He-Man
धर्मेंद्रवर पहिल्यांदा नजर खिळली तेव्हा तो म्हणतो,
"आप के हसीन रुख़ पे आज नया नूर है…"
त्या ओळी सुरू झाल्या की आजही मनात एक विशिष्ट सौम्य लहर उठते. ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवर त्याची नजर, त्याचं हलकंसं लाघवी हसू, आणि “मेरा दिल मचल गया…” म्हणताना नायिकेकडे पाहण्याची त्याची अदब, यात एक वेगळाच करिष्मा होता. त्या पहिल्या नजरेनंतर त्याची प्रत्येक गाणी, प्रत्येक प्रवेश दृश्य, एक विशिष्ट प्रकारे पहायला मजबूर करतात. धर्मेंद्र दिसला की स्क्रीनवर एक अलिखित सभ्यता विहरताना जाणवते, तो रांगडा आहे, देखणा आहे, पण एकाच वेळी कोमलही आहे.
धर्मेंद्रचा हा करिष्मा फक्त त्याच्या देखणेपणापुरता मर्यादित नव्हता; त्याच्या भूमिकांतही हीच सभ्यता, हीच कोमलता सतत जाणवत राहिली. धर्मेंद्र सुरुवातीपासूनच स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये चमकला जी गोष्ट त्या काळात फार धाडसाची होती. बंन्दिनीमध्ये नूतन आणि अशोककुमार सारख्या दिग्गजांमध्ये तो स्वतःचा ठसा उमटवतो. अनुपमा मध्ये शर्मिलाच्या संकोची हालचाली टिपताना दिसणारा धर्मेंद्र एकदम कवी मनुष्य वाटतो. खामोशी मध्ये "पुकार लो...." म्हणताना तर तो चेहरा न दाखवता फक्त पाठमोऱ्या रूपाने संवाद साधतो आणि तरीही प्रेक्षक ओळखतातच, "हा धर्मेंद्रच आहे." त्याचं दिसणं आणि असणं यात इतकं अंतर नव्हतं की फक्त आकृती पाहूनही आपण त्याला ओळखायचो.
काळ बदलत गेला आणि सिनेमात रंग उतरले.
पण धर्मेंद्रचे रंग आणखी गडद होत गेले...
आशा पारेखसोबतचा, "आया सावन झूम के…"
मुमताजकडे पाहत म्हणलेले, "आज मौसम बड़ा बेईमान है…"
वैंजयंतीमालाकडे कवीसारखे पाहत म्हणलेले, "मैं कहीं कवि न बन जाऊँ…"
ही गाणी फक्त गाणी नाहीत तर ही धर्मेंद्रच्या
अभिनयातील व्यक्तिमत्त्वाची विविध रूपं आहेत.
चलचित्र इतिहासात दुर्मिळ असा टप्पा म्हणजे...
धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता ज्याने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितासोबत इज्जत नावाचा हिंदी चित्रपट केला आणि तोच तिचा पहिला आणि शेवटचा हिंदी चित्रपट ठरला. जयललितानेही तिच्या मुलाखतीत म्हटले... "मी तो चित्रपट साईन केला कारण धर्मेंद्र खूप हँडसम होता."
इज्जत हा चित्रपट काळा-गोरा समाजभेद इतक्या तीव्रतेने दाखवतो की आजही तो धक्का देतो. त्या गोर्या मुलीला समजून सांगताना काळ्या रुपातील धर्मेंद्र म्हणतो...
"लुटे दिल में दिया जलता नहीं… हम क्या करें…"
हे विरहाचे प्रेमगीत म्हणून अमर असले तरी
हे वर्णभेदावरचे सौम्य सामाजिक भाष्य आहे.
‘इज्जत’ नंतर समाज वास्तव दाखवणारा त्याचा
सर्वात जबरदस्त चित्रपट 'गुलामी' .
येथे मोठी गोष्ट म्हणजे, धर्मेंद्रने मुख्य प्रवाहात दलित पुरुषाची भूमिका स्वीकारली. ठाकूर त्याला पूर्ण नावाने बोलत नाही तर तो त्याला ठणकावून सांगतो, स्मिता पाटीलवर प्रेम असूनही जातीमुळे त्याला प्रेम गमवावं लागतं, पण तरीही तो तुटत नाही उभा राहतो, चालत राहतो, प्रतिकार करतो. त्या काळात अशा भूमिका मुख्य अभिनेत्याने करणं म्हणजे मोठं धैर्य होतं.चित्रपट समीक्षकांनी हा चित्रपट कमी लेखला, गुलजारच्या "ज़े-हाल-ए-मिस्कीं…" गाण्यात चित्रपट अडकवून ठेवला. पण समाजशास्त्रीय दृष्टीने पाहिलं तर
'गुलामी' हा धर्मेंद्रने भारतीय सिनेमा इतिहासात टाकलेला सर्वाधिक ताकदीचा पायाचा ठसा आहे.
