्थानमध्ये हायकोर्टाच्या इमारतीसमोर मनुचा आज मोठा पुतळा उभा केला आहे. यातून दिसून येते की, काही उच्च वर्णीयांच्या लोकांना देशाचे हिंदुत्ववीकरण करण्याचा मोठा अजेंडा आहे. जगासमोर बडेजाव करीत असलेले लोक, छुपे मनुवादी आहेत. पुरोगामी चळवळीने मोठा झालेला महाराष्ट्र सुद्धा जातीभेदाच्या चक्रातून बाहेर पडला नाही. आजच्या काळाचा विचार केला तर फक्त प्रतिगामी लोकांना दोष देऊन चालणार नाही, स्वतःला पुरोगामी म्हणणारे सुद्धा तितकेच मनुवादी व जातीभेद करणारे लोक आहेत. निरीक्षणात अचूकता असेल तर ह्या बाबी निदर्शनास येतील. कारण, जगासमोर जातीभेद न बाळगणारे लोक छुप्या पद्धतीने जातीभेद करतच असतात. मनुस्मृतीने नियम सांगितले, पण नियम बाळगणारे कुठल्याही जाती धर्मातील लोक अर्धे मनुवादीच आहेत.
★ मनुस्मृती दहन झाली का???
डॉ. आंबेडकरांनी प्रतिकात्मक मनूस्मृतीचे दहन केले, आंबेडकरांना लोकांनी प्रश्न विचारला, "मनुस्मृतीचे दहन करून काय साध्य होणार आहे? ती जुनी पुस्तिका आहे." आंबेडकर म्हटले, "ती जुनी पुस्तिका आहे, मग कुणी जाळले काय व जाळले नाही काय, त्याने काय फरक तुम्हाला पडतो?, गांधीनी विदेशी कपडे जाळले, त्याने काय साध्य झाले?" आंबेडकर पुन्हा म्हटले, "हा एक निषेध नोंदविण्याचा प्रकार आहे. तसाच आमचाही मनुस्मृतीच्या विरोधात आहे." आंबेडकरांनी पुढे जाहीर केले की, "दुर्दैवाने मनुस्मृतीच्या दहनाने ब्राह्मण नष्ट होत नसेल तर, एकतर 'ब्राम्हण्य-ग्रंथ' जाळून टाकावे लागतील, किंवा हिंदू धर्माचा त्याग करावा लागेल."
आंबेडकरांनी एका 'मनुस्मृती'चे दहन केले. यावेळी स्त्री व अस्पृश्यां बद्दल प्रश्न निर्माण होतात...
★ स्त्रियांच्या बाबतीत पुढीलप्रमाणे ~
1) येथील स्त्रीच्या मनातून मनूस्मृती दहन झाली का?
2) आजच्या दिवशी स्त्री-मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. स्त्री-मुक्ती झाली आहे का?
3) स्त्रिया पुरुषी विळख्यातून बाहेर पडल्यात का?
4) स्त्रिया पारंपरिक दृष्टिकोनांतून बाहेर पडल्यात का?
5) स्त्रियांच्या मनात असलेल्या पुरुष सत्ताक पद्धतीचे निर्मूलन झाले का?
6) स्त्रियांवरील पुरुषांचे अत्याचार कमी झालेत का?
7) स्त्रियांनी वडाला पूजने बंद केले का?
8) सौभाग्याचे लेन असलेले, पुरुषी वर्चस्वाचे सिंदूर, बांगड्या, टिकली, मंगळसूत्र, पायात जोडवे, चैन, उपास करणे हे प्रतीके नष्ट झाले का?
★ अस्पृश्यांच्या बाबतीत पुढीलप्रमाणे ~
1) अस्पृश्य लोक शिक्षणाने व संविधानाने पुढे गेले असले तरी, त्यांचेकडे अस्पृश्य म्हणून बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे का?
2) खैरलांजी, हाथरस सारख्या घटनांनंतर किती अस्पृश्य लोकांवरील अत्याचार थांबले आहेत?
3) अत्याचार झालेल्या घटनांत कितपत न्याय मिळाला आहे? त्याचबरोबर, न्याय मिळाल्या नंतरचा समाजिक न्याय मिळाला आहे का?
4) नाल्या, गटारे साफसफाईचे काम अस्पृश्य लोक सोडून किती उच्च वर्णीय लोक नाल्या, गटारे साफसफाईचे काम करण्यात उतरले आहेत?
5) 'आरक्षण' शब्द शिवीगाळ केल्यासारख्या अस्पृश्य लोकांसाठी उच्च वर्णीय लोकांकडून उच्चारला जातो, आरक्षणाने कितपत अस्पृश्य लोकांची प्रगती झाली आहे?
6) अस्पृश्य मुला-मुलींसोबत सोबत प्रेम करायचे, पण लग्नाचा विषय आला की जात, धर्मावर अडून बसायचे थांबले आहे का?
★ अस्पृश्य लोकांसाठी काही प्रश्न ~
1) अस्पृश्य लोकांनी स्वताच्या मनातून आपण अस्पृश्य आहोत हे काढून टाकले आहे?
2) हिंदू धर्माच्या नियमांच्या जोखडातून अस्पृश्य संविधानाने सुटका केली तरी, अस्पृश्यांनी अस्पृश्य म्हणून अस्पृश्यता नष्ट केली आहे का?
3) अस्पृश्य लोक एकसंध झाले का?
स्त्रियांच्या बाबतीत व अस्पृश्यांच्या बाबतीत निर्माण झालेले हे प्रश्न कोड्यातच आहेत. मनुस्मृतीच्या जोखडातून सुटायचे असेल तर, फक्त मनुस्मृतीच्या दहनाने मनुस्मृती दहन होणार नाही. तर, यासाठी मनुवादी जगण्याला स्त्रियांनी स्वतःच्या जगण्यात स्थान दिले आहे ते मनुचे स्थान आधी नष्ट करावे लागेल. डॉ. आंबेडकरांनी एक दिवस मनुस्मृती दहन केली, परंतु आजच्या स्त्रीला तिचे दररोज दहन करणे गरजेचे आहे. प्रतिकात्मक स्वरुपात नाहीतर निदान मनातील मनुच्या पुस्तकाचे दहन प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत मनुच्या नियमांना तिलांजली देऊन, महात्मा फुलेंना, डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र व भारत घडविणे आवश्यक आहे. आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली असताना, मनुवादी संस्कृती जोपासायला स्त्रीने नाकारले पाहिजे. स्त्रीच्या स्त्री-तत्वाचा व अस्पृश्यांचा अस्पृश्यतेचा हा लढा कायमचाच आहे.
म्हणून
मनुस्मृती दहन एक दिवस नको...
रोजच दहन झाली पाहिजे... ✍️
संदर्भ ~
1) मनुस्मृतीचे नियम - मनुस्मृती
2) डॉ. आंबेडकर स्त्रियां विषयक विचार
3) फेमिनिझम इंडिया
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द अनटोल्ड ट्रुथ
5) द वायर
Comments
Post a Comment