आंबेडकर व स्त्रीवाद...
आंबेडकर व स्त्रीवाद...
❛❛ I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved. ❜❜
असे बोलणारे भारतातील पहिले व एकमेव स्त्रीवादी नेता म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. असे असूनही त्यांच्या स्त्रीवादी धोरणांकडे दुर्लक्ष करणारे कोणी असेल तर या भारतातील दुसरे तिसरे कोणीही नसून येथील भारतातील स्त्रीच आहे. आजच्या उच्च वर्णीयांच्या स्त्रिया, स्वतःला स्त्रीवादी म्हणून घेणार्या खोट्या स्त्रीवादी असणार्या किती स्त्रीवादी स्त्रिया आंबेडकरांच्या योगदानाबद्दल बोलतात? आजच्या स्त्रीवादी असणार्या स्त्रियांनी स्वतःच्या दृष्टिकोनातून स्त्रीवाद खोटारडा, उच्चभ्रूंच्या हिताकरिता तयार केलेला खोटा स्त्रीवाद आहे. उच्चवर्णीय असणार्या स्त्रीवादी स्त्रियांनी आंबेडकरांच्या स्त्रीवादी दृष्टिकोनाला दलित महिलांशी संवाद साधायच्या हेतूनेच स्त्रीवाद मांडला आहे.
एका साचेबद्ध साखळीत स्त्रीवादी धोरण येथील स्त्रीवादी स्त्रियांनी स्त्रीवाद गुंडाळून ठेवला आहे. आंबेडकरांनी नेहमीच सांगितले आहे, "भारतातील स्त्रिया ह्या जातीव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार आहेत. जातीव्यवस्थेने स्त्रियांच्या अधीनतेसाठी एक रचना तयार केली आहे, ती व्यवस्था नष्ट करून टाकली पाहिजे." हिंदूचा तथाकथित पवित्र ग्रंथ असलेल्या मनूस्मृतीच्या वैदिक ग्रंथांद्वारे स्त्रियांना होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराचे तपशीलवार वर्णन आंबेडकर नेहमी त्यांच्या लिखाणातून करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, "पतीच्या काहीही त्रुटी स्त्रियांच्या लक्षात आल्या तरी तिने एक आदर्श पती म्हणून, पूजेचा पुतळा म्हणून आपल्या पतीला आदर्श मानले आहे."
आंबेडकर म्हणतात, "शूद्रांनाही इतकी हीन दर्जाची वागणूक नसेल तितकी हीन दर्जाची वागणूक मनूस्मृतीच्या माध्यमातून मनुने स्त्रियांना दिली आहे." स्त्रीवादी असणार्या किती स्त्रियांनी आपल्या आजुबाजूला व स्वतःच्या घरात स्त्रीवादी दृष्टीकोनाची पायाभरणी केली आहे??? आजही स्त्री पुरुषांचे खरकटे ताट उचलण्यात व पुरुषांची अंडरवियर धुण्यात धन्यता मानते. स्त्रीवादी स्त्रियांनी व पुरुषांनी आजकाल बोलण्यापुरता, कृतिशून्य स्त्रीवाद निर्माण केला आहे व आजची चंगळवादी पिढी त्याला बळी ठरते आहे. स्त्रीवादी स्वतःला म्हणून घेणारी, स्त्रीवादावर भाषणे देणारी मंडळी किती टक्के स्त्रियांचा स्त्रीवादी दृष्टिकोन बदलण्यात यशस्वी झाली आहे???