धर्मेंद्रचे सौंदर्य, शरीरयष्टी, रांगडेपणा इतके प्रबळ होते की,
त्यामुळे त्याचा अभिनय बर्याचदा उपेक्षित राहिला.
Critics नी त्याला Action Hero च्या चौकटीत टाकलं.
पण त्याचे Subtle Performances अनुपमा, खामोशी, बंदिनी, इज्जत, गुलामी, कुदरत हे दाखवतात की तो दिसतो त्यापेक्षा कितीतरी मोठा अभिनेता आहे.
राजेश खन्ना, अमिताभच्या काळातही स्वतःची वेगळी छाप पाडली. बहुतेक कलाकार एका स्टारच्या उगवण्याने मागे पडतात. पण धर्मेंद्र त्या दोघांच्या काळात Second lead असूनही First Lead सारखा भासला. कुदरतमध्ये राजेश खन्नासोबत तो तितकाच भारी, शोलेमध्ये अमिताभ–धर्मेंद्र Chemistry इतिहास घडवते. त्याची उपस्थिती प्रेक्षकाला आपोआप स्क्रीनकडे ओढते.
"बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना!"
एका डायलॉगने त्याने सिनेमा अजरामर केला.
टँकीवर चढून प्रेयसीच्या आजीला धमकावणारा वीरू
हे दृश्य भारतीय पुरूष प्रेमाचा टेम्पलेट बनून गेलं.
त्या काळात चित्रपटात हिरोसाठी विशिष्ट Dance Forms नव्हते. पण धर्मेंद्रच्या One-man style ला लोकांनी डान्सचा दर्जा दिला. “मैं जट यमला पगला दीवाना…” आजही Pure Energy आहे.
धर्मेंद्रच्या मनात उर्दू भाषेबद्दल एक विलक्षण प्रेम होतं.
त्याच्या बोलण्यात, त्याच्या शेरो-शायरीत आणि त्याच्या रोमँटिक संवादांमध्ये ती भाषा पाझरत असे. उर्दू त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक लय देत होती, मुलायम, नजाकतदार आणि अत्यंत दिलदार. त्याचं एक अपूर्ण स्वप्न म्हणजे त्याचं आत्मचरित्र. तो ते आत्मचरित्र उर्दूतच लिहित होता. जर ते पुस्तक पूर्ण झालं असतं, तर कदाचित भारतीय चित्रपटसृष्टीचा त्यांच्या नजरेतून पाहिलेला एक अखंड, अनकथित इतिहास आपल्या समोर आला असता.
धर्मेंद्रने असंख्य अभिनेत्रींसोबत काम केले,
पण हेमा मालिनी फक्त 'Co-star' नव्हती...
ती त्याची ड्रीम गर्ल होती.
19 व्या वर्षी केलेलं पहिलं लग्न,
नंतर कळत्या वयात मिळालेलं खरं प्रेम
हे अनेकांना पटत नसले तरी,
त्याने त्या प्रेमाला नाव दिलं
जे त्या काळात फार थोडेच करायचे.
आजही त्याची शेवटची ट्विटर पोस्ट त्यांच्या
दोघांचा तरुणपणीचा शेअर केलेला फोटो आहे.
हेमा थोडी अंतर राखून राहत असे… पण धर्मेंद्रचं तिच्यावरचं प्रेम मात्र खोल, शांत आणि जिवाभावाचं होतं. चमकधमकाच्या या जगात तिला एकटी न पडू देता, तो तिच्या सोबत ठाम उभा राहिला, कुठलाही गाजावाजा नाही, कुठलीही जाहिरात नाही… फक्त निखळ साथ.
आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो, त्यांच्यासोबतच काम करण्याची संधी मिळणे… आणि लोकांनीही त्या जोडीला तितकंच प्रेम देणे हे योगायोग नाही. ही विलक्षण पात्रता आहे, जी प्रत्येकाकडे नसते.
