He-Man
धर्मेंद्रवर पहिल्यांदा नजर खिळली तेव्हा तो म्हणतो, "आप के हसीन रुख़ पे आज नया नूर है…" त्या ओळी सुरू झाल्या की आजही मनात एक विशिष्ट सौम्य लहर उठते. ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवर त्याची नजर, त्याचं हलकंसं लाघवी हसू, आणि “मेरा दिल मचल गया…” म्हणताना नायिकेकडे पाहण्याची त्याची अदब, यात एक वेगळाच करिष्मा होता. त्या पहिल्या नजरेनंतर त्याची प्रत्येक गाणी, प्रत्येक प्रवेश दृश्य, एक विशिष्ट प्रकारे पहायला मजबूर करतात. धर्मेंद्र दिसला की स्क्रीनवर एक अलिखित सभ्यता विहरताना जाणवते, तो रांगडा आहे, देखणा आहे, पण एकाच वेळी कोमलही आहे. धर्मेंद्रचा हा करिष्मा फक्त त्याच्या देखणेपणापुरता मर्यादित नव्हता; त्याच्या भूमिकांतही हीच सभ्यता, हीच कोमलता सतत जाणवत राहिली. धर्मेंद्र सुरुवातीपासूनच स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये चमकला जी गोष्ट त्या काळात फार धाडसाची होती. बंन्दिनीमध्ये नूतन आणि अशोककुमार सारख्या दिग्गजांमध्ये तो स्वतःचा ठसा उमटवतो. अनुपमा मध्ये शर्मिलाच्या संकोची हालचाली टिपताना दिसणारा धर्मेंद्र एकदम कवी मनुष्य वाटतो. खामोशी मध्ये "पुकार लो...." म्हणताना तर तो चेहरा न दाखवता फक्...