आंबेडकरांनी केवळ स्त्रियांच्या हक्कांसाठी काम केले नाही तर, स्त्री-पुरुष समानतेचे महत्वाकांक्षी धोरण साकारण्यासाठी काम केले. आंबेडकरांनी स्त्री कामगारांना काम करताना संरक्षण मिळावे यासाठी काम केले, सेक्स वर्कर्सच्या हक्कांसाठी वकिली केली, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी किंबहुना हे काम तुम्ही का करता म्हणूनही त्यांना समजावून सांगितले, "स्त्रियांचा सर्वांत मोठा दागिना काही असेल तर तिचे चरित्र व तिचे शील जपणे हे कुठल्याही एका आद्य स्त्रीचे कर्तव्य आहे. आंबेडकरांनी, महिला कामगारांच्या कामाच्या तासांची संख्या कमी करावी व कामाची परिस्तिथी सुधारावी या हेतूने सुद्धा महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
इ. स. 1928 मध्ये, बॉम्बे विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करतांना, आंबेडकरांनी कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना पगारी प्रसूती रजा मंजूर करण्याच्या विधेयकाला समर्थन दिले. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या स्त्रीवादाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे "हिंदू कोड बिल" ब्राम्हणी व्यवस्थेला हादरून सोडणारे हिंदू कोड बिल आंबेडकरांनी संसदेत सादर करून एका स्त्रीची बाजू भक्कमपणे उभे करणारे हे हिंदू कोड बिल मांडले. हे विधेयक स्त्री-पुरुषांसाठी संपत्तीची पद्धती, विवाह, घटस्फोट, बहु-पत्नीतत्व यातून स्त्रियांची मुक्तता त्याचबरोबर असंख्य मुद्द्यांची मांडणी या बिलाच्या माध्यमातुन त्यांनी केली. संसदेत बसून असणारी कितीतरी रुढीवादी, परंपरावादी हिंदूवादी पुरुषांना झुगारून स्त्रीला व्यवस्थेत संपूर्ण अधिकार मिळवुन देण्याच्या उद्देशाने ते आपल्या मुद्द्यांवर ठाम राहिले. परंतु , आजची स्त्री मात्र पुढच्या जन्मातही मला हिंदू म्हणूनच जन्माला घाल म्हणून मनोमनी मनोकामना करते.
ऑल-इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्सला संबोधित करताना आंबेडकरांनी स्त्रियांना सांगितले : "तुमच्या मुलांना शिक्षण द्या. त्यांच्यामध्ये एक महत्त्वाकांक्षा निर्माण करा. लग्नाची घाई करू नका. विवाह एक दायित्व आहे. मुले आर्थिकदृष्ट्या स्वतःचे दायित्व पूर्तता करण्यास सक्षम असल्याशिवाय तुम्ही ते त्यांच्यावर लादू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न करणाऱ्या प्रत्येक मुलीने तिच्या पतीच्या बाजूने उभे राहावे, तिचा पती तिचा मित्र असला पाहिजे, ना की ती त्याची गुलाम असली पाहिजे. "
डॉ.आंबेडकरांनी जानेवारी 1920 व 1927 मध्ये अनुक्रमे 'मूकनायक' नावाचे वृत्तपत्र व 'बहिष्कृत भारत'नावाचे पाक्षिक सुरू केले आणि या दोन्ही वृत्तपत्रांमध्ये महिला आणि त्यांच्या हक्कांशी संबंधित विषयांना नियमितपणे स्थान दिले. दलित स्त्रियांच्या मेळाव्यात सुद्धा बोलतांना आंबेडकर नेहमी म्हणायचे, "या सभेत बसलेल्या तुम्ही आणि सवर्ण स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलांमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? तुम्ही विचार करा आणि समजून घ्या की तुमचे ब्राह्मणाइतकेच चारित्र्य शुद्ध आणि पवित्र आहे. किंबहुना, तुमच्याजवळ असलेली कृती करण्याची हिंमत व इच्छाशक्ती अगदी ब्राह्मण स्त्रीमध्येही नसते. मग तुमच्या पोटी जन्मलेल्या मुलांचा अपमान का व्हावा? त्यांना शिक्षण द्या. तुम्ही हा विचार कधी केला नाही. हा विचार केला असता तर आतापर्यंत सत्याग्रह केला असता."
भारताचा स्त्रीवाद आंबेडकरांच्या स्त्रीवादी विचारांशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. स्त्रीवादी दृष्टिकोन काय असतो मुळातच आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होतो. भारतातील स्त्रीवादी स्त्रियांनी लक्षात घेतले पाहिजे, दलित व ग्रामीण भागातील स्त्रियांच्या संघर्षाशिवाय स्त्रीवादाची लढाई किती अपूर्ण आहे. स्त्रीवादी स्त्रियांनी आत्मपरीक्षण करून आपल्या स्त्रीवादी चळवळीची लढाई निर्देशित केली पाहिजे व भारतातील प्रत्येक स्त्रीच्या देवघरात गणपती व कुठले देव नसले तरी चालते, परंतु डॉ. आंबेडकरांच्या स्त्रीवादी विचारसरणीचे एक पुस्तक एक पुस्तक व त्यातील विचार मस्तकात ठेवले तरी आजची स्त्रीवादी चळवळ सार्थकी लागेल.
Comments
Post a Comment