'मनुस्मृती' दहन झाली का???
25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा मूळ धार्मिक आधार असलेल्या व त्याचे प्रतीक नाकारण्यासाठी हिंदूचा आद्य ग्रंथ म्हणजेच 'मनुस्मृती'चे दहन केले. आंबेडकरांनी केलेली ही राजकिय कृती असली तरी, सामाजिक परिवर्तनाची त्यास एक किनार होती. स्त्रियांसह, अस्पृश्य लोकांना असमानतेची अमानुष वागणूक देणारे घाणेरडे नियम त्यात समाविष्ट होते. तमाम स्त्रियांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम सहजासहजी झाला नव्हता. कारण, फारच तुरळक लोकांचा आंबेडकरांच्या या कृतीला पाठींबा होता. आंबेडकरांनी जनतेला उद्देशून म्हटले होते, "असमानतेने जन्माला घातलेल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचा अधिकार नष्ट करूया. धर्म आणि गुलामगिरी सुसंगत नाही." मनुस्मृती दहनच्या कार्यक्रमात केवळ स्त्रिया व अस्पृश्य लोक नव्हते तर, काही ज्ञानी ब्राम्हण सुद्धा होते आणि ही एक आश्चर्याची बाब आहे. आंबेडकरांचे सहकारी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे म्हटले, "मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो असलो तरी मनुस्मृतीच्या सिद्धांताचा मी निषेध करतो. ते धर्माचे नाही तर विषमता, क्रूरता आणि अन्यायाचे प्रतीक आहे. प...