या हिट जोडीने पडद्यावर जितकं दिलं…
तेवढंच आयुष्यातही एकमेकांना दिलं.
धर्मेंद्र हे दोन कुटुंबं सांभाळणारे व्यक्तिमत्त्व. दोन्हीकडे जबाबदारी, माया, सन्मान आणि आपुलकी ही चारही गोष्टी त्यांनी नेहमी निभावल्या. पण जीवनाच्या उत्तरार्धात मात्र त्यांच्यात एक निर्विकार एकटेपणा जाणवू लागला.
ग्लॅमरपासून दूर होत तो लोणावळ्यातील आपल्या शेतात रमू लागला. जाट असल्यामुळे मातीशी आणि निसर्गाशी असलेलं त्याचं नातं फार जुनं होतं. वय वाढताच ते अधिकच घट्ट झालं. आपल्या शेतात उगवलेला भाजीपाला, फळ, झाड यांचे तो स्वतः व्हिडिओ बनवून शेअर करायचा. ते व्हिडिओ पाहताना जाणवायचं. हा तोच धर्मेंद्र आहे…
पण अधिक साधा, अधिक माणूस, अधिक शांत.
जग बदलत गेलं, सोशल मीडियाचं वादळ आलं...
तिथेही त्यांनी स्वतःला सहज जुळवून घेतलं.
Instagram, Twitter, Facebook…
या सगळ्या माध्यमांवर तो स्वतः चाहत्यांशी संवाद साधत असे. त्याच्या प्रत्येक पोस्टमध्ये एक प्रेमळ साधेपणा झळकत असे... कधी शेतातील मिरच्या, कधी जुन्या आठवणी, तर कधी ओळींतून व्यक्त केलेली शायरी.
स्वतःकडे त्याने कधीच स्वतःचा दावा केला नाही.
अभिनेता म्हणून नव्हे, त्याने चाहत्यांना आपले समजले.
म्हणूनच कदाचित त्याने सोशल मीडियावर आपलं
User Name ठेवलं... "आपका धरम"
‘सत्यकाम’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘बंदिनी’, ‘शोले’, मेरा गाव मेरा देश, जीवन मृत्यू, गुलामी, अशा असंख्य चित्रपटांतील भूमिकांसाठी कधीतरी फिल्मफेअर मिळेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण मिळाले नाही. आणि शेवटी लाइफटाईम अचिव्हमेंट फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं तेव्हा त्यांनी व्यक्त केलेल्या वेदनेतूनच दिसून आले की इंडस्ट्रीतील राजकारणाचा बळी ते स्वतः ठरले. आयुष्यभर दिलेल्या महान योगदानानंतरसुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणी दिला नाही… हे दुःख आणखी खोल.
अत्यंत साधेपणाने जगणारा धर्मेंद्र,
प्रसिद्धीच्या झगमगाटात राहूनही अंतर्मनाने गावाकडचा,
मातीशी जोडलेला, शांत, नम्र असा माणूस होता.
तो स्वतःकडे काहीही जास्त ठेवत नसे
ना मोठेपणाचा गाजावाजा, ना स्टारडमची हौस.
पण मीडियाने मात्र त्याचीच माती केली.
मृत्यू होण्याआधीच मृत्यूच्या बातम्या देत त्याचा अपमान केला,
त्याच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना बेचैन केले. त्यांच्या जाण्याच्या काही दिवस आधी सुरू झालेल्या या खोट्या बातम्यांनी त्याच्या शेवटच्या काळावर जणू सावलीच टाकली.
आणि झाले काय?
शेवटी धर्मेंद्र शांतपणे न बोलताच निघून गेला...
ज्या स्टारला संपूर्ण भारत पाहू इच्छित होता,
ज्याने आयुष्यभर चाहत्यांना आपले समजले,
ज्याने "आपका धरम" म्हणून स्वतःला दिलं...
त्याच चाहत्यांना त्याचं शेवटचं दर्शन
मिळू न देणं ही सगळ्यात मोठी वेदना.
एकाकीपणाने जगलेला हा मोठा अभिनेता,
एकाकीपणानेच शेवटचा पडदा ओढून गेला.
जाता जाता मन फक्त एकच ओळ
पुन्हा पुन्हा म्हणत राहतं...
पल पल दिल के पास तुम रहते हो…
जीवन मीठी प्यास, ये कहते हो....
Love You Dharam Paji...❤️
We will miss you, always.....✨
#Dharmendra
Comments
Post a Comment